'युरोपियन मधुबाज'चे महाराष्ट्रात प्रथमच दर्शन; पुण्यात याठिकाणी आढळला हा दुर्मीळ पक्षी

    11-Nov-2024   
Total Views |
European Honey Buzzard seen in maharashtra


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
महाराष्ट्रामध्ये प्रथमच युरोपियन मधुबाजाचे दर्शन घडले आहे (European Honey Buzzard seen in maharashtra). पुण्यातील वेताळ टेकडी परिसरामधून पक्षीनिरीक्षकांनी या पक्ष्यांची नोंद केली आहे. युरोपातून स्थलांतर करुन येणाऱ्या या दुर्मीळ पक्ष्यांचा संचार वेताळ टेकडी परिसरात दिसल्याने टेकडीच्या संवर्धनाची गरज अधोरेखित झाली आहे. (European Honey Buzzard seen in maharashtra)
 
 
 
हिवाळ्याच्या तोंडावर परदेशातील अनेक शिकारी पक्ष्यांनी महाराष्ट्रातील गवताळ अधिवासांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. शिकारी पक्ष्यांमधील 'ओरिएन्टल हनी बर्झड' म्हणजेच मधुबाज हा पक्षी सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात आढळतो. मात्र, याच कुळातील दुर्मीळ असणाऱ्या युरोपियन हनी बझर्ड म्हणजेच युरोपियन मधुबाजाचे दर्शन पुण्यात झाले आहे. या पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद असल्याची माहिती पक्षीतज्त्र आदेश शिवकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. पुण्यातील पक्षी निरीक्षिक अनिरुद्ध गोखले,पंकज इनामदार,मयूर आरोळे, शमिक परब,निषाद होमकर हे ६ नोव्हेंबर रोजी वेताळ टेकडी परिसरात पक्षीनिरीक्षणाकरिता गेले होते. त्यावेळेस त्यांना या पक्ष्याचे दर्शन घडले. छायाचित्र टिपल्यानंतर सुरुवातीस त्यांना हा पक्षी मधुबाज वाटला. मात्र, आदेश शिवकर यांनी या पक्ष्याची ओळख पटवून तो मधुबाज नसून युरोपियन मधुबाज असण्यावर शिक्कामोतर्ब केले.
 
 
शिकारी पक्ष्यांची ओळख ही प्रामुख्याने त्यांची शेपूट आणि पंखांवरील रंगछटांच्या खूणावरुन केली जाते. यापूर्वी मधुबाज आणि युरोपियन मधुबाजच्या प्रजननातून संकरित झालेल्या पक्ष्यांच्या नोंदी असल्याची माहिती शिवकर यांनी दिली. मात्र, पुण्यात दिसलेला युरोपियन मधुबाज हा कोणताही संकर नसून त्यांचे पंख आणि शेपटीवरील खुणांवरुन तो युरोपियन मधुबाजच असल्याचे सिद्ध होते, असे शिवकर म्हणाले. युरोप आणि मध्य आशियामधून हा पक्षी स्थलांतर करतो. यापूर्वी या पक्ष्याची नोंद गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यांमधून झाली आहे.
 
 
युरोपियन मधुबाजाच्या पंखाखाली काळ्या रंगाचा गडद काळ्या रंगाचा पॅच दिसतो, जो मधुबाज पक्ष्यामध्ये दिसत नाही. त्याच्या डोळ्याचा रंग पिवळा असतो. मधुबाजापेक्षा युरोपियन मधुबाजाची आकार आणि पंखाचा विस्तार मोठा असतो. युरोपियन मधुबाजाच्या पंखाच्या कडेला मोठा पट्टा असतो. तसेच शेपटीच्या शेवटाला एकच मोठा पट्टा असतो. मधुबाजामध्ये हे पट्टे संख्येने दोन ते तीन असतात. - अनिरुद्ध गोखले, पक्षीनिरीक्षक
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.