"महाराष्ट्राची सर्कस झालीये! कुणी विदुषकी चाळे करतं, तर कुणी..."; राज ठाकरेंची टीका
07-Oct-2024
Total Views | 30
पुणे : महाराष्ट्राची सर्कस झालीये. कुणी विदुषकी चाळे करतात तर कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारतात, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. सोमवारी राज ठाकरेंच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, "आज महाराष्ट्राची राज्याची सर्कस झाली आहे. कुणी विदुषकी चाळे करतात तर कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारतात. महाराष्ट्राच्या राजकारणात कित्येक लोकं असे आहेत ज्यांना जाळ्यांशिवाय उड्या मारायला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, तिथे त्यांना कान धरून जमिनीवर आणणं, शिकवणं आणि सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्या अधिकारवाणीने बोलू शकता."
"महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे. त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा खूप खालच्या थराला गेली आहे आणि त्यांना समजावणारं कुणीच नाही. त्यामुळे साहित्यिकांनी ही जबाबदारी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यीकांनी एक सामाजिक चळवळ उभी करणं गरजेचं आहे," असेही ते म्हणाले.