‘ऑपरेशन सागरमंथन’ – २ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पकडले
एनसीबी, गुजरात एटीएस आणि भारतीय नौदलाची संयुक्त कारवाई
15-Nov-2024
Total Views | 30
1
नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), भारतीय नौदल आणि गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाईत भारतीय सागरी हद्दीत सुमारे ७०० किलो मेथ अंमली पदार्थाची खेप पकडली आहे. ‘ऑपरेशन सागरमंथन’ ( Operation Sagarmanthan ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान ८ परदेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे, जे स्वत:ला इराणी म्हणवत आहेत. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे २ हजार कोटी रुपये आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी नसलेले आणि ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम (एआयएएस) नसलेले एक जहाज भारतीय भुभागात अंमली पदार्थ आणणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ‘ऑपरेशन सागरमंथन - ४’ अंतर्गत एनसीबी, एटीएस आणि भारतीय नौदलाने संयुक्त कारवाई करून हे जहाज पकडले. या कारवाईत परदेशातील नार्कोटिक्स यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे, जेणेकरून या ड्रग्ज सिंडिकेटचे पुढचे-पुढचे दुवे शोधता येतील.
‘ऑपरेशन सागरमंथन’ची सुरुवात एनसीबीने या वर्षाच्या प्रारंभ केली आहे. या अंतर्गत भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांच्या एटीएसच्या सहकार्याने अनेक सागरी शोधमोहिम राबवण्यात आल्या आहेत. या कारवाईत आतापर्यंत सुमारे ३ हजार ४० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून १ इराणी आणि १४ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.