घाटकोपर : घाटकोपरमध्ये गेली १५ वर्षे ‘यात्रा पॅटर्न’ आणि ‘विकास पॅटर्न’ राबवला जात आहे. त्यामुळे लोकांचा महायुतीला पाठिंबा आहे. ‘लाडकी बहीण योजने’मुळे महिला सशक्तीकरण करण्यात आले आहे. विरोधकांवर बोलण्यापेक्षा मी माझ्या विकासकामावर बोलणे जास्त पसंत करतो. घाटकोपरमधील विकास कामे पूर्ण करणे हे आमचे ध्येय आहे, असे मत घाटकोपरचे आ. राम कदम ( Ram Kadam ) यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दै.’मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला विशेष संवाद...
मागचे तीन टर्म आपण घाटकोपर पश्चिम मतदार संघातून निवडून येत आहात, या वेळेस जनता आपल्याला आशीर्वाद देईल का?
मागच्या १५ वर्षांत माझ्या मतदार संघात मी केवळ लोकांसाठीच काम करत राहिलो आहे. हा आमदार लोककल्याणासाठी खिशातले पैसे देणारा आहे, घेणारा नाही, अशी माझी प्रतिमा राहिली आहे. माझ्या मतदार संघात हजारो नागरिकांच्या आजारांवर शस्त्रक्रिया झाल्या. त्यांचा जीव वाचवण्याचे पुण्याचे काम माझ्या हातून परमेश्वरने करवून घेतले. त्यामुळे स्वाभाविकपणे ती व्यक्ती तुम्हाला विसरत नाही, तिचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असतात. आजपर्यंत मी असंख्य लोकांची काशी, अयोध्या येथे तीर्थयात्रा घडवली. कोट्यवधी रुपयांची विकासकामे माझ्या मतदार संघात केली आहेत. त्यामुळे आशीर्वादाची ताकद माझ्या पाठिशी आहेच.
या निवडणुकीत आपल्या प्रचाराची दिशा काय आहे, आपण कुठल्या गोष्टींवर भर दिला आहे?
मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत, हीच आमची दिशा राहिली आहे. आरसीटीपासून ते कुर्ल्यापर्यंतचा ४.२ किलोमीटरचा ब्रीज, ज्याची किंमत ७०० कोटी रुपये आहे, तो प्रोजेक्ट लवकरच सुरू होईल. त्यामुळे बीकेसीला चार मिनिटांत पोहोचू शकतो. राजावाडी हॉस्पिटलचे काम आपण डिसेंबरमध्ये सुरू करत आहोत. जिथे कॅन्सरवरील उपचारापासून सर्व रूग्णांसाठी चांगल्या सोयीसुविधा पोहोचवल्या जातील. घाटकोपरसाठी आपण भांडूपपासून पाण्याची वेगळी लाईन आणणार आहोत. अशाप्रकारे घाटकोपरमध्ये ‘तीर्थयात्रा’ आणि ‘विकासयात्रा’ याचा अनोखा संगम आपल्याला बघायला मिळाला आहे. आता यात निवड लोकांना करायची आहे की, खिशातले पैसे टाकणारा आमदार हवा आहे की, २ महिन्यांपूर्वी उगवलेला आणि निवडणुकीनंतर मावळणारा आमदार हवा आहे.
महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीची जी फळी उभी राहिली आहे, तिच्या आव्हानाकडे तुम्ही कसे बघता?
वास्तविक मी विरोधकांबद्दल बोलत नाही. मी माझ्या कामाबद्दल बोलणे जास्त पसंत करतो. माझ्या मतदार संघामध्ये मी ६२ हजार बहिणींना ’लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळवून दिला आहे. याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये ७ हजार, ५०० हजार रुपये पोहचवण्यात यश आले. मी स्वत: महिलांना या योजनेसाठी प्रोत्साहित केले. इतकेच नव्हे तर, काही महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा महाराष्ट्रातील एक रेकॉर्ड ब्रेकिंग नंबर आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तर ‘लाडक्या बहिणीच्या योजने’ला विरोध केला आहे. या योजनेविरोधात ते कोर्टात गेले आहेत. जे लाडक्या बहिणींना विरोध करतात, त्यांना लाडक्या बहिणी कशा मतदान करतील?
आमदार म्हणून घाटकोपर पश्चिमसाठी येत्या पाच वर्षांचे व्हिजन काय असणार आहे?
घाटकोपरसाठी जे अडीच हजार कोटी रुपयांचे प्रोजेक्ट आणले आहेत, ते पूर्णत्वास नेणे हे व्हिजन डोळ्यांसमोर आहे. घाटकोपरची ओळख ही यात्रांसाठी आहे. ‘यात्रा पॅटर्न’ हा घाटकोपरचा आहे. आता डेव्हलपमेंट पॅटर्नसाठी घाटकोपर ओळखला जावा हेच माझे व्हिजन आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत?
जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी सदैव आहे. लोकांनी मला आशीर्वाद म्हणून एक रुपया दिला, त्यांच्याच पैशातून मी फॉर्म भरला आहे. जनतेसाठी काम करायची मला संधी मिळावी, हीच इच्छा आहे. जनतेने आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि मला निवडून द्यावे हीच अपेक्षा आहे.