मुंबई : अभिनेत्री-निर्माती तेजस्विनी पंडित सध्या तिच्या ‘येक नंबर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची ती निर्माती तर होतीच पण त्यात तिने उत्तम भूमिका देखील साकारली होती. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस्विनी पंडितने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्विनी मावशी झाली आहे. तेजस्विनीची बहिणी पूर्णिमा पुलन आई झाली असून तिने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. या चिमुकलीबरोबरचे खेळतानाचे फोटो शेअर करून तेजस्विनीने मावशी झाल्याचं जाहीर केलं आहे. तेजस्विनीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
तेजस्विनीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, झ्यासाठीची सगळ्यात ‘मोठी’, सगळ्यात ‘खास’ आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींने मला दिली आहे. आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली! अनेक वर्ष ह्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला १४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला. त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षण च नव्हे तर आयुष्य देखील या ‘कन्यारत्नाने’ उजळून टाकले! आमच्या कुटुंबाची “कथा” सुफळ संपूर्ण म्हणुया? ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय! होऊ दे खर्च. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ! शुभ दीपावली ! शुभं भवतु