महाराष्ट्र विकासाचे इंजिन बनण्यासाठी मतदान करा : अविनाश धर्माधिकारी
‘महाराष्ट्रापुढील आव्हान, संधी आणि नागरिकांचा सहभाग’ यावरील व्याख्यानाला ठाण्यात उदंड प्रतिसाद
18-Nov-2024
Total Views | 44
1
ठाणे : “भारताशिवाय महाराष्ट्र नाही आणि महाराष्ट्राशिवाय भारत नाही. असे असताना आज काही शक्ती महाराष्ट्र फोडायला निघाले आहेत. अशावेळी महाराष्ट्र भारताच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी आवर्जून मतदान करा,” असे आवाहन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी ( Avinash Dharmadhikari ) यांनी केले.
शिवप्रेरणा उपक्रमांतर्गत ‘सजग रहो’ अभियानात ठाण्यात दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात महाराष्ट्रापुढील आव्हान, संधी आणि नागरिकांचा सहभाग, या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले. यावेळी दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजीव ब्रम्हे उपस्थित होते.
हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचे दाखले देत धर्माधिकारी यांनी मतदानाचे महत्त्व विशद केले. भारताच्या विकासाला जोडलेला डबा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला गेल्या काही वर्षांत काही शक्तींनी त्यांच्या स्वार्थासाठी पद्धतशीरपणे फोडण्याचे काम केले आहे. जो महाराष्ट्र भारतासाठी लढतो, अशा महाराष्ट्राशिवाय भारत नाही, असे असताना आज काही शक्ती महाराष्ट्र फोडायला निघाले आहेत. “जीवनाच्या सर्व क्षेत्रात समोर असलेल्या समस्यांचा स्वतंत्र बुद्धीने मूलभूत विचार करून आपल्या स्वतंत्र प्रतिभेतून त्याची उत्तरे शोधणे ही महाराष्ट्राची प्रतिभा आहे. देशाच्या प्रश्नांवर महाराष्ट्राने काय केले बघा रे, असे बोलले जायचे. पण, आज महाराष्ट्राची घसरण होत आहे आणि ती सामाजिक फाटाफुटीमुळे होत आहे. आज महाराष्ट्राचे विखुरलेले राजकीय चित्र आहे. दुर्दैवाने त्याच्या मुळाशी पद्धतशीरपणे जोपासण्यात आलेली फाटाफूट आहे. हे चित्र बदलले पाहिजे. महाराष्ट्राने देशासमोर एक व्हिजन ठेवायला पाहिजे. महाराष्ट्र हा बळ वाढवणारा, समृद्ध करणारा आणि त्याचवेळी भविष्यकाळावर दृष्टी असलेला आहे. महाराष्ट्र भारताच्या विकासाचे इंजिन बनायला पाहिजे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये विचार करून मतदानाचा हक्क बजावा. दि. २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी फिरायला न जाता मतदान करा,” असे आवाहन करताना धर्माधिकारी यांनी काही मतांनी पराभूत व विजयी झालेल्या उमेदवारांचे दाखले दिले.
देशाच्या नरडीला नख लावण्याचे काम राहुल गांधी करतात.
“राहुल गांधी देशभर लाल पुस्तक दाखवत संविधानाचे रक्षण, संविधानाचे रक्षण, असे बडबडत फिरतात आणि केंब्रीजला जाऊन भारत एक राष्ट्र नाही, अशी देश तोडण्याची भाषा करतात. हा देशद्रोह आहे. जगात भारत ही लोकशाहीची जननी आहे. अशा देशाच्या नरडीला नख लावण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत,” असेही धर्माधिकारी यांनी नमूद केले.
समान नागरी कायदा लागू करण्याबाबत महाराष्ट्र मागे का?
“कलम ३७०’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तीव्र विरोध होता. ‘कलम ३७०’ रद्द करणारे सरकार खरे संविधानवादी आहे. देशात १९७५ साली आणीबाणी लागू केली. तेव्हाच खरे तर संविधान धोक्यात आले होते. समान नागरी कायदा उत्तराखंड मध्ये लागू झाला. झारखंडमध्येही हा मुद्दा सुरू आहे. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत महाराष्ट्राने का मागे राहावे,” असेही अविनाश धर्माधिकारी म्हणाले.