हवाहवासा सेक्युलॅरिझम

    14-Nov-2024   
Total Views |
the sabarmati report film
 

आज चित्रपटगृहात प्रदर्शित होणार्‍या ‘द साबरमती रिपोर्ट’ या हिंदी चित्रपटाची निर्माती एकता कपूर हिने मागे एका पत्रकार परिषदेत म्हटले की, “होय, मी हिंदू आहे. तुम्ही हिंदू आहात म्हणजेच सेक्युलर आहात. मी अन्य धर्मांविषयी कुठलीही टिप्पणी करणार नाही. कारण, मी हिंदू आहे. मी सांगू इच्छिते की, मला सगळ्या धर्मांविषयी प्रेम आहे. माझ्या चित्रपटातील कथानकात मी आरोपींची नावेही घेतली आहेत, पण कुठल्याही धर्माला धक्का न पोहोचविता. हेच माझ्या मते एका ‘स्टोरीटेलर’चे कौशल्य आहे.” 2002 साली गुजरातमधील गोधरा स्थानकावर अयोध्येहून येणार्‍या ‘साबरमती एक्स्प्रेस’च्या डब्याला धर्मांधांकडून आग लावण्यात आली आणि यामध्ये 59 कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला. या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील घटनेवर बेतलेला हा चित्रपट. त्यातच एकता कपूरने ‘आम्ही चित्रपटात फक्त वास्तव मांडले आहे,’ असे जाहीर केल्याने या चित्रपटात या घटनेच्या नेमक्या कोणत्या ज्ञात-अज्ञात पैलूंवर भाष्य केले आहे, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण, एकता कपूरने मांडलेले विचार हे त्यांचे एकटीचे नव्हे, तर अजूनही हिंदू समाजावर सेक्युलॅरिझम अर्थात सर्वधर्मसमभावाची झापडे कायम आहेत. याच सेक्युलॅरिझमच्या षड्यंत्रात केवळ हिंदू समाजालाच काँग्रेसने वर्षानुवर्षे गुरफटून ठेवले. हिंदूंमधील आत्मभान कसे जागृत होणार नाही, याची काँग्रेसने पद्धतशीर तजवीज केली. एकीकडे हिंदूंचे दमन आणि दुसरीकडे अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनातून काँग्रेसने सत्तास्वार्थही गाठला. पण, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात हिंदू पुनर्जागरणाच्या मंथनाला वेग आला. देशभरात घडलेल्या हिंदू सण-उत्सवविरोधी घटना, अल्पसंख्याकांच्या अरेरावीमुळे बर्‍यापैकी हिंदूंचे डोळे उघडलेही. पण, मागील काही निवडणुकांमध्ये मतदान करताना हिंदू समाज पक्षीय राजकारणात विभागला गेला आणि त्याचाच लाभ हिंदूविरोधी शक्तींनी अल्पसंख्याकांच्या एकगठ्ठा मतदानातून वेळोवेळी उचलला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना, सेक्युलॅरिझमचे हे भूत मानगुटीवर अजिबात बसू देऊ नका. सदसद्विवेकबुद्धीने सारासार विचार करा. जरा पूर्वेकडे, बांगलादेशकडे बघा!

नकोनकोसा सेक्युलॅरिझम

भारतात काही बहुसंख्याकांनाही हवाहवासा वाटणारा सेक्युलॅरिझम, बांगलादेशातील बहुसंख्याकांना मात्र आता नकोसा झालेला दिसतो. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आली. हिंदूंची घरे, मंदिरे आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. उद्याच्या उगवत्या सूर्याचे दर्शनही होईल की नाही, त्याची शाश्वती नाही. आयाबहिणींची अब्रू चार भिंतींच्या आतही सुरक्षित नाही, इतकी भयाण परिस्थिती. हिंदूंनी मोर्चे काढले, शेकडो निवेदने दिली, काळजीवाहू युनूस सरकारला ‘आम्हीसुद्धा बांगलादेशी असून या देशाचे समान नागरिक आहोत,’ हे ओरडून पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्नही केला. पण, सगळे व्यर्थच. याचे कारण, बांगलादेशातील बहुसंख्याकांना मुळात ‘सेक्युलॅरिझम’ची बेगडी संकल्पनाच मान्य नाही. म्हणूनच काल तेथील सरकारचे महाधिवक्ता असदुझ्झमान यांनी 15व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेवरील प्रकरणात न्यायालयात बोलताना स्पष्ट सांगितले की, “बांगलादेशात जर 90 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे, तर मग संविधानातील ‘सेक्युलर’ शब्दाची गरजच काय?” त्यामुळे आगामी काळात ‘सेक्युलर बांगलादेश’ची वाटचाल ‘इस्लामिक बांगलादेश’कडे संविधानिक मार्गानेच झाली, तर मुळीच आश्चर्य वाटायला नको. बांगलादेशचे महाधिवक्ता केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर “मला पूर्वीसारखा अल्लावर कायमस्वरुपी विश्वास आणि श्रद्धा असणारा देश हवा आहे,” या वक्तव्यातूनही त्यांनी ‘इस्लाम सर्वोपरी’ हेच बांगलादेशचे तत्व असल्याचे अधोरेखित केले. तसेच “बांगलादेशच्या संविधानातील ‘कलम 2 (ए)’ सर्व जातीधर्मांच्या नागरिकांना समानतेचा अधिकार बहाल करते, तर ‘कलम 9’ हे ‘बंगाली राष्ट्रवादा’वर भाष्य करते. त्यामुळे ही दोन्ही कलमे परस्परविरोधी आहेत,” हा महाधिवक्त्यांनी केलेला युक्तिवादच ‘बंगाली अस्मितेपेक्षा इस्लाम महत्त्वाचा’ या तत्वाला खतपाणी घालणारा. एकूणच बांगलादेशसुद्धा पाकिस्तानच्या मार्गावरच असल्याचे अलीकडच्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतातील हिंदूंनीही आपल्या देशातील तसेच शेजारच्या देशांमधील अशा घटनांबद्दल तितकेच जागरुक राहावे. आपण हिंदू आहोत, म्हणजे सर्व धर्मांचा नैसर्गिकरित्या आदर करतोच. पण, म्हणून सेक्युलरवादाच्या थोतांडाला कदापि न भुलता, हिंदूविरोधी शक्तींना मतपेटीतून उत्तर देणे परम कर्तव्यच!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची