पुण्यातील सभेनंतर नरेंद्र मोदींचे ५ जणांसोबत हितगुज
16-Nov-2024
Total Views | 41
1
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी आपली सभा पार पडल्यानंतर ‘राष्ट्र भाषा समिती, पुणे’चे अध्यक्ष जयराम फगरे (वय ९४) यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारले. फगरे यांनी चांदीचे सन्मानचिन्ह कधीचे मोदींना देण्यासाठी तयार करून ठेवले होते. पंतप्रधान हिंदी भाषेचे दूत आहेत, म्हणून त्यांचा सत्कार करायचा होता. पण ते देण्याचा योग मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या दौर्यात आला. ‘एकता’ मासिकाच्या संपादिका रूपाली भुसारी यांनी सप्टेंबरच्या अंकात फगरे यांच्या कार्यविषयक आणि मोदींना भेटण्याची त्यांची इच्छा याविषयी लेख प्रसिद्ध केला होता. हा लेख पुणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मधुमिलींद मेहेंदळे यांनी लिहिला होता.
सन्मानचिन्हाचा मजकूर आकाशवाणीचे सुनील देवधर यांनी तयार केला होता. याविषयी खासदार मेधा कुलकर्णी यांना भुसारी यांनी माहिती कळवली. त्यांच्या मदतीने या सगळ्यांची भेट पंतप्रधान मोदी यांच्यासह ठरवली गेली, त्यात १५ मिनिटे पंतप्रधानांसह संवाद साधण्याचे भाग्य यांना लाभले. फगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरविले. सुनील देवधर यांनी पुस्तके भेट दिली, तर भुसारी यांनी ‘एकता’चा दिवाळी अंक दिला. यावेळी ‘एकता’ मासिक खूप जुने असल्याचे आपल्या स्मरणात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.