बॅग तपासणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला ठाकरेंची धमकी! आयोगाने कारवाई करावी
नितेश राणेंची मागणी
13-Nov-2024
Total Views |
मुंबई : बॅग तपासणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली असून अप्रत्यक्षपणे त्यांना धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, "काल निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. त्यानंतर त्यांनी एवढा थयथयाट करण्याचे कारण अजूनही कळले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्र मागण्याचा उद्धव ठाकरेंना काय अधिकार आहे? आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाचे नियम सर्वांना पाळायचे असतात. निवडणूक पारदर्शक होते की, नाही हे बघणाच्या अधिकार त्यांना दिला आहे. पण उद्धव ठाकरेंनी कुठल्या अधिकाराने निवडणूक अधिकाऱ्याचे नियुक्ती पत्र मागितले? यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. देशभरात प्रत्येक ठिकाणी निवडणूकीच्या काळात नेत्यांचे हेलिकॉप्टर किंवा त्यांचे ऑफिस तपासल्याची असंख्य उदाहरणे आहेत. परंतू, तेव्हा त्या नेत्यांनी थयथयाट केला नाही. मग उद्धव ठाकरे एवढी नाटके का करतात? जो नियम अन्य नेत्यांना लागू होतो तोच यांनाही लागू होणार," असे ते म्हणाले.
ठाकरेंच्या फिरण्यावर बंदी आणावी!
"संजय राऊत म्हणाले की, आमच्यावर अन्याय झाला आहे. परंतू, काल आमच्या देवेंद्र फडणवीसांचीदेखील बॅग तपासण्यात आली. पण त्यांनी असा थयथयाट केला नाही. ते उद्धव ठाकरेंसारखे रडत बसले नाहीत. मुळात उद्धव ठाकरेंनी संबंधित अधिकाऱ्यांची ज्या भाषेत खिल्ली उडवली आणि अप्रत्यक्षपणे त्यांना धमक्या दिल्या, त्यामुळे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या फिरण्यावर बंदी आणावी. निवडणूक अधिकाऱ्याचे नियूक्तीपत्र मागणे आणि त्यांना धमकावण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय नेत्याला आहे का? असा प्रश्न निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारावा," अशी मागणी नितेश राणेंनी केली.
अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरेंची जागा तुरुंगात!
"चांदिवाल आयोगाच्या प्रमुखांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुखांना क्लिनचिट दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मग अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीचे नेते कुठल्या तोंडाने स्वत:ला एवढे स्वच्छ समजत आहेत? या आयोगाचा प्रमुखच असे सांगत असल्यास महाविकास आघाडीचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले होते, हे स्पष्ट होते. त्यामुळे अनिल देशमुख, उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांची जागा तुरुंगात आहेत. आपले आमदार निवडून आणून सरकारमध्ये बसून त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे. चांदिवाल आयोगाच्या प्रमुखांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी स्पष्टीकरण द्यावे," असेही नितेश राणे म्हणाले.