भारताच्या मदतीबद्दल मालदीव कृतज्ञ – राष्ट्राध्यक्ष मुइज्जू
07-Oct-2024
Total Views | 21835
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू (Pm Modi And President Muijju) यांनी सोमवारी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ठ आणि विशेष संबंध दृढ करण्यासाठी केलेल्या प्रगतीची दखल घेतली.
भारत आणि मालदीवचे संबंध शतकानुशतके जुने आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी आणि जवळचा मित्र आहे. भारताच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि सागर व्हिजनमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, द्विपक्षीय बैठकीत संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. भारत, मालदीव यांनी अड्डू येथे भारतीय वाणिज्य दूतावास आणि बेंगळुरूमधील मालदीव वाणिज्य दूतावास उघडण्याबाबत चर्चा केली. याशिवाय एकता हार्बर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याविषयी एकमत झाल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू म्हणाले की, आम्ही एका सर्वसमावेशक व्हिजन डॉक्युमेंटवर सहमत झालो आहोत, जो आमच्या द्विपक्षीय संबंधांची दिशा ठरवेल. सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या दृष्टिकोनामध्ये विकास सहकार्य, व्यापार आणि आर्थिक भागीदारी, डिजिटल आणि आर्थिक उपक्रम, ऊर्जा प्रकल्प, आरोग्य सहकार्य तसेच सागरी आणि सुरक्षा सहकार्य यांचा समावेश आहे. ते म्हणाले की, सरकारी रोखे विस्तारित करणे आणि चलन अदलाबदल करारांवर स्वाक्षरी करण्यासह भारताने दिलेल्या उदार मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मालदीवमध्ये भारतीय गुंतवणूक वाढवण्यासाठी भारतासोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यास उत्सुक आहे. मालदीवसाठी भारत हा सर्वात मोठा पर्यटन स्त्रोत आहे आणि अधिक भारतीय पर्यटकांचे स्वागत होईल अशी अपेक्षा आहे, असेही मुइज्जू यांनी यावेळी नमूद केले.