आपल्या मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीच्या बोलण्यात आपण हयात असताना कोणकोणत्या क्षेत्रात पारितोषिके कमावली किंवा करिअरमध्ये किती यशोशिखरे गाठली, याचा उल्लेखच नसेल, तर आपण काय जीवन जगलो? असा प्रश्न स्वतःला वयाच्या ६९व्या वर्षी विचारत, जीवनाचा एक नवा अध्याय सुरु करणार्या विजय मॅथ्यू यांची कथा ‘विजय ६९’ या चित्रपटात मांडली आहे. ‘नेटफ्लिक्स’वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी वयाची नवी ‘इनिंग’ सुरू करणार्या लोकांचे उत्तम प्रतिनिधित्व करत आपल्या वयोवृद्ध पालकांचेही मन समजून कसे घ्यावे, याचा धडा आजच्या पिढीला दिला आहे. जाणून घेऊया अक्षय रॉय दिग्दर्शित ‘विजय ६९’ या चित्रपटाबद्दल....
विजय ६९’ या चित्रपटाची कथा सुरू होते, विजय मॅथ्यू यांच्या जीवंतपणीच होणार्या अंत्यसंस्कारापासून. विजय मॅथ्यू यांनी आयुष्यभर ‘स्वीमिंग कोच’ म्हणून काम केले. राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू असणारे विजय जेव्हा कधी पाण्याजवळ जात, पाण्यात सूर मारण्यासाठी आपोआपच सज्ज होत असत आणि हाच गैरसमज होऊन विजय यांनी आत्महत्या केली, अशी बातमी पसरून त्यांचे अंत्यसंस्कार केले जातात. त्यावेळी त्यांचा मित्र फली अर्थात अभिनेते चंकी पांडे आपल्या मित्राबद्दल दोन शब्द व्यक्त होत असताना जे भाषण करतो, ते ऐकून विजय यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, माझे वय ६९झाले असले तरी मी आजपर्यंत जीवनात छातीठोकपणे सांगू शकेन, अशी एकही यशस्वी कामगिरी केली नाही आणि या विचाराने ते पेटून उठतात. आपल्या हयात नसलेल्या बायकोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेत भाग घेण्याचा ते निर्णय घेतात. कारण, यापूर्वी या स्पर्धेचा विक्रम मोडणार्या वयोवृद्ध व्यक्तीचे वय ६४ होते आणि विजय यांचे वय ६९ असल्यामुळे ते नवा विक्रम प्रस्थापित करू शकतात आणि पुन्हा एकदा आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास मनाशी बाळगत ते ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेत भाग घेतात.
आपल्या पालकांचे वय झाले किंवा त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली की, त्यांना पाल्य इतर बर्याच कामांमधून नकळतपणे निवृत्त करतात. सतत त्यांना कोणाच्यातरी आधाराची गरज आहे, म्हणजे तो मानसिक असो शारीरिक, याची जाणीव सतत करून दिली जाते. अशा मुलांचे खरे तर डोळे उघडणारा हा चित्रपट.
मुळात ‘विजय ६९’ या चित्रपटातील विजय हे आर्थिकरित्या आपल्या मुलीवर अवलंबून नसूनही त्यांना त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, अशी ही उत्तम कथा अक्षय रॉय यांनी गुंफली आहे. मुळात आपली जवळची व्यक्ती वयाची साठी उलटल्यानंतर काहीतरी नवे करू पाहात आहे, यासाठी त्यांना प्रोत्साहन न देता, शारीरिकदृष्ट्या तुम्ही किती असक्षम आहात, याची आठवण आणि जाणीव करून देणार्या वयोवृद्धांना झुगारून विजय जीवनाची नवी सुरुवात करतात, हा विचारच खरे तर तरुण पिढीलाही नवी उमेद आणि ऊर्जा देणारा. वयोवृद्धांचे जीवन कसे असते, त्यांची स्वप्ने काय असतात किंवा त्यांनी आजवर कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांच्यातील सुप्त गुण लपवून ठेवत, आपले जगणे मारलेले असते, अशा लोकांची ही प्रतिकात्मक कथा. पण, कुठेही फार गंभीरपणे कथानकाची मांडणी न करता विनोदी अंगाने मांडण्याचा दिग्दर्शक आणि लेखकाचा प्रयत्न नक्कीच दाद देण्यासारखा आहे.
‘ट्रायथलॉन’ स्पर्धेत वयाच्या ६९व्या वर्षी भाग घेत नवा रेकॉर्ड करू पाहणारे जसे विजय असतात, अगदी तसेच वयाच्या 18व्या वर्षी हा रेकॉर्ड करणारा त्यांचा प्रतिस्पर्धी आदित्य जैसवाल हा तरुण असतो. इतक्या वर्षांत स्वतःसाठी न जगलेल्या विजय यांचा स्पर्धेत भाग घेण्याचा हेतू आपल्या मरणानंतर लोकांनी आपले नाव अदबीने घेतले पाहिजे आणि आपल्याबद्दल बोलण्यासाठी त्यांच्याकडे शब्द कमी पडले पाहिजे, असा असतो. तर त्यांचे तरुण प्रतिस्पर्धी केवळ वडिलांच्या आग्रहाखातर त्याच्या मनोविरुद्ध हा विक्रम मोडण्यासाठी भाग घेत आहे, हे दोन विचार या माध्यमातून सांगत लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपला उपयोग करतात, ही वैचारिकता त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला नक्कीच दिसतो. मुळात हा संपूर्ण चित्रपट आपले वय झाले आहे आणि आता आपण केवळ मरणाची वाट पाहिली पाहिजे, ही मानसिकता झटकून ’'Age is just a number'’ हे वाक्य सर्व वयोवृद्धांच्या आणि तरुण पिढीच्या डोक्यात अगदी घट्ट बसवते. या चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे, तरुण पिढीच्या विचारांशी मिळते-जुळते घेत आपल्याही ज्ञानात भर पडण्याची एकही संधी विजय वाया घालवत नाही आणि आपलं वय, अनुभव लक्षात घेत काळानुसार आधुनिकतेलाही ते आपलेसे करतात आणि हीच बाब आपल्यालाही एक शिकवण देऊन जाते की, काळानुसार स्वतःला ‘अपडेट’ करणे, नितांत गरजेचे आहे. ‘विजय ६९’ या चित्रपटात विजय मॅथ्यू या भूमिकेसाठी अभिनेते अनुपम खेर यांच्याशिवाय इतर कोणत्याही कलाकाराची कल्पनाच खरंतर करु शकत नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही. वयोवृद्ध माणसांचं वागणं, विचार, त्यांच्या मित्रांसोबत घडणारे किस्से याचं उत्तम प्रतिनिधित्व अनुपम खेर यांनी केले आहे. तसेच, या विशेष उल्लेखनीय अभिनय केला आहे अभिनेते चंकी पांडे यांनी. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील त्यांनी साकारलेली भूमिका ही प्रत्येकाच्या मनात जागा नक्कीच निर्माण करते.
‘विजय ६९’ हा चित्रपट सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना बर्याच गोष्टी शिकवून जातो. पाल्यांनी आपल्या पालकांशी कसं वागावं, त्यांच्या इच्छा, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली काय जबाबदारी आहे, ही महत्त्वाची जाणीव खरं तर या चित्रपटातून नक्कीच होते. कारण, आपले आई-वडील आपल्या लहानपणी आपला हट्ट पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आणि ज्यावेळी त्यांचा हट्ट पूर्ण करण्याची वेळ येते, तेव्हा पाल्य म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो आणि तीच सुधारण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने मुलांना मिळते. त्यामुळे वयाची पर्वा न करता, मनाने जर का एखादी व्यक्ती तरुण असेल कर कोणती गोष्ट अशक्य नसते, हे या चित्रपटातून शिकता येते.
चित्रपट : विजय 69 दिग्दर्शक : अक्षय रॉय
कलाकार : अनुपम खेर, चंकी पांडे, मिहिर अहुजा, वर्जेश हिरजे