पुणे : दिल्ली येथे नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दि. २१ दि. २२ आणि दि. २३फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीत हे संमेलन होणार आहे.
‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’च्या रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. भवाळकर या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील अवघ्या सहाव्या महिला संमेलनाध्यक्ष ठरल्या आहेत. यापूर्वी कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष आणि डॉ. अरुणा ढेरे यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. डॉ. अरुणा ढेरे यांनी २०१९ मध्ये यवतमाळ येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर पाच वर्षांनी महिला साहित्यिक संमेलनाध्यक्षपदावर निवडल्या गेल्या आहेत.
संमेलनाध्यक्षपदासाठी यंदा डॉ. भवाळकर यांच्यासह कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची नावे चर्चेत होती. बैठकीच्या अखेरच्या क्षणी डॉ. तारा भोवळकर आणि विश्वास पाटील यांची नावे पुढे आली. या दोघांमध्ये डॉ. तारा भवाळकर यांच्या नावाला अधिक पसंती दर्शवली गेल्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी केली. या बैठकीस ‘अ. भा. मराठी साहित्य महामंडळा’च्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, राजन लाखे, प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे, दादा गोरे, रामचंद्र कालुंखे, किरण सगर, कपूर वासनिक, संजय बच्छाव, विद्या देवधर यावेळी उपस्थित होते.
यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मशास्त्री जोशी यांनी भूषवले होते. आगामी संमेलनासाठी त्याच तोलामोलाचे आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या साहित्यिकाची निवड करण्याचे आव्हान महामंडळासमोर होते. तसेच, दिल्लीतील संमेलनाचे अध्यक्ष निवडताना वादग्रस्त नसतील आणि सर्वांची संमती असेल, अशी अध्यक्ष निवडण्याची भूमिका महामंडळाची होती. त्यातून डॉ. भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
डॉ. तारा भवाळकर यांचा परिचय
डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म दि. १ एप्रिल १९३९ साली झाला. प्रामुख्याने वैचारिक लेखन करणार्या एक मराठी लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला विषयांवर लेखन केले आहे. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम आणि निवृत्त झाल्यावर पुण्यातील ‘ललित कला अॅकॅडमी’ आणि ‘मुंबई विद्यापीठ लोककला अॅकॅडमी’मध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून काम पाहात होत्या. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या कार्यातही त्यांचे योगदान आहे. ‘तिसर्या बिंदूच्या शोधात’, ‘प्रियतमा’, ‘मरणात खरोखर जग जगते’, ‘मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे’, ‘मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद’, ‘यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा’, ‘लोकनागर रंगभूमी (माहितीपर)’, ‘लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा’ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.