मुंबई, दि.१२ : भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) सहकार्य वाढविण्याच्या आणि उद्योग संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ उद्योग व्यावसायिकांसह भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे यजमानपद भूषवले. भारताच्या बंदर क्षेत्राच्या प्रगतीसाठी व्यापार पायाभूत सुविधा आणि सामायिक उद्दिष्टांवर मौल्यवान चर्चेसाठी या भेटीने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश शरद वाघ यांनी सीआयआयच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले आणि परस्पर हितसंबंधांच्या मुद्यावर चर्चा केली. या भेटीबद्दल भाष्य करताना ते म्हणाले, "उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी संपर्क साधण्याची ही संधी निर्माण केल्याबद्दल आम्ही सीआयआयचे मनापासून आभार मानतो. या क्षेत्राच्या सतत विकसित होत असलेल्या मागण्यांसह आपल्या प्रयत्नांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी असे संवाद होणे आवश्यक आहे. जनेप प्राधिकरणात, आम्ही देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर व्यापाराच्या मजबूत आणि अखंड प्रवाहाला आणि प्रभावी कामकाजाला समर्थन देणारी भागीदारी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
त्यांच्या भेटीदरम्यान, सीआयआयच्या शिष्टमंडळाने जनेप प्राधिकरण विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) ला भेट देऊन तेथील कामकाज जाणून घेतले. तसेच जनेप प्राधिकरणाच्या प्रमुख टर्मिनल्सपैकी एक असलेल्या एनएसएफटी (न्हावा शेवा फ्री ट्रेड) टर्मिनलची त्याची परिचालन क्षमता आणि टर्मिनलची व्यापार व्यवहार सुव्यवस्थित करण्यात असलेली भूमिका समजून घेण्यासाठी भेट दिली. त्यानंतर शिष्टमंडळासमोर जनेप प्राधिकरणाच्या चालू आणि भविष्यातील प्रकल्पांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला, ज्यात शाश्वत वाढ, डिजिटल प्रगती आणि बंदर कार्यक्षमता यासाठीचे प्रयत्न आदी विषय समाविष्ट होते.
सीआयआयच्या शिष्टमंडळासह एसईझेड-वेलस्पन वन, व्हॉलुमनस डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, स्टेलर व्हॅल्यू चेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, फिलिप कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, म्हैसूर अमोनिया अँड केमिकल्स लिमिटेड, केमट्रॉल इंडस्ट्रीज लिमिटेड यासारख्या आघाडीच्या संस्थांच्या प्रतिनिधींनी आणि प्रमुख संस्थांमधील इतर उल्लेखनीय सहभागींनी जनेप प्राधिकरणाला भेट दिली. मजबूत औद्योगिक संबंध निर्माण करण्यासाठी आणि भारताच्या आर्थिक वाढीला आणि व्यापार उत्कृष्टतेला चालना देणारे जागतिक दर्जाचे बंदर बनण्याच्या दृष्टीकोनाला पुढे नेण्यासाठी जनेप प्राधिकरणाची वचनबद्धता सीआयआयच्या शिष्टमंडळाच्या या भेटीतून अधोरेखित होते.