प्रबोधनाच्या माध्यमातून जनसामान्यांना निसर्गाकडे पाहण्याचा डोळसपणा देणार्या निसर्ग शिक्षकांची आज जगाला गरज आहे. सचिन विलास राणे, या अशाच एका निसर्ग प्रबोधन करणार्या अवलियाविषयी...
प्रबोधन हे निसर्ग संवर्धनाचे भविष्य. निसर्ग शिक्षणाच्या आधारे जनसामान्यांचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नशील असलेला हा मुलगा. बर्याच जणांना निसर्गात फिरायला आवडते. मात्र, या मुलाला इतरांना निसर्ग ‘फिरवण्यामध्ये’ समाधान वाटते. लोकांना निसर्ग दाखवून त्यांच्या मनात निसर्गाचे बीज रोवण्याचे काम करणारा हा अवलिया म्हणजे सचिन विलास राणे.
सचिनचा जन्म दि. 9 डिसेंबर 1992 रोजी मुंबईत झाला. चिंचपोकळी भागात त्याचे बालपण गेले. सचिनला अभ्यासामध्ये फारसा काही रस नव्हता. अशा परिस्थितीतही सचिन काळाचौकीच्या शिवाजी विद्यालयात असताना शाळेला बुट्टी मारून शिवडीचा किल्ला गाठायचा. किल्ल्यावर तासन्तास कुत्र्या-मांजरांशी खेळत बसणे, चित्र काढत बसणे हे त्याचे उद्योग. कुठे विंचू पकड, कुठे कीटक पकड, त्यांना काचेच्या बाटलीतच डांबून ठेव, हे करण्यात त्याचा वेळ जायचा. बाटलीत डांबलेल्या या कीटकांचे चित्रदेखील सचिन उत्तम रेखाटायचा. सचिनने शाळेसोबत केलेली ही फितुरी आई-वडिलांनाही समजली. त्यानंतर दहावीच्या शिक्षणासाठी सचिनची रवानगी थेट कणकवली कुंभवडे येथील बोर्डिंग स्कूलमध्ये झाली.
सचिनच्या कुंभवड्यातील शाळेमधील विज्ञानाचे शिक्षक हे सर्पमित्र होते. त्यांच्याकडून सचिनने साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले. तिथून वन्यजीवप्रेमाचे वेड स्वार झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने शासकीय तांत्रिक महाविद्यालय, विलेपार्ले येथे प्रवेश मिळवला. तिथून 2010 साली ‘ऑटो इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी’मध्ये पदवी मिळवली. त्यावर्षी सचिनचे काका त्याला माहीमच्या ‘महाराष्ट्र निसर्ग उद्याना’त घेऊन गेले होते. तिथे त्याची ओळख खर्या अर्थाने निसर्गाशी झाली.
उद्यानातील निसर्ग सहलींमध्ये तो सहभागी घेऊ लागला. उद्यानात दिसणार्या जीवांची नोंद करण्यासाठी कॅमेर्याची गरज होती. म्हणून आईवडिलांकडे हट्ट करुन त्याने कॅमेरा घेतला. कॅमेर्यामध्ये तो जैवविविधता टिपू लागला. उद्यानातील कर्मचार्यांनाही सचिनमध्ये एक जिद्द दिसली. तोपर्यंत सचिनने देखील उद्यानात दिसणार्या जैवविविधतेची माहिती अवगत करुन घेतली होती. निसर्ग सहल कशी घ्यावी, याचेही भान त्याला आले होते. म्हणूनच उद्यान प्रशासनाने 2011 साली त्याला निसर्ग सहल घेण्यास मुभा दिली. त्यानंतर सचिनने उद्यानात येणार्या निसर्गप्रेमींना उद्यानाची सफर घडवण्यास सुरूवात केली.
पुढच्या काळात सचिनने दोन वर्ष नोकरीदेखील केली. मात्र, तिथे त्याचे मन काही रमले नाही. त्यामुळे नोकरी सोडून तो पुन्हा एकदा निसर्गाच्या वाटेवरच स्वार झाला. त्याने आता निसर्ग उद्यानाबरोबर बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तही निसर्ग सहली घेण्यास सुरूवात केली. अंधेरीच्या ‘भवन्स नेचर एडवेंचर सेंटर’मध्ये देखील तो निसर्ग सहली घेऊ लागला. त्याठिकाणी त्याची ओळख अमित तिवारी, प्रवीण साहू आणि अनुराग कारेकर या समविचारी सहकार्यांशी झाली. निसर्ग शिक्षणाचा मार्ग निवडून या चौघांनी 2015 साली ’नॅचरलिस्ट फाऊंडेशन’ या संस्थेची प्रायोगिक तत्त्वावर स्थापना केली.
पुढील दोन वर्ष प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून निसर्ग शिक्षणाचे काम करण्याचे ठरवले. मुंबईत निसर्ग सहली, प्रबोधनाचे कार्यक्रम ही मंडळी घेत असत. त्या कामावेळीच सचिनला स्वत:मध्ये निसर्गाप्रती आवश्यक असणार्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची कमतरता जाणवली. म्हणूनच त्याने विज्ञानाच्या अनुषंगाने शिक्षण घेण्याचे ठरवले. बागकाम आणि फलोउत्पादनामध्ये सचिनला रस होताच. शिवाय फाऊंडेशनच्या माध्यमातून भविष्यात बागकामाविषयक कार्यशाळा घेण्याचे नियोजनही होते. त्यामुळे सचिनने रूईया महाविद्यालयात 2015 साली ’एडवान्स डिप्लोमा इन ग्रीन हाऊस डेव्हलपमेंट’ या कोर्ससाठी प्रवेश मिळवला आणि 2017 साली त्याने हा कोर्स पूर्णदेखील केला.
दरम्यानच्या काळात 2017 साली सचिन आणि सहकार्यांनी ’नॅचरलिस्ट फाऊंडेशन’ची अधिकृत नोंदणी केली. नोंदणी केल्यामुळे कामाचा व्याप वाढला. निसर्ग शिक्षणाच्या कामाला आता व्यावसायिकतेची जोड देणे आवश्यक होते. त्यामुळे बागकामाच्या कार्यशाळा आयोजित करणे, निसर्ग शिबिरांचे आयोजन करणे, असे उपक्रम त्यांनी सुरू केले. सोबतच ’डब्ल्यूडब्ल्यूएफ’सारख्या संस्थेसोबत किनारी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यास सुरूवात केली. मुंबईच्या किनारी जैवविविधतेचे निरीक्षक प्रदीप पाताडे यांच्याकडून प्रेरणा घेऊन फाऊंडेशनअंतर्गत किनारी निसर्ग सहलींना सचिनने सुरूवात केली. कामाची वाढणारी व्याप्ती लक्षात घेऊन सचिन आणि अनुराग यांनी मिळून ’नॅचरलिस्ट एक्सप्लोरर’ या नवीन कंपनीची स्थापना केली आहे, ज्यामध्ये विविध विषयांना केंद्रस्थानी ठेवून निसर्ग सहलींचे आयोजन करणे, हेरिटेज सहलींचे नियोजन करणे अशा उपक्रमांना सुरूवात करण्यात आली आहे.
‘निसर्गासोबत वाढदिवस’ अशी संकल्पना राबवत, लहान मुलांमध्ये निसर्ग संवर्धनाचे बीज रुजवण्यासाठी निसर्गासोबत वाढदिवस साजरा करण्याचे आयोजन सचिन आणि मंडळी करतात. याशिवाय कोकणची जैवविविधता उलगडण्यासाठी खास निसर्ग सहलींचे आयोजन करण्यात येते. ‘सेंच्युरी एशिया’, ‘अर्थ दि नेटवर्क’, ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय’ अशा विविध संस्थांसोबत समन्वय साधून निसर्ग शिक्षणाचे काम करण्यात येते. सचिनने सुरू केलेल्या निसर्ग प्रबोधनाच्या या कामाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!