स्वच्छ प्रतिमेचा फायदा, विकासकामे महत्त्वाचा मुद्दा
15-Nov-2024
Total Views | 29
नाशिक : मागील दोन विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपकडून चांदवड-देवळा मतदारसंघातून सहज विजय मिळवणारे डॉ. राहुल आहेर ( Rahul Aher ) यांची यंदाची वाट त्यांचे चुलत बंधू केदा आहेर यांनी काहीशी बिकट केली आहे. परंतु, शांत आणि संयमी डॉ. आहेर तिसर्यांदादेखील विजय मिळवतील, अशी अपेक्षा स्थानिकांना असल्याचे दिसून येत आहे. मागील दहा वर्षांत संपूर्ण मतदारसंघात डॉ. आहेर यांच्या प्रयत्नांतून विकासकामे जलद गतीने झाली. चांदवड आणि देवळा या दोन तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ निर्माण झाला आहे. मतदारसंघातील शेवटच्या वाडी-वस्तीपर्यंत आहेर यांनी रस्ते तयार केले आहेत. तसेच, कायम दुष्काळाच्या छायेत असणार्या भागात पाणी पोहोचवण्यासाठी वळण योजना करण्यावर भर देण्यात आल्याने शेतीचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे.
या भागात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याखालोखाल डाळिंब, मका आणि द्राक्ष ही पिके घेतली जातात. जयचंद कासलीवाल यांच्या रुपाने भाजपने येथे पहिल्यांदा खाते उघडले. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघाचे सलग १९८५ ते १९९९ सालापर्यंत भाजपचे दिवंगत जयचंद कासलीवाल यांनी प्रतिनिधित्व केले. आपल्या काळात त्यांनी नांदगाव-चांदवड ४२ खेड्यांत पाणी योजना, चांदवड शहरासह ४४ गावांत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात यश मिळविले. त्याचबरोबर, शेतीसाठीच्या पाणी योजनांसाठी विशेष प्रयत्न केले. रेणुकामातेच्या वास्तव्याने पावन झालेला आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कामांमुळे ऐतिहासिक असलेला तालुका म्हणजेच चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघ. आधी हा मतदारसंघ फक्त चांदवडपुरताच मर्यादित होता. मात्र, १९९५ मध्ये राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी स्वतंत्र देवळा तालुक्याची निर्मिती केली. त्यानंतर तो चांदवड-देवळा मतदारसंघ या नावाने ओळखला जाऊ लागला.
अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाची प्रत्येक निवडणूक पाणी व सिंचनाच्या प्रश्नाभोवती लढविल्या गेल्या. १९९९ सालच्या निवडणुकीत कासलीवाल यांना त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिरीष कोतवाल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २००४ साली शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम भालेराव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत विजय प्राप्त केला. त्यानंतर २००९ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा उत्तम भालेराव यांना उमेदवारी मिळाली, तर शिरीष कोतवाल यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय खेचून आणला. त्यानंतर २०१४ साली माजी मंत्री दौलतराव आहेर यांचे पुत्र डॉ. राहुल आहेर यांचा चांदवडच्या राजकारणात प्रवेश झाला. दौलतराव आहेर यांचे मूळ गाव देवळा असल्याने आपल्या कार्यकाळात त्यांनी देवळ्याचा विकास मोठ्या प्रमाणावर करण्याचे काम केले. तर वसंतदादा साखर कारखान्यावरदेखील डॉ. दौलतराव यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. तसेच पंचायत समितीवर आपला पुतण्या केदा आहेर यांची सभापतिपदी वर्णी लावली. स्वभावाने शांत असलेल्या डॉ. राहुल आहेर यांना भाजपकडून २०१४ सालच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली. चुलतभाऊ केदा आहेर यांची साथ आणि वडिलांनी केलेल्या कामाच्या जोरावर डॉ. राहुल आहेर यांनी सहज विजय प्राप्त केला. या निवडणुकीत शिरीष कोतवाल यांचे सहकारी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेत नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीनंतर डॉ. कुंभार्डे यांनी भाजपत प्रवेश करत आ. डॉ. राहुल आहेर यांच्या मदतीने बाजार समितीवर आपली वर्णी लावून घेतली.
लहानपणापासून राजकारण पाहिलेल्या डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्यात ‘जलयुक्त शिवार योजने’ची मोठी कामे केली, तर चांदवड शहरासाठी असलेली ‘नळपाणीपुरवठा योजना’ पूर्णत्वास नेली. राहुड पाटचारी आणि पुणेगाव पाटचारी यांसह देवळा तालुक्यात भरीव विकास कामे केली. तसेच रस्त्यांचे जाळे विणत तालुक्याला जोडण्याचे काम केले. डॉ. राहुल आहेर यांना २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत ५४ हजार, ९४४, काँग्रेसच्या शिरीष कोतवाल यांना ४३ हजार, ७८५ आणि अपक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे यांना २९ हजार, ४०९ मते मिळाली. २०१९ सालच्या निवडणुकीत डॉ. राहुल आहेर यांनी २०१४ सालची पुनरावृत्ती करत पुन्हा विजय मिळवला. दुरंगी लढतीत डॉ. आहेर यांना १ लाख, ३ हजार, ४५४, तर शिरीष कोतवाल यांना ७५ हजार, ७१० मते मिळाली.
तिसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात...
तळागाळातील मतदारांची कामे केलेल्या डॉ. राहुल आहेर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपने त्यांना तिसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आपल्या शांत स्वभावासाठी परिचित असलेले डॉ. राहुल आहेर यांनी दहा वर्षांत मतदारसंघात विकासकामांवर मोठ्या प्रमाणावर भर देण्याचा प्रयत्न केला. तसेच, भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप डॉ. राहुल आहेर यांच्यावर आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत झालेले नाही. त्यांच्या या जनमानसांतील स्वच्छ प्रतिमेचाच त्यांना फायदा होत आहे. त्यांच्यासमोर यंदा काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांचे आव्हान असले तरी, चांदवड-देवळ्याचे मतदार तिसर्यांदा डॉ. राहुल आहेर यांना विधिमंडळात पाठवणार असल्याचे मतदारसंघात निर्माण झालेल्या चित्रावरून दिसून येत आहे.