नाशिक : कामगारांची वस्ती असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व गेल्या दहा वर्षांपासून सीमा हिरे ( Seema Hire ) करत आहे. मतदारसंघात असणार्या सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न भाजप आमदार हिरे यांनी आपल्या कार्यकाळात केला. गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या बळावर आपण नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. विकासकामांच्या बळावरच यंदा नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये तिसर्यांदा कमळ फुलणार, असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी दै. ‘मुंबई तरूण भारत’शी बातचित करताना व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना कोणते मुद्दे केंद्रस्थानी आहेत?
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा तसा कामगारबहुल मतदारसंघ आहे. देशभरातील सर्व जाती पंथाचे लोक येथे वास्तव्याला आहेत. आपला भारत देश जसा विविधतेने नटला आहे, त्याप्रमाणे नाशिक पश्चिम मतदारसंघात विविधता बघायला मिळते. येथे बंगाली, उत्तर भारतीय, केरळ राज्यासोबतच इतर राज्यातील लोक नोकरीच्या निमित्ताने राहत आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात प्रत्येक राज्यातील लोकांचे मंडळ असल्याचे दिसून येतात. या मंडळांच्या माध्यमातून विविध सण साजरे केले जातात. हे लोक राज्यातले असले तरी ते आता पूर्णतः नाशिककर झाल्याचे बघायला मिळते. येथे कामगार वस्ती मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. या मतदारसंघात सातपूर आणि अंबड वसाहती येत असल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे. यातल्याच काही उद्योगांना कुशल कामगारांची आवश्यकता असते. त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आयटीआयच्या माध्यमातून कौशल्य विकास झालेले कामगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच आयटीआयची इमारत उभी करुन आता ५० वर्षे झाले आहेत. तेथे आता १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करुन नवीन इमारत तयार करण्यात येत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे नावाने १८ कोटींचा निधी वापरुन नासर्डी ते पाथर्डी येथे जी नवीन वसाहत वाढत आहे, तेथे जलतरण तलाव निर्माण करण्यात येत आहे. येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा घेता येतील अशा सुविधा निर्माण केल्या जात आहे. त्याचबरोबर सातपूर येथील पोलीस ठाण्याची इमारत आणि बस स्टॅण्ड उभारण्यात आले आहे. अंबड आणि सातपूर येथे मोठी वसाहत असल्याने तेथे पोलीस बळ कमी पडत होते. त्याचे विभाजन करुन तेथे नव्याने पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. तिचे लवकरच पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात येणार आहे. यांसह अनेक मुद्दे प्रचारादरम्यान केंद्रस्थानी आहेत.
आमदार म्हणून पुन्हा संधी मिळाली तर, पुढील पाच वर्षांत आणखी कोणती विकासकामे आपण करणार आहात?
नाशिक पश्चिम मतदारसंघात कामगारांसाठी नव्याने सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले असून सिडकोमध्ये १०० खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. त्यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली आहे. ती जागा हस्तांतरित करण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्याचबरोबर सिडको येथील घरांचा प्रश्न खूप वर्षांपासून भिजत पडला होता. येथील घरे ९९ वर्षांच्या कराराने नागरिकांना दिली गेली होती. पण, उतार्यावर त्यांची नावे लागून मालमत्ता पत्र तयार केले जावे यासाठी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्याच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत सर्व सिडको धारकांच्या नावावर घरे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. हे माझे पुढील पाच वर्षांतील महत्त्वाचे काम असेल.
मतदारांनी आपल्याला अधिकाधिक मतदान करावे, यासाठी त्यांना काय आवाहन करणार आहात?
मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत आमदार म्हणून अनेक विकासाच्या योजना राबविण्याचा प्रयत्न केला. तसेच नाशिक पश्चिममधील सर्वच वयोगटातील नागरिकांना विविध सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था आमच्यासोबत प्रचारात उतरल्या आहेत. प्रबोधन मंचाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मतदानाची आकडेवारी वाढली जावी यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिकचे मतदार सुजाण आहेत, ते मोठ्या प्रमाणावर मला मतदान करुन निवडून देण्याचे काम करतील, अशी मला अपेक्षा आहे.
मतदारसंघात अधिकाधिक उद्योग यावे यासाठी कोणते प्रयत्न करणार आहात?
नाशिक शहरामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींच्या सीमा निर्धारित झाल्या आहे. त्याबाहेर जाऊन नवीन उद्योग तेथे उभे करणे आता तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. नवीन येणार्या उद्योगांसाठी या वसाहतींमध्ये जागा निर्माण करता येणे शक्य नाही. तसेच नवीन उद्योग उभारणीसाठी ५० ते १०० एकर जागेची आवश्यकता असते. तेवढी मोठी जागा सातपूर आणि अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये उपलब्ध करुन देणे शक्य नाही. ‘सुजलाम् सुफलाम्’ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व दिंडोरीसारख्या तालुक्यांमध्ये हजारो एकर जागा उपलब्ध आहेत. त्याठिकाणी नवीन उद्योगांसाठी जागा सहजपणे उपलब्ध करुन देणे शक्य आहे. शेवटी नाशिक काय किंवा सिन्नर, दिंडोरी काय, दोन्ही नाशिकचाच भाग आहे. या तालुक्यांत नवीन उद्योग उभारल्यास नाशिक शहरावर येणारा नागरी सुविधांचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी मदत होऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. त्यामुळे सिन्नर आणि दिंडोरी औद्योगिक वसाहतींमध्ये जास्त जागा उपलब्ध करुन नवीन उद्योग आणण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार. यंदा नाद घुमणार आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात १०० टक्के कमळ फुलणार, याची मला खात्री आहे.
सिडकोवासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न केले आणि त्याचा निवडणुकीत कसा फायदा होणार आहे?
गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोवासियांची घरे त्यांच्या नावावर होण्यासंबंधीचा प्रश्न शासनदरबारी प्रलंबित होता. तो सोडविण्यासाठी २०१४ साली देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतानाच घरे नावावर करण्यासंबंधीची घोषणा करण्यात आली होती. परंतु, काही तांत्रिक मुद्दे निर्माण झाले. यामध्ये महसुल खाते, सिडको आणि शासन या तिघांच्या माध्यमातून या मालमत्तेचे हस्तांतरण करत असताना त्याचे शुल्क किती असावे, असा प्रश्न होता. तसेच घरमालकांच्या नावावर घरे करत असताना स्टॅम्पड्यूटी महसूल खात्याकडून जास्त आकारण्यात आली होती. सिडकोमध्ये राहणारा कामगार वर्ग असल्याने स्टॅम्पड्यूटी कमी करण्याची विनंती करण्यात आली. ती विनंती मान्य करुन घरधारकांना मालमत्ता पत्र त्यांच्या नावावर करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच शहरात नागरी वस्त्यांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या वस्त्यांचा विस्तार नाशिक पश्चिम मतदारसंघात अधिक प्रमाणावर होत आहे. पश्चिम मतदारसंघात येणार्या गंगापूर, आनंदवल्ली, पिंपळगाव बहुला, अशोकनगर तसेच पाथर्डी भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी शिल्लक आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. तिथल्या पायाभूत सुविधा महापालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याला प्राधान्य द्यायचे आहे, जेणेकरुन नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होईल. तसेच सिडको येथे नव्याने साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात राज्य शासनाच्या माध्यमातून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात शिवसृष्टी उभारण्याच्या निर्णयानुसार नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसृष्टी सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात साकारली जाणार आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातील विकासकामे ही माझ्या विजयासाठी पुरेशी असून पुढील काळात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाला मला जितके देता येईल, तितके देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे.