नाभिक समाजाच्या उत्थानासाठी...

    14-Nov-2024   
Total Views |
nabhik samaj utthan
 
 
प्रचंड संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे, समाजाच्या विकासासाठी सदैव झटणारेे शैलेंद्र क्षीरसागर याच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

"शैलू, आपल्या कामाची अजिबात लाज बाळगायची नाही. अरे बाळ जन्मल्यावर पण आपलं काम आहेच आणि माणूस मेल्यानंतरही आपलं काम आहेच. समाजाला उपयोगी पडावं यासाठी आपला जन्म झालाय. जे काही करशील ते समाजाच्या हिताचं कर,” असे प्रेमळबाई त्यांच्या मुलाला शैलेंद्र याला सांगत असत. आज तेच शेलेंद्र ‘श्री संत सेना महाराज गुरुवार नाभिक संस्थे’चे उपाध्यक्ष आहेत. ‘108 वेदांताचार्य तुकाराम महाराज शास्त्री मठ आळंदी’चे आणि ‘देशस्थ समाज उत्कर्ष संघा’चे ते सक्रिय माजी पदाधिकारी आहेत. तसेच ते ‘हिंद एज्युकेशन सोसायटी मॉडेल नाईट स्कूल’चेही पदाधिकारी आहेत. समाजातील मुलांचा शैक्षणिक टक्का वाढावा, तसेच त्यांनी तुटपुंज्या पगाराच्या नोकरीत गुंतून न राहाता, स्वतःचा व्यवसाय उभा करावा, यासाठीही ते कार्य करतात. महाराष्ट्रभरातून नाभिक समाजाचे लोक मुंबईत उपचाराला येतात. त्यातील अनेकांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन सहकार्य करण्यासाठी शैलेंद्र अग्रेसर आहेत. शिक्षण आणि आरोग्य तसेच स्वयंरोजगार क्षेत्रात शैलेंद्र सातत्याने कार्य करत आहेत.

क्षीरसागर कुटुंब मूळचे जुन्नरचे. गोविंद क्षीरसागर आणि प्रेमळबाई या दाम्पत्याला आठ मुले. त्यांपैकी एक शैलेंद्र. उमरखाडी मुंबई परिसरात गोविंद यांचे केशकर्तनालय होते. क्षीरसागर कुटुंबाच्या दहा बाय दहाच्या घराशेजारीच दारूचा गुत्था होता. त्या दारूच्या दुकानाचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी क्षीरसागर दाम्पत्य डोळ्यांत तेल घालून काळजी घेत असे. प्रेमळबाई अल्पशिक्षित होत्या. मात्र, त्या धार्मिक सामाजिक कार्यात नेहमी पुढे असत. ‘ज्ञानेश्वरी’चे पारायण करत असत. देव, धर्म, समाजाशी मुलांची बांधिलकी व्हावी, असे संस्कार प्रेमळबाई मुलांना देत असत. मुंबईतल्या त्या छोट्या घरात अनेक नातेवाईक येत असत. कधी उपचारासाठी, कधी शिक्षणासाठी, तर कधी नोकरीसाठी. त्या सगळ्यांना क्षीरसागर कुटुंबाचे घर म्हणजे आधारस्थान असे. घरात काही धोधो पैसा येत नव्हता. मात्र, आहे त्या उत्पन्नात घर सुखी-समाधानी होते. गोविंद यांच्याकडे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक सदानंद मोहिते येत असत. त्यांनी एके दिवशी गोंविंद यांना सांगितले की “अरे मुलांना संघाच्या शाखेत पाठवत जा.” त्यांच्या म्हणण्यानुसार मग शैलेंद्र संघाच्या शाखेत जाऊ लागले. घरच्या समाजशील संस्कारांत संघाचे राष्ट्र-समाजहित संस्काराची भर पडली आणि शैलेंद्र यांच्या सामाजिक जाणिवा रूंदावल्या.

मात्र, एक दिवस ती दुर्घटना घडली. गोविंद यांना पक्षाघाताचा झटका आला. ते सात-आठ दिवस कोमात गेले. त्यातच त्यांचे निधन झाले. प्रेमळबाईंच्या डोक्यावर घराची जबाबदारी आली. सगळे घर विस्कळीत झाले. गोविंद यांच्या निधनाने घराने पहिल्यांदा गरिबीची तीव्र झळ काय असते ते अनुभवले. त्यानंतर काही दिवसांतच मग शैलेंद्र यांच्या मोठ्या भावाने केशकर्तनालय व्यवसायाची जबाबदारी घेतली. त्यावेळी शैलेंद्र केवळ 12 वर्षांचे होते. त्यांनीही मग वयाच्या 12व्या वर्षी दूधविक्रीचा व्यवसाय सुरू केला. पहाटे 4 वाजता ते उठत असत. घरोघरी दूध वितरित करत नंतर शाळेत जात. या सगळ्या काळात ‘ज्ञानेश्वरी’ पारायण असू दे, की कुंभारवाड्यातील समाजाच्या वास्तूतील कार्यक्रमात असू देत, ते त्यांच्या आईच्या सोबतही जात असत. 80च्या दशकात मुंबईतल्या नाभिक समाजाचे वास्तव कष्टाचेच होते. समाजाचे प्रश्न, समाजातील महिलांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय साधारण त्याच काळात मुस्लीम समाजाच्या हातात जात होता, ते वास्तव शैलेंद्र यांनी पाहिले आणि अनुभवलेही.

असो. या काळात त्यांच्या घरी अनेक संत-महंत येत असत. अगदी पांडुरंगशास्त्री आठवले महाराज आणि बाबा महाराज सातारकरही त्यांच्या घरी येऊन गेले. कारण, शैलेंद्र यांची मोठी बहीणही अध्यात्मिक वृत्तीची होती. सत्संग, धर्मपरायणता यासाठी जीवन वाहून घेण्याचा तिने संकल्प केला होता. आईच्या मदतीने इतर भावंडांचे संगोपन करताना तिने देवधर्म जागृती कार्यही सुरू केले होते, तर या सगळ्या संत-माहात्म्यांच्या सहवासाने शैलेंद्र यांच्या मनातही धर्मजागृती प्रखर होत होती. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते नोकरी करू लागले आणि पुढे आईच्या सांगण्यावरून ‘श्री संत सेना महाराज गुरुवार नाभिक संस्थे’चेे काम करू लागले. समाजाचे एकत्रीकरण करणे, समाजासाठीच्या शासकीय योजना समाजापर्यंत पोहोचवणे, समाजाच्या पारंपरिक नाभिक कामाचे आधुनिक वर्तमानात युवकांना प्रशिक्षण कसे देता येईल, याबाबत नियोजन करणे, गरीब, गरजू युवकांना स्वयंरोजगार मिळवून देता यावे, यासाठी ते काम करू लागले.

‘श्री संत सेना महाराज गुरुवार नाभिक संस्थे’च्या माध्यमातून त्यांनी समाज बांधवांसाठी बचतगट स्थापन केला. या बचतगटाच्या माध्यमातून समाजातील गरजूंना आर्थिक मदत करण्याचे कार्य सुरू झाले. तसेच, त्यांनी दुर्बल घटकांतील महिलांचेही बचतगट स्थापन केले. एकट्या महिलेचा संघर्ष मोठा असतो, सबलांनी तिला भाऊ म्हणून सहकार्य करणे गरजेचे, असे त्यांचे मत. आपण पाहात असतो की, लोक भूतकाळाचा संघर्ष आठवत रडत असतात. दुसर्‍यांना दोष देतात. मात्र, शैलेंद्र म्हणतात, “येणार्‍या काळात महाराष्ट्रात सर्वत्र नाभिक समाजातील इच्छुक युवकांचे केशकर्तनालय निर्माण व्हावे आणि त्यातून युवकांना भरघोस रोजगार मिळावा, हे माझे ध्येय आहे. संत सेना महाराजांचा आशीर्वाद आहे. घेतले कार्य पूर्ण होईलच.” असे हे नाभिक समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणारे शेलेंद्र क्षीरसागर.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.