‘लव्ह जिहाद’, ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘व्होट जिहाद’ देशासमोरील सर्वात मोठ्या समस्या
16-Nov-2024
Total Views | 29
1
नाशिक : “आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो. पण, हिंदू धर्मासाठी आपण एक होतो का,” असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि इतिहास अभ्यासक राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) यांनी शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड येथे आपल्या व्याख्यानात उपस्थित करून उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. ‘लव्ह जिहाद’, ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘व्होट जिहाद’ या देशापुढील सर्वांत मोठ्या समस्या असल्याचेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. या समस्यांची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला अजूनही समजत नाही, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. ‘अश्वमेध प्रबोधिनी’ तर्फे ‘सजग रहो अभियाना’अंतर्गत ‘एक महाराष्ट्र, श्रेष्ठ महाराष्ट्र’ या विषयावर पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात आयोजित व्याख्यानात अभिनेते राहुल सोलापूरकर बोलत होते. यावेळी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी, अश्वमेध प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश आढाव, उपाध्यक्ष रवींद्र शिंदे, नामदेव आढाव, उदय शेवतेकर, योगेश भगत, संजय कीर्तने, प्रमोद तूर्केकर, रावसाहेब गायधनी आदी उपस्थित होते.
सोलापूरकर पुढे म्हणाले की, “आजची माध्यमे वास्तव परिस्थिती, घटनेची सत्य पार्श्वभूमी जनतेसमोर मांडण्याऐवजी केवळ रंजक, भडक मथळ्यांना प्राधान्य देत आहेत. जम्मू काश्मीरमधील केंद्रीय विद्यालयात बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा २०१४ सालानंतर प्रथमच उपलब्ध झाली. त्यामुळे दहशतवादाचा प्रभाव हळूहळू कमी होत गेल्याने या राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली.
हिंदू धर्म सर्व दिशांनी धोक्यात सापडला असूनही आपण आपल्याला एवढे सहिष्णू म्हणवून का मिरवत आहोत,” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हिंदू धर्माच्या सर्व देव देवतांच्या हातात शस्त्र दिसतात आणि आपण मात्र सहिष्णू म्हणवून घेतो या विसंगतीवर त्यांनी बोट ठेवले.
प्रास्ताविक राजेश आढाव, तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भोर यांनी केले. आभार प्रदर्शन विलास आढाव यांनी केले. संयोजन अश्वमेध प्रबोधिनीचे विलास वारुंगसे, नामदेव आढाव, माधव चौधरी, गोकूळ घोलप, केशव पहाडे, निवेश आहिरराव, सुभाष शिंदे, प्रदिप वाघ यांनी केले.
‘वक्फ बोर्डा’ची सर्वाधिक जमीन बीड जिल्ह्यात
शहीद आणि हुतात्मा यातील अर्थ भेद सर्वात प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्पष्ट केला. देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सूचनेवरून ‘वक्फ बोर्ड’ निर्माण झाले. आज देशात संरक्षण विभाग आणि रेल्वे यांच्यानंतर तिसर्या क्रमांकाची आरक्षित जमीन ‘वक्फ बोर्डा’च्या ताब्यात आहे. एकट्या महाराष्ट्रात १ लाख, १७ एकर जमीन ‘वक्फ बोर्डा’च्या ताब्यात आहे. त्यापैकी राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त जमीन ‘वक्फ बोर्डा’कडे आहे. १९७५ साली तत्कालीन केंद्र सरकारने ‘वक्फ बोर्ड’ सुधारणा कायदा आणून ‘वक्फ बोर्डा’ला अधिक स्वायत्तता दिल्याचेही राहुल सोलापूरकर यांनी नमूद केले.