’आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्त रंगात न्हाऊन आली’. खरंच दिव्यांचा हा सण, प्रत्येकाच्या जीवनातून दु:खाची झालर बाजूला सारतो आणि आपल्या लख्ख प्रकाशाने सुखाची किरणे, आपल्या आयुष्यात आणतो. दिवाळी म्हणजे रोषणाई, रंगीत रांगोळी, फटाके, फराळ आणि बरंच काही. त्यामुळे यावर्षी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या मुलींशी, अर्थात वंदना गुप्ते आणि राणी वर्मा यांच्यासोबत गप्पा मारत, त्यांच्या दिवाळीच्या काय विशेष आठवणी होत्या आणि त्या दिवाळी कशा साजरा करत होत्या, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बालपण आमचं सगळं पुण्यात गेलं. त्यामुळे पुण्याचे जे सांस्कृतिक संस्कार आहेत, ते आम्हां वर्मा बहिणींवर, बालपणापासून झाले. आम्ही चार बहिणी आणि आमचे मामे भाऊ-बहिण, अशी आम्ही दहा-अकरा भावंडं होतो. आम्ही सगळेजण एकत्र दिवाळीची धम्माल करायचो. बरं दिवाळी म्हटलं की, सणासुदीला सगळे एकत्र बर्याच दिवसांनी भेटल्यामुळे, घरातच आम्ही खेळदेखील खेळायचो. क्रिकेट, विटी दांडू असे अनेक खेळ खेळत, आनंदात आमचा सण जायचा. दिवाळीच्या दिवशी किल्ला तयार करणे , हा आम्हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय होता. जिथे आम्ही दिवाळी साजरी करायचो तो वाडा होता. त्यामुळे एक संपूर्ण खोली आम्हाला किल्ल्याच्या उभारणीसाठी दिली होती. त्यातील अर्ध्या जागेत आम्ही, शिवरायांचा किल्ला तयार करायचो. त्यावेळी मावळे, तोफ, किल्ल्यावर ठेवण्यासाठी लहान खेळणी विकत मिळत होती.ती किल्ल्यावर ठेवून आम्ही, तो किल्ला पूर्ण उभारायचो. शिवरायांच्या गडावर जाण्यासाठी, पायवाटदेखील आम्ही तयार करायचो.
पण, गंमत म्हणजे आम्ही सिमेंटचा वापर करायचो. अर्थात तेव्हा फार काही आम्हाला समजत नसे. कारण, लहान होतो आणि मुळात आमच्या पालकांना आम्ही किल्ला बनवण्याची परंपरा पुढे नेत आहोत, याचे फार कौतुक असे. महत्त्वाचे म्हणजे, किल्ला उभारायला सुरुवात करण्यापूर्वी, आम्ही मातीत बिया पेरायचो. जेव्हा किल्ला उभारणीला सुरुवात होयची, तेव्हा खूप छान गवत उगवलेले असायचे आणि सुंदर हिरवळ किल्ल्याभोवती पसरलेली दिसायची. आमच्या किल्ल्याची आणखी एक खासियत होती, ती म्हणजे किल्ल्यावरुन विमान उडायचे.किल्ल्यावर आम्ही दोरी बांधायचो आणि कोणी किल्ला पाहायला आले की, दोरीच्या एका टोकाहून दुसर्या टोकाला, आम्ही विमान सोडायचो. शिवाय पायवाटेवर इलेक्ट्रिकचे दिवे लावून, एकूणच किल्ला बांधण्याचा हा पारंपरिक खेळ, आम्ही थोडा आधुनिक देखील करायचो. आम्ही भावंडांनी मिळून तयार केलेला किल्ला पाहण्यासाठी, जमलेल्या गर्दीतून काही जण आनंदाने पैसे द्यायचे. मग त्या पैशांतून, आम्ही आईस्क्रिमचा आस्वाद घ्यायचो.
बरं दिवाळी म्हटलं की, फटाके आलेच. पण, घरात 10-12 भावंडं असल्यामुळे, खिशाला परवडतील इतकेच फटाके आणले जायचे. मग आम्ही सगळेजण फटाके वाटून उडवायचो. लवंगी, पाऊस, फुलबाजी, सुतळी बॉम्ब, भुईचक्र असे सगळेच फटाके, जसा ’एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता’ असे म्हणतात, तसे आम्हा प्रत्येकाच्या वाट्याला, या सगळ्या फटाक्यांचा मिळून एक-एक वाटा यायचा. अतिशय आनंदाने ते फटाके उडवत आम्ही दिवाळीच्या सणाचा मनसोक्त आनंद घेत, खूप मजा करायचो.
दिवाळी किंवा इतर सगळ्याच सणांनी आम्हाला, तडजोड करण्यास शिकवलं. कायम एकत्र कुटुंबासोबत राहायचं असेल तर तडजोड गरजेची आहे, हे आपसूकच आम्ही शिकलो. त्याचा फायदा आजही होतो. कारण, जे सण आम्ही भावंडं लहानपणी एकत्र साजरे करायचो, ते आजही आम्ही भेटतो आणि पुन्हा त्या जुन्या आठवणीत रमतो.
किल्ला झाला, फटाके झाले, आता पहिली अंघोळ म्हणजे दिव्यच! त्याहूनही मोठी बाब म्हणजे, आम्ही सदाशिव पेठेत राहत होतो. त्यामुळे तिथे पहिला फटाका हा आम्हीच वाजवला पाहिजे, असा आमचा अट्टहास असायचा. त्यासाठी पहाटे तीन वाजता उठून, कधी-कधी अंघोळही न करता आम्ही फटाके वाजवायचो. त्यानंतर मग घरातील मोठी मंडळी, आम्हाला अभ्यंगस्नान घालायचे. असा साग्रसंगीत कार्यक्रम पहिल्या अंघोळीचा घरात होत असे. पहिला फटाका वाजवून झाला, पहिली अंघोळ झाली की, मग आम्ही सगळी भावंड तुटून पडायचो ते फराळावर. आमच्या घरात जवळपास 20-25 माणसं असायची. त्यामुळे फराळ बनवण्यासाठी, आमच्याकडे आचारी घरी यायचे.
घरात एक स्वयंपाकघर होतं. जे फक्त दिवाळीत फराळ बनवण्यासाठी, आचारी वापरत असत. मोठाले डब्बे भरतील, इतक्या चकल्या, करंज्या, चिवडा, लाडू तयार केले जायचे. आम्ही दिवाळी संपायच्या आधीच,सारे काही फस्तही करायचो. आमचे आचारी आम्हा लहान मुलांना, अगदी लहान आकाराचे सगळ्या फराळाचे पदार्थ करुन द्यायचे आणि त्याचा वापर आम्ही भातुकलीचा खेळ खेळताना करत असू. पण, आम्ही बालपणी केलेली सगळी मजा-मस्ती आज जशी आठवते, तसेच एकत्र कुटुंब पद्धतीत राहून आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने घालवला आहे, याचे आम्हाला विशेष समाधान देखील वाटते.