मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातून प्रथमच अत्यंत दुर्मीळ युरेशियन पाणमांजराची नोंद करण्यात आली आहे (Eurasian otter seen in pune). इंदापूरमध्ये विहिरीत पडलेल्या या युरेशियन पाणमांजराचा बचाव करण्यात आला असून सध्या त्याच्यावर बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत (Eurasian otter seen in pune). यानिमित्ताने पाणमांजरासारख्या दुर्लक्षित जीवाचा महाराष्ट्रातील अधिवास आणि त्याच्या संचारावर संशोधन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (Eurasian otter seen in pune)
महाराष्ट्रामधून यापूर्वी स्मूथ कोटेड आणि स्माॅल क्लाॅड या दोन प्रजातींच्या पाणमांजरांच्या नोंदी झाल्या आहेत. मात्र, वर्षभरापूर्वी विदर्भातून युरेशियन पाणमांजराच्या नोंदी घेण्यात आल्या. याच धर्तीवर आता पुणे जिल्ह्यात प्रथमच युरेशियन पाणमांजर आढळले आहे. शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी इंदापूरमधील एका शेतातील विहिरीत हे पाणमांजर आढळले. शेतकऱ्याने याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर स्थानिक वनरक्षक मिलिंद शिंदे, अनंत हुकिरे, शुभम कडू, शुभम धैतोंडे आणि रेस्क्यू-पुणेचे सदस्य नचिकेत अवधानी, प्रशांत कौलकर, डॉ. श्रीकांत देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ऑटो-ट्रॅप पिंजरा विहिरीत टाकून त्यांनी त्यामध्ये पाणमांजर शिरण्याची वाट पाहिली. मात्र, त्यासाठी सहा तासांचा अवधी लागला. सरतेशेवटी पाणमांजर पिंजऱ्यात शिरल्यानंतर त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून बावधन येथील उपचार केंद्रात हलविण्यात आले.
पुण्यात युरेशियन पाणमांजर सापडण्याची ही पहिलीच नोंद असून या प्रजातीच्या पाणमांजराचा इंदापूर क्षेत्रांमधील मूळ अधिवास शोधण्यासाठी रेस्क्यू-पुणे टीम तैनात करण्यात आल्याची माहिती पुण्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. इंदापूरमध्ये सापडेले युरेशियन पाणमांजर हे नर जातीचे आहे. मोठ्या पिंजऱ्यामध्ये त्याच्यासाठी अनुकूल असलेला नैसर्गिक अधिवास तयार करुन त्यामध्ये या पाणमांजराला ठेवण्यात आल्याची माहिती रेस्क्यू-पुणेच्या संचालिका नेहा पंचमिया यांनी दिली. त्याला कोणत्याही प्रकारची मोठी दुखापत झालेली नसून तो उत्तमरित्या आहार ग्रहण करत असल्याचे पंचमिया यांनी सांगितले. इंदापूरमध्ये पसलेल्या कालव्याच्या जाळ्यामधून हे पाणमांजर आल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील धरणं आणि इंदापूर तालुक्यामधून वाहणाऱ्या निरा नदीमध्ये पाणमांजरांसंबंधीचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
युरेशियन पाणमांजराविषयी...
युरेशियन पाणमांजर हे निशाचर असून ते गोड्या पाण्याच्या परिसंस्थांमध्ये अधिवास करते. नद्या, तलाव ही त्याच्या अधिवासाची मुख्य ठिकाणं आहेत. मासे हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. पाणमांजराची ही प्रजात एकटे राहणे पसंत करते. जलप्रदूषण त्यांना मानवत नाही. स्मूथ कोटेड आणि स्माॅल क्लाॅड पाणमांजरांच्या विपरीत युरेशियन पाणमांजर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात देखील फार क्वचितच दिसते.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.