मुंबई : (Narendra Mujumdar) "सशक्त समाज आणि देश घडवण्यासाठी लोकांनी स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण हेच परिवर्तनाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल असेल.", असे म्हणत विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत प्रचार प्रमुख नरेंद्र मुजुमदार यांनी उपस्थिताना १००% मतदानासाठी आवाहन केले.
दै. मुंबई तरुण भारत आणि मैत्रीबोध परिवारावतीने शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी बोरिवली (प.) येथे 'गरज काळाची - वेळ महापरिवर्तनाची' हा विशेष कार्यक्रम पार पडला. मैत्रीबोध परिवाराचे निखिलेश सावंत आणि वंदना सावंत यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमात, मैत्रीबोध परिवारातर्फे मित्र वत्सल यांनी मैत्रीबोध परिवाराचे संस्थापक मैत्रेय दादाश्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 'आदर्श नागरिकाची भूमिका आणि मतदानाचे महत्त्व' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हिंदू समाजातील असंघटन, शत्रुबोधाचा अभाव यांविषयी बोलताना नरेंद्र मुजुमदार पुढे म्हणाले, इस्लामिक जिहाद, शहरी नक्षलवाद, सांस्कृतिक मार्क्सवाद, आणि विस्तारवादी ईसाई या चार वाईट शक्तींच्या वाढत्या संख्याबळामुळे भारतीय हिंदू समाजव्यवस्थेची ढासळण होत आहे. तसेच या वाईट शक्ती भारतीय समाजव्यवस्था मुळापासून पोखरण्याचे काम करत आहेत. म्हणूनच या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकाराचे महत्त्व ओळखून आगामी विधानसभा निवडणुकीत सजगतेने मतदान करायला हवे."
पुढे कार्यक्रमात मैत्रीबोध परिवारातील मित्र वत्सल यांनी संस्थापक मैत्रेय दादाश्रीजी यांच्या मार्गदर्शनपर पत्राचे वाचन केले. या पत्रामध्ये एका काल्पनिक गोष्टीचा आधार घेत मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रात द्वापारयुगाचा अंत आणि कलियुगाच्या प्रारंभाचा संदर्भ देत, भगवान श्रीकृष्णाने कसे कलियुगातील वाईट प्रवृत्तींना संपवण्यासाठी आपल्या तर्जनीतील सुदर्शन चक्ररूपी शक्ती प्रत्येकाला बहाल केली. ही शक्ती म्हणजेच आपल्या हातात सोपवलेला मतदानाचा अधिकार. श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राची जी शक्ती लोकांना दिली आणि ती शक्ती मतदानानंतर आपल्या हाताच्या तर्जनी बोटावरील निळ्या शाईतून प्रकट होते, असे त्यांनी पत्राद्वारे सांगितले. म्हणून आपण या शक्तीचा वापर करून समाजातील दुष्ट प्रवृत्तीना हरवण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर च्या निवडणुकीमध्ये १००% मतदान करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
अध्यात्मिक परिवर्तनसोबतच सामजिक परिवर्तन गरजेचं
प्रत्येक व्यक्तीला आपले नेतृत्व निवडण्याचे स्वातंत्र्य केवळ मताधिकारामुळे प्राप्त झाले आहे. मताधिकार हा लोकशाहीने दिलेले मोठे वरदान आहे. आणि हा अधिकार बजावणे हे जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचे आद्य कर्तव्य आहे. अध्यात्मिक परिवर्तनसोबतच सामजिक परिवर्तन गरजेचं आहे, असे मित्र वत्सल म्हणाले. 'एक भारत हम भारत' असा नारा देत त्यांनी एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.