मुंबई : “पुढच्या काही वर्षांत मुलुंडमध्ये पाच मोठे प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे मुलुंड उपनगराचा पूर्ण कायापालट होईल,” असा विश्वास स्थानिक आमदार आणि महायुतीचे मुलुंड विधानसभा उमेदवार मिहीर कोटेचा ( Mihir Kotecha ) यांनी व्यक्त केला. या पाच प्रकल्पांमध्ये ‘रेल्वे टर्मिनस’, ‘क्रिडा पार्क’, ‘पक्षी उद्यान’, ‘तीन डीपी रोड आणि रोपवे’ (केबल कार) प्रकल्पांचा समावेश आहे.
याबाबत बोलताना मिहीर कोटेचा म्हणाले की, “मुलुंडमध्ये तीन डीपी रोड मंजूर झाले आहेत. या नव्या रोडमुळे शहरातील वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे. मुलुंडमध्ये साडेचार एकरावर पक्षी उद्यान होत असून सिंगापूरच्या धर्तीवर होणार्या या पक्षी उद्यानामुळे मुंबईच्या पर्यटनस्थळात नव्या स्थळाची भर पडणार आहे. सरदार प्रतापसिंह गार्डच्या टेकडीवर केबल कार बनवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ आणि तुलसी तलावाच्या विहंगम दृश्याचा आनंद घेता येणार आहे. मुलुंडला क्रिडा कॉम्प्लेक्स बनवण्यात येत असून सर्व आऊटडोअर खेळांची सुविधा येथे असणार आहे,” असे त्यांनी सांगितले. स्वतंत्र मुलुंड रेल्वे टर्मिनसच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलुंडच्या या स्वतंत्र टर्मिनसमुळे मध्य रेल्वेचा ताण कमी होईल. तसेच कच्छ, उत्तर प्रदेश आणि कोकणमध्ये जाणार्यांना मुलुंडमधूनच एक्सप्रेस रेल्वेगाड्या पकडता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “मुलुंडमध्ये आज बहुसंख्येने मॉल्स आहेत. पण, पुढच्या पाच वर्षांच्या आत सदर पाच प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे मुलुंड हे मुंबईत येणार्या पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनेल,” असे कोटेचा यांनी स्पष्ट केले.