मौलानाची ‘रजा’कारी

    12-Nov-2024   
Total Views |
imc-chief-maulana-tauqeer-raza-khan-furious


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘एक हैं तो सेफ हैं’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या हिंदूंना सावध करणार्‍या घोषणांमुळे, मुस्लीम समाजातील काही धर्मांधांना पोटशूळ उठला आहे. त्यापैकी काही मुल्ला-मौलवींनी थेट रस्त्यावर उतरण्याची आणि दिल्लीत संसदेला घेराव घालण्याची तुघलकी भाषाही केली. ‘इत्तेहादे मिल्लत काऊंसिल’(आयएमसी)चे अध्यक्ष आणि इस्लामिक धर्मगुरु मौलाना तौकीर रजाने मुसलमानांना थेट संसदेला घेराव घालण्याची धमकी देत, ‘मुसलमान रस्त्यावर उतरले, तर त्याची जबाबदारी सरकारची असेल,’ अशा शब्दांत हिरवे फुत्कार काढले. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिमांची माथी भडकावण्याचे हे प्रकार वेळीच ठेचून काढायला हवे. खरं तर अशा मुल्ला-मौलवींच्या धमकीला भीक घालणारे विद्यमान सरकार नाहीच. पण, म्हणून अशी चिथावणीखोर वक्तव्ये करुन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या तौकीरसारख्या रझाकारी मानसिकतेच्या नतद्रष्टांकडे दुर्लक्ष करुनही कदापि चालणार नाही, हेही तितकेच खरे. कारण, तौकीरसारखी अशी धर्मांध, जिहादी वृत्तीची मंडळी मुसलमानांची दिशाभूल करण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणूनच वक्फच्या नावाखाली गरिबांची हजारो एकर जमिनी बळकावणारे ‘कोणाच्या बापाची औकात नाही की आमच्या संपत्तीवर कब्जा करु शकेल’ अशा चोराच्या उलट्या बोंबा मारताना दिसतात. तौकीरसारखे धर्मांधतेच्या गर्तेत बुडालेले मुल्ला-मौलवी धर्मग्रंथांचा सोयीस्कर अर्थ लावून, तरुणांची मने कलूषित करण्यात एकदम पटाईत. त्याचप्रमाणे भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करुन, तरुणांमध्ये हिंदूद्वेष कसा वाढीस लागेल, यासाठीही ही मंडळी आटापिटा करताना दिसतात. म्हणूनच योगींचे ‘बटेंगे तो कटेंगे’ हे विधान हिंदूंसाठी नव्हे, तर मुसलमानांसाठी असल्याचा अजब साक्षात्कारही तौकीरला झाला. त्याच्या मते, हा कानमंत्र योगींनी मुसलमानांना दिला आहे. मुसलमान कमजोर, विभागलेला आहे, म्हणूनच योगींनी म्हणे मुस्लिमांना सावध केले. एकूणच काय तर मुसलमानांना धर्माच्या नावाखाली रस्त्यावर उतरवून, देशात अराजक माजवण्याचे हे सगळे कटकारस्थान अजून फोफावण्याआधी उखडून फेकायला हवे.

पुन्हा दिल्लीची स्वारी

देशाच्या कानाकोपर्‍यात कुठेही काही खुट्ट झाले तरी राजधानी दिल्लीला वेठीस धरायचे, असा एक अघोषित पॅटर्नच मागील काही वर्षांत पद्धतशीरपणे राबविण्यात आलेला दिसतो. मग ते शाहीनबागचे आंदोलन असो, ‘सीएए’विरोधी आंदोलन असो वा अथवा कृषी कायदे मागे घेण्यावरुन दिल्लीची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न असो, या सगळ्यात कायमच भरडले गेले तर ते दिल्ली शहर आणि दिल्लीकर जनता. तसेच दिल्लीत आंदोलन झाले की आपसुकच त्याची दखल राष्ट्रीय माध्यमांपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय माध्यमेही घेतात. कारण, अधिवेशन काळात साहजिकच संसदेकडे अख्ख्या देशाचे लक्ष असते. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी हा आंदोलनजीवींसाठी जणू सुगीचा कालावधी. त्यामुळे संसदेचे अधिवेशन म्हटले की दिल्लीच्या सुरक्षाकड्यात वाढ होणे हे स्वाभाविक. न्यायालयानेही शेतकरी आंदोलनाच्या वेळी आणि शाहीनबाग आंदोलनाविरोधी दाखल केलेल्या याचिकेत, आंदोलकांना वेळोवेळी फटकारले होते. पण, त्यानंतरही दिल्लीवर स्वारी करण्याचे आंदोलनजीवींचे मनसुबे काही धुळीस मिळालेले नाहीत. संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात अशाचप्रकारे वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी मुसलमानांनी मोठ्या संख्येने दिल्लीकडे कूच करण्याचे आवाहन ‘आयएमसी’चे इस्लामिक धर्मगुरु तौकीरने केले. एवढेच नाही तर पाकिस्तानप्रमाणे ईशनिंदा कायदा भारत सरकारने संसदेत मांडावा, म्हणूनच यंदा दिल्लीला लक्ष्य करुन धुमाकूळ घालण्याचे या मंडळींचे नियोजित षड्यंत्र आहे. पण, तौकीरची भडकाऊ विधाने बघता, हे प्रकरण ‘जर-तर’चे म्हणत हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही. कारण, “आधी आम्ही तिरंगे घेऊन दिल्लीत येऊ. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक, अन्यथा त्यानंतर जे होईल, त्यासाठी सर्वस्वी सरकार जबाबदार असेल,” अशीही मल्लिनाथी तौकीरने केली. तेव्हा, एकूणच काय तौकीर आणि त्याच्यासारख्या हिरव्या आंदोलनजीवींच्या फौजांनी दिल्लीवर स्वारीची पूर्ण तयारी केली असून, पद्धतशीर षड्यंत्रही रचल्याचे यावरुन स्पष्ट व्हावे. अशा मुल्ला-मौलवींच्या धमक्यांना केवळ पोकळ धमक्या न समजता, त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारायला हवा. तसेच या येऊ घातलेल्या हिरव्या वावटळीमागे देशविरोधी शक्तींचा हात तर नाही ना, याबाबतही सरकारने चौकशी जरुर करावी.




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची