मुंबई, दि.०८: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून अवघ्या ९ महिन्यात एकूण १३ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. गोरगरीब, गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी रूग्णांना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. वैद्यकीय कक्षाचा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आलेख उंचाविला आहे.
जानेवारी ते सप्टेंबर २०२४पर्यंत कक्षाच्या माध्यमातून ४१८ रुग्णांना मदत झाली आहे. ह्रदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुर्नस्थापना शस्त्रक्रीया (Replacement Surgeries), यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रीयेंचा समावेश आहे. गोर-गरीब रुग्णांनी धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मदत कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे ४६८ रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे १२ हजार बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, मुंबई, एन.एन रिलायन्स, मुंबई, सह्याद्री हॉस्पीटल, पुणे, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे इत्यादी नामांकीत रुग्णालयांचा समावेश आहे. निर्धन रूग्णाकरीता वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख ८० हजार पर्यंत असून अशा रूग्णांना मोफत उपचार तर १.८० लाख ते ३.६० लाख या वार्षिक उत्पन्न दरम्यान गरीब रूग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतात. कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, हृदय प्रत्यारोपन अशा महागड्या शस्त्रक्रीया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात. सद्यस्थितीत कक्षाचे कामकाज ऑफलाईन पध्दतीने आहे. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo@maharashtra. gov.in या ईमेल आयडी वर मेल करु शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देवू शकतात.