मुंबई, दि.११ : प्रतिनिधी 'ज्योती गायकवाड चाले जाओ'चा नारा देत धारावीकरांनी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या विरोधात घोषणा दिल्या. धारावीच्या विजयानगर परिसरात आगीची दुर्घटना घडली. या दुर्घटनास्थळी भेट देण्यासाठी आल्या असता धारावीतील नागरिकांनी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गायकवाड कुटुंबाविरोधात रोष व्यक्त केला.
दरम्यान, शुक्रवार दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास धारावीच्या विजयानगर येथील संक्रमण शिबिराजवळ आगीचा भडका उडाला. चिंचोळ्या गल्ल्यांमधून अग्निशमन दलाला या परिसरात आग विझविण्यासाठी यायला जागाही नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशावेळी संतापात नागरिकांनी या घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या विधानसभा उमेदवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांच्या विरोधात घसोहन दिल्या. पुनर्वसन प्रकल्पाला विरोध करणाऱ्या 'ज्योती गायकवाड वापस जाओ'च्या घोषणा यावेळी उपस्थितांनी दिल्या. याचा एक व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे.
धारावीतील या संक्रमण शिबिरातील रहिवासी राजू चौबे म्हणतात,"इथे एवढी मोठी आग लागली आहे. इथे माझे घर आहे परिवार आहे. या आगीमुळे माझा परिवार, लहान मुलं आणि आजूबाजूचे नागरिक घाबरले आहेत. इथे अग्निशमनची गाडी देखील येऊ शकत नाही. आमचे जीव धोक्यत आहेत. गाडी यायला आणखी १५ मिनिटे उशीर झाला असता तर हा ट्रान्झिट कॅम्प पूर्ण जाळून खाक झाला असता.हे धारावी बचाव नाही धारावीत आगी लावा असे काँग्रेसचे आणि गायकवाड परिवाराचे व्हिजन आहे. मागील ४० वर्षांपासून गायकवाड परिवाराने धारावीचा विकास होऊ दिला नाही. आम्हाला राजकारणं करायचे नाही मात्र आमच्या बालकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला धारावीचा विकास हवा आहे," अशी तीव्र भावना या रहिवाशाने व्यक्त केली.
पुढे चौबे म्हणाले,"इथे कशाला, तमाशा बघण्यासाठी आले आहात? इतकावेळ कुठे होते हे लोक? सर्व बचावकार्य स्थानिकांनी आणि इथल्या नागरिकांनी सुरु केले. कोणाचा मृत्यू झाला असता तर केवळ शोक व्यक्त करायला आले असते. यांना धारावीकरांचा सौदा करून केवळ स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत. धारावीचा विकास अडाणी करत आहेत की अंबानी याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. आम्हाला आमच पक्के घर हवं आहे. मात्र हा विकास रोखणारा काँग्रेसचा गायकवाड परिवार आहे", अशा संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.