स्मरण एका सेवाव्रतीचे...

    09-Oct-2024
Total Views | 26
 
Parvatibai Athawale
 
पार्वतीबाई आठवले म्हणजेच मावशींची ओळख फक्त महर्षी कर्वे यांची मेव्हणी म्हणून नव्हती, तसेच त्यांची ओळख ही केवळ आनंदीबाई (बाया) कर्वे यांची धाकटी बहीण एवढीच नव्हती, तर त्यांची ओळख एक थोर सामाजिक कार्यकर्ती, एक लेखिका म्हणून, १९१८ मध्ये निर्भीडपणे परदेशात एकटी जाऊन तिथे उत्तम व्याख्याती म्हणून नाव कमाविणारी, अनाथ व गरीब बालविधवा मुली व महिलांना मायेची ऊब देणार्‍या मावशी अशी होती. अण्णांच्या आश्रमात येणार्‍या प्रत्येक मुलीसाठी त्या एक आधारवड होत्या. त्यांचे पुण्यस्मरण...
 
श्रमात येणार्‍या गरजू मुली व महिलांकरिता अपार सहानुभूतीची भावना जगणार्‍या पार्वतीबाई, या मुलींचे दुःख स्वतः जगलेल्या होत्या. पार्वतीबाईंचा जन्म १८७० साली एका गरीब कुळात झाला. त्या काळातील प्रथेप्रमाणे लहान वयातच त्या आठवल्यांच्या घरात लग्न होऊन गेल्या. आपल्या प्रपंचात रमलेल्या पार्वतीबाईंनी तीन अपत्यांना जन्म दिला. त्यांचा प्रपंच आनंदाने फुलत असतानाच, काविळीचे निमित्त होऊन त्यांच्या यजमानांचे निधन झाले. पतीवियोगानंतर आयुष्यात आलेले एकटेपण, दुःख व मुलांची काळजी त्यांच्या पदरी पडली होती. पुढे काय? हा प्रश्नही त्यांच्या समोर होताच. त्यात सासरी कोणीही नसल्याने आपले व मुलांचे भविष्य काय? हा यक्षप्रश्नही त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला होता. त्याकाळी विधवा स्त्रियांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक, ही कठोर व अनेक अंगांनी निर्दयी व अमानवी अशी होती. सर्वांगीण विचार करून पार्वतीबाई आपल्या मुलांसह माहेरी परतल्या. केशवपनाचे अघोरी वास्तव स्वीकारुन त्यांनी आयुष्य जगायला सुरुवात केली. मात्र, त्यांच्या हातून अनेक विधवा व अनाथ मुली-स्त्रियांच्या शिक्षणाचे मोठे कार्य घडणार होते, याची साधी कल्पनाही त्यांना त्यावेळी नव्हती. देवाने त्यांच्याकरिता एक वेगळेच नियोजन केले होते. पार्वतीबाईंचे दुःख जाणून, महर्षी कर्वे (अण्णांनी) त्यांना पुण्याला हिंगणे आश्रमात मदतीला बोलावून घेतले. पार्वतीबाई या आपल्या मुलांसह आश्रमात आल्या. या घटनेने पार्वतीबाईंच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली, व सुरु झाले मावशींच्या आयुष्यातील एक विधायक कार्याचे पर्व.
 
अण्णांच्या मदतीला म्हणून आलेल्या पार्वतीबाईंना आश्रमात अनेक कामे शिकायला मिळाली. जबाबदारीचे भान राखत, अत्यंत संयमाने, त्या अनेक जबाबदार्‍या पार पाडत होत्या. पार्वतीबाईंचा आश्रमातील वावर, जबाबदारीने काम करण्याची वृत्ती, मेहनती स्वभाव, गरीब अनाथ मुली व स्त्रियांना मायेने सांभाळण्याचे कसब, व मुख्य म्हणजे या कामातील त्यांची समपर्णाची भावना पाहाता, अण्णांनी त्यांना पुढील शिक्षणाकरिता हुजूरपागा शाळेत घातले. पार्वतीबाईंनी अगदी मनापासून अभ्यास करून, ट्रेनिंगची स्कॉलरशिप मिळवली. खरं तर समोर आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोनेच केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यात त्यांची अण्णांना बहुमोल मदत होऊ लागली. या कार्यावरील त्यांच्या निष्ठा, प्रेम व विश्वास यांमुळे त्यांनी, स्वतःला या कामात कोणत्याही मर्यादा न बाळगता पूर्णवेळ झोकून दिले. पुढे आश्रमाच्या पहिल्या सुप्रिटेंडन्ट म्हणूनही त्यांनी अत्यंत कुशलतेने, आपल्या कामाची छाप पाडली. अण्णांच्या कार्याचा वाढता व्याप पाहाता, त्याचे नेटके व्यवस्थापन सांभाळण्याच्या दृष्टीने त्या सर्वार्थाने क्रियाशील होत्या. विधवा स्त्रियांच्या आश्रमाची स्थापना, केशवपनासारख्या रुढी-परंपरांना विरोध, स्त्रीशिक्षण, अनाथ मुलांचा सांभाळ असे अनेक प्रश्न आश्रमापुढे आ वासून उभे होते. मात्र, हे प्रश्न सोडविण्यासाठी लागणारे आर्थिक बळ त्याकाळी बेताचे होते. संस्थांत्मक कार्यात दैनंदिन व्यवस्था व या कार्याची माहिती सर्वदूर पसरत होणारा कार्याचा विस्तार, याकरिता सातत्याने आर्थिक स्रोत उभे राहणे आवश्यक असते. आश्रमाच्या कार्याला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी खूप प्रवासही सुरु केला.
 
अगदी देशाच्या कानाकोपर्‍यात त्या एकट्या प्रवासासाठी निर्धोक जात, आणि १ हजार ते १ हजार ५०० रुपयांची वर्गणी जमा करुन आणीत. तो काळ लक्षात घेता, ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडत नसत, त्या काळात एक बाईमाणूस एकटी अखंड हिंदुस्थानात प्रवास करते, आणि तिचे हे प्रवास करणे म्हणजे दिव्यच होते! अपमान, अवहेलना, शिव्याशाप देणार्‍या समाजाकडे दुर्लक्ष करीत, हाती घेतलेल्या कार्यात संपूर्ण समर्पण देणार्‍या पार्वतीबाई कधीही भावनिक, मानसिक स्तरावर डगमगल्या नाहीत, हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य म्हणावे लागेल. आयुष्यातील कटू अनुभवांचा थेट परिणाम त्यांची धीट व घाडसी मानसिकता घडविण्यात झाली. याकामाकरिता पार्वतीबाईंनी फक्त भारतात प्रवास केला असे नाही, तर परदेशातदेखील एकटीने प्रवास केला. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी भाऊबीज फंडाचे कार्य उभे केले. याकरिता त्यांनी भाषण व वक्तृत्वकला प्रयत्नपूर्वक आत्मसात केली.
१९१८ मधे वयाच्या ४७व्या वर्षी त्या एकट्या अमेरिकेत व फ्रान्सला गेल्या, आणि जमवलेल्या पैशातून अमेरिकन स्कॉलरशिप फंडाची स्थापना केली. यातून अनेक स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली. पुढे या कार्याचे फलित लक्षात येऊ लागता, लोकसुद्धा स्वतःहून मदतीसाठी पुढे येऊ लागले. भाऊबीज फंड ही संकल्पनादेखील सामान्य लोकांपर्यत पोहोचविण्याच्या दृष्टीने, संस्थेतील इतर कार्यकत्यांसह घरोघरी जाऊन मावशीसुद्धा भाऊबीज फंडासाठी निधी गोळा करीत असत. भाऊबीज फंडाद्वारे संस्थेस मोठ्या देणगीदारांपेक्षाही हितचिंतक जोडण्याच्या संकल्पनेस आज १०३ वर्षानंतरही, तितकाच उत्साहपूर्ण प्रतिसाद समाजातून प्राप्त होत आहे. याचे श्रेय काही अंशी मावशींच्या प्रयत्नांनाही नक्कीच आहे. हिमालयाची सावली झालेल्या पार्वती मावशी आयुष्यभर कष्ट करीत उतार वयाकडे झुकल्यावरही , संस्थेच्या कार्याला हातभार लावीत होत्या. अण्णांनी घेतलेले व्रत या कार्ययोगिनीने वसा म्हणून स्वीकारले, आणि स्त्रीसुधारणेला आपले आयुष्य समर्पित केले. १९२८ साली त्यांनी ‘माझी कहाणी’ या नावाने आत्मचरित्रही लिहिले. या आपल्या आत्मचरित्रात त्या म्हणतात, अण्णा आणि बायोच्या मायेचा परीसस्पर्श झाला, आणि या लोखंडाचे सोने झाले! पण खरं तर, अंगीभूत झळाळी असेल तरच, सोन्याचा कस अजून तेजाळून येतो नं? तसेच, पार्वतीबाई आठवले मावशींचे आहे. खरं तर, अण्णा आणि बायोंच्या सानिध्यात हे सोने अजून तेजाळून आले. स्वतःचा अंधार उजळून टाकताना या तेजस्विनीने अनेक पीडित एकाकी स्त्रियांचे आयुष्य उजळून टाकले, हे त्यांच्या कर्तृत्वाचे व समपर्णाचे वैशिष्ट्य आहे, हे नक्की. दि. १० ऑक्टोबर १९५५ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी या सेवाव्रतीने या जगाचा निरोप घेतला. मात्र, आपल्या कामातून आजही त्या स्त्रीशिक्षण या विषयातील कार्यात आदरस्थानी आहेत. संस्थेतील त्यांच्या समाधीपुढे उभ्या राहणार्‍या प्रत्येक स्त्रीकरिता त्या एक अखंड ऊर्जेचा स्रोत आजही आहेत. या हिमालयाच्या सावलीच्या म्हणजेच, कार्यव्रती योद्धा संन्यासिनीच्या पवित्र स्मृतीस आज त्यांच्या पुण्यतिथीस कृतज्ञतापूर्वक वंदन.
 
स्मिता कुलकर्णी

(लेखिका महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121