‘व्होट जिहाद’साठी आलेला पैसा ‘उलेमा’ आणि ‘मराठी मुस्लीम सेवा संघा’च्या खात्यात!
मालेगावातील १२ युवकांची बनावट खाती!
16-Nov-2024
Total Views | 37
2
मुंबई : मालेगावमधील १२ तरुणांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यातून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, हा पैसा ‘उलेमा बोर्ड’ आणि ‘मराठी मुस्लीम सेवा संघा’च्या खात्यात गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Vote Jihad) शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.
किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी त्यांच्या कार्यालयात पत्रकारपरिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “मालेगाव ‘व्होट जिहाद’ फंडिंग घोटाळ्यात सिराज अहमद हारून मेमन आणि मोईन खानने १२ तरुणांची फसवणूक केली आहे. या घोटाळ्यात मालेगावमधील २० ते २१ वयोगटातील १२ हिंदू तरुणांना नोकरीचे आमिष दाखविले. तसेच त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडण्यात आली. त्यानंतर काही दिवसांत त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. एवढेच नाही, तर या युवकांच्या नावाने सिम कार्डदेखील घेण्यात आले. सिराज आणि त्याच्या साथीदारांनी बनावट सह्या करून हा व्यवहार केला. या प्रकरणातील एक युवक बँकेत गेल्यानंतर त्याच्या खात्यात एवढे पैसे आल्याचे त्याला कळले. त्यानंतर इतरांनी आपापली खाती तपासल्यानंतर त्यांच्या खात्यातही हे पैसे आल्याचे त्यांच्या लक्षात आले. दि. ७ नोव्हेंबर रोजी सिराज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली असून त्यावर कारवाई सुरू आहे. एकूण २०० कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा आहे.
पहिल्या फेरीत फक्त नाशिक मर्चंट बँकेत खाती उघडण्यात आली. त्यानंतर आता बँक ऑफ महाराष्ट्रच्या मालेगाव शाखेतही त्यांच्या नावाने खाती उघडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या युवकांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एकही सही केलेली नाही. तरीसुद्धा तिथे ४० कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचे बँक मॅनेजरने कबुल केले आहे. तर नाशिक मर्चंट बँकेत १ कोटी, २५ लाखांचा व्यवहार झाला आहे. तपासादरम्यान, नाशिक मर्चंट बँकेत आणखी दोन खाती उघडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे,” असे सोमय्या यांनी सांगितले.
सोमय्या पुढे म्हणाले की, “मराठी मुस्लीम सेवा संघ’ आणि ‘उलेमा बोर्डा’च्या काही लोकांकडे हे पैसे गेले आहेत. नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे हे सगळे ‘उलेमा बोर्डा’च्या लोकांना भेटले आहेत. महाविकास आघाडीने या दोन्ही संस्थांना मान्यता दिली आणि त्यांच्या मागण्याही मान्य केल्या. याचा अर्थ या दोन्ही संस्था राहुल गांधींच्या काँग्रेसने तयार केल्या आहेत. सिराजने यात एकाही मुस्लीम मुलाला समाविष्ट केले नाही. त्यामुळे ‘व्होट जिहाद’ फंडिंगसाठी मोठी यंत्रणा काम करत असल्याचा मला विश्वास आहे,” असेही किरीट सोमय्या म्हणाले.
मालेगाव शहर हे जिहाद्यांचे केंद्र बनत चालले आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी हिंदुत्ववादी उमेदवार आहेत, त्यांना पराभूत करण्यासाठी ‘व्होट जिहाद ’करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यासाठी चार इस्लामिक देशांतून मालेगावमधील बँकेत १२ हिंदू तरुणांच्या खात्यात १२४ कोटींचा आर्थिक व्यवहार आढळून आला. हे तरुण आमच्याकडे आले आहेत आणि आम्ही आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली असून यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.
श्याम देवरे, कार्यकर्ता, विश्व हिंदू परिषद
सिराजने माझ्या एका मित्राला आणि काही मुलांना सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी आधार कार्ड, सिम कार्ड आणि दोन फोटो लागतील, असे सांगितले. तसेच, नाशिक मर्चंट बँकेमध्ये खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर एक दिवस अचानक माझा मित्र बँकेत गेला असता, त्याच्या खात्याद्वारे कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचे कळले.