झारखंड आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका प्रचारांत काँग्रेस पक्ष सपशेल मागे पडला असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी योगींवर केलेली टीका ही बुमरँग होण्याचीच शक्यता अधिक. दुसरीकडे कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेशमधील काँग्रेसमध्येही काही आलबेल नाही. त्यामुळे एकूणच लोकसभा निवडणुकीतील अपघाती अल्प यशानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसची खरी परीक्षा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही बाजूंनी एकापाठोपाठ एक विधानांचे बाण सोडले जात आहेत. या लढतीत राजकीय पक्ष कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ’बटेंगे तो कटेंगे’ या विधानामुळे प्रचाराची दिशा निश्चित झाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैैं’ असा नवा नारा दिला आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच घायाळ झाल्याचे दिसून आले. खरे तर, तीन महिन्यांपूर्वीच आग्रा येथील एका सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत ’बटेंगे तो कटेंगे’ असे विधान केले होते. हे विधान आगामी काळात भारतीय राजकारणाला नवी दिशा आणि धार देऊ शकते, हे कदाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही ध्यानी नसेल. मात्र, या विधानाने हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू समाजासाठी एखाद्या टॉनिकसारखे काम केले. परिणामी, काँग्रेस, राहुल गांधी आणि त्यांच्या इकोसिस्टीमचा ‘संविधान बचाव’चा फसवा नारा कुठल्याकुठे वाहून गेला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनीदेखील या नार्याचे महत्त्व विशद केले. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्यासह आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आदी वरिष्ठ नेत्यांनीही आपल्या प्रचाराची तीच धार ठेवली.
प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये ही रणनीती मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, काँग्रेस पक्षाचा फसवा ‘संविधान बचाव’चा ‘नॅरेटिव्ह’ बंद पडल्यात जमा आहे. त्यातही नागपूरमध्ये संविधानाच्या नावे कोर्या वह्या वाटून राहुल गांधी यांच्या वैयक्तिक ‘पीआर’साठी संविधानाचा वापर काँग्रेस करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भाषणांमध्येही आता दम राहिला नसल्याचे दिसते. त्याचवेळी मुस्लिमांना आरक्षण देण्याचे धोरणही काँग्रेसला अडचणीत आणत आहे. याद्वारे काँग्रेस दलित, वनवासी आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून घेणार असल्याचा थेट प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केला आहे. परिणामी आता काँग्रेसला एकाचवेळी त्यांचे फसवे संविधानप्रेम आणि ’बटेंगे तो कटेंगे’चा सामना करावा लागत आहे. याद्वारे काँग्रेसला नेहमीच भगव्याचा धसका असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
आणि या धसक्यातूनच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी चूक केली. ही चूक काँग्रेसला चांगलीच महागात पडणार असल्याचे दिसते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ’बटेंगे तो कटेंगे’ला प्रत्युत्तर देताना खर्गेंची जीभ चांगलीच घसरली. ते म्हणाले की, “योगी भगवे कपडे घालतात आणि ’बटेंगे तो कटेंगे’ची भाषा बोलतात. अशी भाषा फक्त दहशतवादी बोलतात.” खर्गे यांनी अप्रत्यक्षपणे योगींची तुलना दहशतवाद्यांशी केली. असाच प्रकार यापूर्वीही काँग्रेसचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता आणि त्याची त्यांना नुकतीच उपरतीही झाली आहे. मात्र, खर्गे यांच्या आरोपाला योगी आदित्यनाथ यांनी ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिले, त्यामुळे काँग्रेस पक्ष पूर्णपणे ‘बॅकफूट’वर आहे. योगी आदित्यनाथ अतिशय सहानुभूतीपूर्वक शब्दांत म्हणाले, “काँग्रेस अध्यक्षांच्या कुटुंबाची रझाकारांनी हत्या केली होती. रझाकारांनी खर्गे यांची आई, काका आणि काकू यांना जाळले होते. पण, काँग्रेस अध्यक्ष या रझाकारांविरोधात काहीही बोलणार नाहीत. कारण, यामुळे त्यांची मते गमावण्याची भीती आहे. हे सत्य तो लपवतो. हे सत्य का लपवले जाते, याचे उत्तर काँग्रेस देईल का?” योगी आदित्यनाथ यांच्या या बिनतोड प्रश्नाचे उत्तर काँग्रेसकडे नाही. कारण, योगी म्हणाले, ते सत्य असून ते खर्गे यांनीच एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्राच्या प्रचाराचे चित्र बघितल्यास काँग्रेस आणि आघाडीचा प्रचार लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अतिशय विस्कळीत झाल्याचे दिसते. त्याचवेळी लोकसभेत झालेल्या चुकांपासून धडा घेऊन भाजपने आपल्या प्रचाराला चांगलीच धार दिल्याचे दिसते.
एकीकडे झारखंड आणि महाराष्ट्रात प्रचार सुरू आहे. मात्र, विविध राज्यांमध्ये काँग्रेसचा अंतर्गत कलह वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशातील तीन राज्यांमध्ये म्हणजेच हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. अशीही काही राज्ये आहेत, जेथे सरकार नाही, मात्र पक्षसंघटना मजबूत आहे. त्यांपैकी एक म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीवरून मतभेद कायम आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसची नवीन कार्यकारिणी स्थापन झाल्यापासून वाद सुरू आहेत. काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे, कार्यकारिणीत पदे न मिळालेल्यांबरोबरच ज्यांना पदे मिळाली, त्यांनीही राजीनामे दिले आहेत. जितू पटवारी यांची नवी टीम सर्वांचे लक्ष्य आहे. काँग्रेसचे दिग्गज दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह असो किंवा माजी विरोधी पक्षनेते अजय सिंह यांच्यापर्यंत सर्वांनी जितू पटवारी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. लक्ष्मण सिंह यांनी तर काँग्रेस पक्ष ही ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ असल्याचा टोला लगावला आहे. भोपाळ असो वा माळवा किंवा विंध्य प्रदेश, काँग्रेसमध्ये सर्वत्र असंतोषाचे आवाज ऐकू येत आहेत. राज्यातील बुधनी आणि विजयपूर या दोन जागांवर पोटनिवडणूक होत असताना, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये मतभेद टोकाला जात आहेत.
हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार आहे. तरीही येथील अनागोंदी आश्चर्यकारक आहे. हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्येही सर्व काही ठीक नाही. मुख्यमंत्री सुक्खू आणि वीरभद्र सिंह गटात तणावाचे वृत्त आहे. यामुळेच काँग्रेसने हिमाचल प्रदेशचे संपूर्ण युनिट विसर्जित केले आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसला आपल्याच लोकांकडून राजकीय खेळी होण्याची भीती वाटत होती. घाईत, मल्लिकार्जुन खर्गे यांनी अलीकडेच हिमाचल प्रदेशमधील जिल्हा आणि ब्लॉक युनिटसह संपूर्ण राज्य काँग्रेस कमिटी (पीसीसी) युनिट तत्काळ प्रभावाने विसर्जित केली. फक्त प्रतिभा सिंह यांची खुर्ची उरली आहे. लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
तेलंगणमध्येही सत्ता असली तरी, मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि काँग्रेस हायकमांडमध्ये दरी रुंदावत असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे. राहुल गांधी काँग्रेस नेत्यांशी संवाद साधत आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांना टाळत असल्याची कुजबूज आहे. तेलंगणचे प्रदेशाध्यक्ष महेशकुमार गौड यांना गांधी कुटुंब सहज भेटत आहे. त्याचवेळी अलीकडच्या काळात दिल्लीला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी गांधी कुटुंबीयांना भेट दिली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी दि. 20 ऑगस्ट रोजी खर्गे यांना राज्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आमंत्रित केले होते. मात्र, खर्गे उपस्थित राहिले नव्हते. त्यापूर्वी जुलै महिन्यात ‘पीक कर्जमाफी योजने’साठी राहुल गांधी यांना आमंत्रित करण्याची घोषणा झाली होती. मात्र, तोही कार्यक्रम होऊ शकला नव्हता. रेड्डी यांचे खच्चीकरण खरोखरच सुरू असल्यास काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा हिमंता बिस्व सरमा, ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितीन प्रसाद यांच्याप्रमाणेच स्थिती निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
एकूणच, लोकसभा निवडणुकीतील अपघाती अल्प यशानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसची खरी परीक्षा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात आज तरी काँग्रेसला मोठे यश मिळून सत्ता मिळण्याची स्थिती नाही. कारण, महायुतीने अतिशय खुबीने परिस्थितीमध्ये बदल घडवला आहे. त्यामुळे दोन राज्यांच्या निकालामध्ये काँग्रेसला बरे यश न मिळाल्यास, पुन्हा एकदा काँग्रेस धसक्यात जाण्याचीच शक्यता आहे.