मुंबई : शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार साहेबांनीच केले. त्यांनी तेव्हा हे काम केले नसते तर ही फाटाफूट झालीच नसती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. २००४ मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिले असते तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती, असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना भुजबळांनी तेव्हाचा घटनाक्रमच सांगितला.
छगन भुजबळ म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवसेनेत असताना नगरसेवक, महापौर आणि आमदार केले. यासाठी मी अनेकदा त्यांचे आभारसुद्धा मानले. परंतू, शरद पवार साहेबांनी आता या सगळ्या गोष्टी बोलण्याची आवश्यकता नव्हती. १८-२० आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचे आणि शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म पवार साहेबांनीच केले. त्यांनी तेव्हा हे काम केले नसते तर ही फाटाफूट झालीच नसती. शिवसेनेत असताना मी पहिल्या दिवसापासून काम केले. माझ्यात काहीतरी असेल तेव्हाच बाळासाहेबांनी मला एवढी पदे दिली. परंतू, आता या सगळ्या गोष्टीला आणि शिळ्या कढीला उत येण्याचे काही कारण आहे असे मला वाटत नाही. निवडणूकीमध्ये एखाद्याला बदनाम करण्यासाठी या मुद्दांवर ते बोलत आहेत. खरंतर या सगळ्या गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या. पण आता त्यांनीच बोलायला सुरुवात केली आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "२००४ ला भुजबळांना मुख्यमंत्री का केले नाही? याबद्दल ते बोलले. पण ठीक आहे. त्यांना मला मुख्यमंत्री करायचे नव्हते. परंतू, अजितदादा होते, आर. आर. पाटील होते. त्यांना तरी करायचं होतं. पवार साहेबांनी एकदा सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केले होते. त्यानंतर एक-दोन वर्षांनी सुधाकरराव नाईक आणि पवार साहेबांचे टोकाचे मतभेद झालेत. आपण कुणाला मुख्यमंत्री केल्यास ते आपल्या वरचढ होतात. त्यामुळे कुणालाच न केलेलं बरं, असे पवारांना वाटत असावे. म्हणूनच त्यांनी ना अजितदादांना, ना आर. आर. पाटलांना आणि ना छगन भुजबळांना, कोणालाही मुख्यमंत्री केले नाही," असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे.