वंदनांची संघर्ष कथा

    09-Oct-2024   
Total Views |
 
Vandana Shailesh Article
 
लहानपणापासून संघर्षमय जीवन जगत, आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आलेल्या आव्हानांवर मात करत वंदना शैलेष मुळे (Vandana Mulay Article) यांनी यशाचं शिखर गाठलंय. त्या प्रवासाविषयी...
 
आजच्या स्त्रीचे आयुष्य केवळ स्वयंपाकघरापुरतेच मर्यादित न राहता, ती समाजातील प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर काम करताना दिसू लागली आहे. अगदी ‘वंदे भारत’ रेल्वेची लोकोपायलट म्हणून एक मोठी जबाबदारीही ती आज पार पाडतेय. अशीच एक स्त्री, जिने आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आलेल्या आव्हानांवर मात करत, उंच शिखर गाठले आहे, ती स्त्री म्हणजे वंदना शैलेष मुळे.
 
वंदनाताई, सध्या ‘केसरी टूर्स’मध्ये इव्हेंट्स व मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. दि. २५ जुलै १९६६ रोजी गुजरातच्या बडोदा येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या अगदी चौथ्या वर्षी त्यांच्या आईचे कर्करोगामुळे निधन झाले. वडील ’हिंदुस्तान ब्राऊन बॉवरी’मध्ये नोकरीला होते. आई गेल्यामुळे वडिलांपुढे प्रश्न पडला की, चार वर्षांच्या या मुलीची काळजी कोण घेणार? तिला कोण सांभाळणार? त्यामुळे मग नातेवाईकांकडे विचारपूस करण्यास सुरुवात झाली. मात्र, प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीत अडकलेला. त्यामुळे लगेच कोणी त्यांचा सांभाळ करायला तयार झाले नाही. समोर काहीच पर्याय नसल्याने, वडिलांनी वंदनाताईंना काही दिवस अनाथाश्रमात ठेवायचा निर्णय घेतला.
 
वंदनाताईंच्या आजींना ही गोष्ट कळताच त्यांनी पुढाकार घेऊन, वंदनाताईंना सांभाळायचा निर्णय घेतला. त्यांना घेऊन आजी इंदोर येथे मावशीकडे निघून आल्या. तिथेही अडीअडचणी येत होत्याच. त्यामुळे आजींनी स्वयंपाक करण्याचं काम हाती घेतलं. एका पत्र्याच्या खोलीत राहून, दोघींनी पुढचा प्रवास सुरु केला. त्यानंतर एका सरकारी हिंदी शाळेत वंदनाताईंचं शिक्षण सुरु झालं. त्यादरम्यान झालेल्या प्रचंड पावसामुळे वंदनाताईंना न्युमोनिया झाला. तेव्हा आजींनी लगोलग वडिलांना तार केली आणि सांगितलं की, आता मुलीला सांभाळण कठीण जातंय, तुम्ही घ्यायला या. त्यानंतर वडील वंदनाताईंना घेऊन बडोद्यात आले. बडोद्यात मोठ्या काकांनी त्यांचा पुढचा सांभाळ केला. शंकर टेकडी येथील मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत त्यांच पुढचं शिक्षण झालं. त्याही काकांना चार मुलं. त्यामुळे काळ जसा पुढे सरसावत होता, तसं वंदनाताईंची जबाबदारी उचलणंही कठीण वाटू लागलं. बडोद्याजवळ वर्णामा गावातील एका शाळेत आठवीपर्यंत गुजराती भाषेत त्या शिकल्या. शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थिनी, सगळ्या गोष्टींत सहभाग असायचा. खर्‍या अर्थाने या शाळेनेच त्यांना घडवलं. बुद्धीची देवता देवी सरस्वतीबद्दलची भावना पहिल्यांदा तेव्हा त्यांच्या मनात जागृत झाली, आणि त्यांचे व्यक्तिमत्व बहरत गेलं. आठवीत असताना वडिलांचे आजारपणात निधन झालं. वडिलांनी आधीच सांगून ठेवलं होतं की, काहीही झालं तरी पदवी पर्यंतचे शिक्षण घेयचेच, त्यामुळे लग्नाबाबत आपले चुलते घाई करत असले, तरी वंदनाताई पदवी पूर्ण करायच्या बाबतीत ठाम होत्या. आपलं शिक्षण पूर्ण करायचं, हे त्यांनी ठरवलंच होते. या निर्णयाशी चुलते असहमत असल्याने, ते घरदेखील त्यांना सोडावे लागलं.
 
त्याकाळात बडोद्यामध्ये मुलींचे वसतिगृह होते. परंतु, ’सातच्या आत घरात’ हा नियम ठरलेला. त्यांच्या राहत्या ठिकाणीच जयवंत मावशी म्हणून होत्या. त्यांची मुलगी बडोद्याच्या ‘एक्स्प्रेस हॉटेल’मध्ये नोकरीला होती. तिचं लग्न ठरलं म्हणून हॉटेलमध्ये एक जागा अर्थातच शिल्लक राहणार होती. आपली आर्थिक गरज पाहाता वंदनाताईंनी ही नोकरी करायचे ठरवले. सर्वच नवीन असल्याने, सुरुवातीला काही अडथळे आले. मात्र हॉटेलमधले व्यवस्थापक आणि तिथल्या इतर कर्मचार्‍यांनी सांभाळून घेतलं. एकीकडे पदवीची तयारी आणि दुसरीकडे हॉटेलमधील कामे, अशी कसरत सुरु झाली. सुनिता विनोद म्हणून त्यांची एक मैत्रीण होती. तिचे वडील आरटीओ ऑफिसर. घरात अत्यंत शिस्तप्रिय वातावरण. मात्र जेव्हा सुनिता यांनी वंदनाताईंबद्दल त्यांच्या घरी सांगितलं, तेव्हा वंदनाताईंची संपूर्ण जबाबदारी घ्यायची घरच्यांनी एका क्षणात ठरवलं. त्यांना कधीच परकं वाटू दिलं नाही. अगदी मोठ्या मुलीप्रमाणे त्यांचा सांभाळ केला. पुढचं शिक्षण, लग्न या सर्व गोष्टी सुनिता यांच्या घरच्यांनीच पाहिल्या.
 
लग्नानंतर त्या जळगावला आल्या. पती शैलेश मुळे हे शेतीव्यवसाय सांभाळायचे. वंदनाताईंच्या सासरच्या माणसांनीसुद्धा त्यांना मोठा पाठिंबा दिला. घरी न बसवता त्यांना नोकरी करण्यात सहमती दर्शवली. मुलगी मीरा ज्या शाळेत शिकली, त्या शाळेत बालवाडीत हेल्पिंग टिचर म्हणून वंदनाताईंनी कामाला सुरुवात केली. ज्ञान प्रबोधिनीच्या सेमिनारमधून मॉन्टेसरीचा कोर्स शिकल्या, ब्युटी पार्लरचा कोर्स केला. ‘स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान’ येथे साडेचार वर्षे नोकरी केली. ‘लोकमत सखी मंच’मध्ये असताना पत्रकारितेचा कोर्स केला. १२ वर्षे तिथे काम करण्याचा अनुभव मिळाला. ‘सिटी केबल’वर न्यूज रिडम म्हणून काम पाहिले. या संपूर्ण प्रवासात मोठमोठ्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळाले. ‘केसरी टूर्स’मध्ये काम करताना, स्वतः केसरी भाऊंसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ‘जैन इरिगेशन’मध्ये असताना, भवरलाल जैन व अशोक जैन यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. हा संघर्षमय प्रवास करत असताना केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर प्रत्येक वळणावर त्यांना निरनिराळी माणसं वाचता आली. आयुष्याचा प्रत्येक टप्पा वंदनाताईंसाठी एक आव्हान होतं. ज्यावर त्या साहसाने मात करत गेल्या. आज वंदनाताई ‘केसरी टूर्स’च्या इव्हेंट्स व मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. ’त्या सेल्फमेड आहेत’ ही त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराने व नातलगांनी दिलेली पोचपावती त्यांच्यासाठी खरा पुरस्कार आहे, असं त्या म्हणतात. दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराच्यावतीने वंदना मुळे यांना पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.
   
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक