पालघर-डहाणू होणार राज्याचे विकास इंजिन : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस; डहाणूमध्ये फक्त शिवरायांचा भगवा फडकणार
12-Nov-2024
Total Views | 21
मुंबई : पालघर जिल्ह्याचा चेहरामोहरा खऱ्या अर्थाने महायुती सरकारने बदलला. येत्या काळात पालघर-डहाणू राज्याचे विकास इंजिन म्हणून नावारुपास येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी केले.
डहाणू विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, वलसाड गुजरातचे खासदार धवल पटेल, माजी खासदार राजेंद्र गावित, गुजरातचे आमदार अरविंद पटेल, भाजपच्या प्रदेश सचिव राणी द्विवेदी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, एक सर्वसामान्य घरातला मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, ज्याने सातत्याने राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन संघर्ष केला, राष्ट्रहिताचा विचार सोडला नाही अशा जमिनीवरच्या कार्यकर्त्याला भाजपने उमेदवारी दिली आहे. विनोद मेढा यांना डहाणूचा लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
पालघर जिल्ह्याचा चेहरामोहरा खऱ्या अर्थाने महायुती सरकारने बदलला. राज्यातील सर्वात सुंदर नवीन जिल्हा मुख्यालय इमारत आपण याठिकाणी बांधली. आशिया खंडातील सर्वात मोठे वाढवण बंदर आपण येथे आणले. मात्र विकास करत असताना या भागात मासेमारी करणाऱ्या कोळीबांधवांवर अन्याय होणार नाही याची काळजीही महायुती सरकारने घेतली आहे. कोळी बांधवांच्या पारंपारिक व्यवसायाला नवी उंची कशी मिळेल याचा आराखडा आपण तयार केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
पालघरला मुंबईशी जोडणार
वाढवण बंदरामुळे १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. हा रोजगार भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे यासाठी भूमिपुत्रांचे स्कील डेव्हलपमेंट करण्याचे काम आपण करत आहोत. आपण कोस्टल रोड विरारपर्यंत आणत आहोत. मुंबईशी पालघरची कनेक्टिव्हिटी होत आहे. पालघरमध्ये नवीन विमानतळाची मागणी आपण केली आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ती मान्य केली. पालघरमध्ये विमानतळ उभारणीचे कामही सुरु होणार आहे.
भगवान बिरसा मुंडा यांचे आपण अनुयायी आहोत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत या भागातील आदिवासी बांधवांच्या जल, जंगल, जमीन यांच्या संरक्षणासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. १९९१ च्या नोटीफिकेशनने या भागाचा विकास रोखून धरला आहे. पुन्हा आपले सरकार आल्यानंतर डहाणूला यातून मोकळे करणार आहोत. त्यामुळे येत्या २० नोव्हेंबरला डहाणूच्या विकासाकरिता कमळाचे बटन दाबून, विनोद मेढा यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.