कोची, दि. १३ : प्रतिनिधी केरळच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या पहिल्या सी प्लेनचे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पार पडले आहे. कोचीच्या बोलगट्टी मरिना येथून सी प्लेनने उड्डाण केले आणि इडुक्की येथील मट्टुपेट्टी धरणावर सहज उतरले. केरळचे पर्यटन सचिव के बिजू, विमान वाहतूक सचिव बिजू प्रभाकर, जिल्हाधिकारी एन एस के उमेश आणि इतर पर्यटन विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी १७ आसनी विमानाचे यशस्वी उड्डाणानंतर आगमन होताच स्वागत केले.
कोची ते मट्टुपेट्टीपर्यंत उड्डाण करण्यासाठी सज्ज असलेल्या सी प्लेनच्या पहिल्या अधिकृत सेवेला राज्याचे पर्यटन मंत्री पी ए मोहम्मद रियास यांनी हिरवा झेंडा दाखवला. केंद्र सरकारच्या उडान प्रकल्पाचा एक भाग म्हणून सीप्लेन सेवा सुरू करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश भारतातील दुर्गम आणि प्रादेशिक भागात हवाई संपर्क सुधारणे आहे. हा प्रकल्प पर्यटकांना आणि सामान्य लोकांना खेड्यातील पर्यटन स्थळांवर विमानाने प्रवास करण्यास प्रोत्साहित करतो. कॅनडातील डी हॅविलँड कंपनीच्या मालकीच्या १७ आसनी सीप्लेनने स्पाईस जेटच्या सहकार्याने येथे चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
मुन्नार (केरळ) हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. केरळच्या इडुवकी जिल्ह्यात मुन्नार आहे. तीन पर्वतरांगा-मुथिरपुझा, नलयन्नी आणि कुंडल यांच्या संगमावर हे वसलेले आहे. सुद्रपाटीपासून त्याची उंची अंदाजे १६०० मीटर आहे. आल्हाददाक वातावरण आणि रमणीय निसर्ग यामुळे आता ते पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. कोणत्याही महिन्यात मुन्नारला भेट देता येते. इथल्या विस्तीर्ण भूभागात पसरलेली चहाची शेती, वसाहती, बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान यामुळे पर्यटक इकडे आकर्षित होतात.
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ३ तास आणि एर्नाकुलम रेल्वे स्थानकापासून रस्त्याने मुन्नारला पोहोचण्यासाठी साडेतीन तास लागतात. मात्र ही अंडर-ट्रायल सीप्लेन सेवा सुरू झाली की, तुम्ही कोचीहून मुन्नारला सीप्लेनने २५ मिनिटांत पोहोचू शकता. सध्या पर्यटक नेरियामंगलम आणि आदिमाली या मार्गाने मुन्नारला जातात. सुमारे १४.१ किलोमीटरचा हा मार्ग दाट वनक्षेत्रातून जातो. रात्रीचा प्रवास येथे अनिश्चित असल्याने पर्यटक दुपारपर्यंत मुन्नार सोडतात. अशा प्रवासी निर्बंधांमुळे मुन्नारच्या पर्यटनावर परिणाम होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना आशा आहे की प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाल्यास टूर कंपन्या मुन्नार आणि जवळपासच्या भागात अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक आणतील. याशिवाय, सीप्लेन सेवेमुळे आणीबाणीच्या परिस्थितीत, मुन्नार येथून रुग्णांची वाहतूक करता येईल. या सेवेचा फायदा कंथल्लूर आणि मरूर येथील जवळच्या गावांतील लोकांनाही होईल. सीप्लेन सामान्यत: सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फक्त दिवसाच उड्डाण करतात.