२०१९मध्ये शरद पवारांमुळेच लागली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट!
देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
15-Nov-2024
Total Views | 101
मुंबई : (President's Rule) महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या काही घटना घडल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाली, पहाटेचा शपथविधी होऊन औटघटकेचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षाच्या काळात राजकीय वर्तुळात सुरू झालेली नाट्यमय घडामोडींची मालिका अजूनही सुरूच आहे. परंतु या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचे पत्रच थेट जबाबदार असल्याचा मोठा दावा फडणवीस यांनी केला आहे. एका मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी या संदर्भातील अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
नेमकं काय घडलं होत?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, "भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं, परंतु त्यांच्याकडेही बहुमत नव्हतं. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे. त्यानंतर एक बैठक झाली, ज्यामध्ये मी, अमित शाह, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला."
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, “१० नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे त्या वेळी स्पष्ट होतं. त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू, त्यादरम्यान, शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवारांच्याच सूचनेनुसार ठरलं होते."
राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबतचा किस्सा सांगताना फडणवीस म्हणाले, "राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता, राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं. पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले. त्यामुळे जर पवार म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणं त्यांच्या योजनेचा भाग नव्हता, तर प्रत्यक्षात त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाली."