पोरगं सोडलं आणि एकदम नातूच काढला! अजित पवारांचा शरद पवारांना टोला
13-Nov-2024
Total Views | 182
पुणे : साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या, असे काही लोकांकडून सांगण्यात येते. आता पोरगं सोडलं आणि एकदम नातूच काढला, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना लगावला आहे. युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवार गटाकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांबाबत अजितदादांनी प्रतिक्रिया दिली. बुधवारी लोणी भापकर या गावात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, "काही वेगवेगळे लोक भेटतात आणि सांगतात. सुप्रियाच्यावेळीसुद्धा सांगायचे की, साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिले, तो तुमचा अधिकार आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. आतासुद्धा साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या, असे सांगितले जात आहे. पण आता कठीणच झालं. पोरगं सोडलं आणि एकदम नातूच काढला. मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. माझ्यात काय कमी आहे? मी काय कमी केलं?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "मागे लोकसभेला घेतलेला निर्णय मला मान्य आहे. तो तुमचा अधिकार आहे. पण आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात ८-१० प्रमुख नावे म्हणून घेतली जातात. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशी आठ दहाच नावे आहेत. यापेक्षा जास्त नावे नाहीत. इथपर्यंत पोहोचायला काही वर्ष घासावी लागतात," असेही ते म्हणाले.