रशिया-युक्रेन युद्ध आणि भारताचा दारूगोळा : एक विश्लेषण

    05-Oct-2024
Total Views | 69
russia ukraine war india weapons
 
 
भारत हा जगातील प्रमुख शस्त्रास्त्र निर्यातक देशांपैकी एक आहे. भारतातून विविध प्रकारचे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा निर्यात केला जातो. या पार्श्वभूमीवर भारताचा दारूगोळा युक्रेनकडे जात असल्याच्या बातम्यांनी चर्चेला उधाण आले आहे. त्यानिमित्ताने या विषयाचा घेतलेला हा सखोल आढावा...

रशिया-युक्रेन युद्धामध्ये दारूगोळ्याची गरज
 
रशिया-युक्रेन युद्धाचे सावट अजूनही जगावर आहे. या युद्धामध्ये प्रचंड प्रमाणात हत्यारे आणि दारूगोळा वापरला जात असल्याने, जगभरातील शस्त्रास्त्र बाजारात तेजी आली आहे. या युद्धात भारताने मध्यस्थीची भूमिका घेतली आहे.

युद्धभूमीवरती शस्त्रांचे आयुष्य हे अनेक वर्षं असते. परंतु, दारूगोळा एकदा फायर झाला की, पुन्हा वापरता येत नाही. त्यांच्या ऐवजी नवीनच दारुगोळा खरेदी करावा लागतो. यामुळेच युक्रेनला दारुगोळा आयात करण्याकरिता वेगवेगळ्या देशांकडून मदत घ्यावी लागते.
 
सुरुवातीला युक्रेनला युरोपमधल्या सगळ्या देशांनी आपल्याकडे असलेली जुनी शस्त्रे आणि जुना दारुगोळा दिला. परंतु, युद्ध दीर्घकाळ सुरू असल्यामुळे, आता सगळा जुना दारूगोळा संपला आहे.

 
अमेरिका दारूगोळा पुरवू शकत नाही

जगातला सर्वात मोठा शस्त्र आणि दारुगोळा निर्यात करणारा देश अमेरिकासुद्धा पुरेसा दारूगोळा हा वेगवेगळ्या देशांना पुरवू शकत नाही. याचे दोन मुख्य कारणे आहे, एक तर इस्रायल आणि ‘हमास’ मध्ये चाललेले युद्ध, जे अमेरिकेकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे आणि दुसरे अमेरिकेमध्ये असलेली भीती. सध्या चाललेल्या वेगवेगळ्या युद्धाचा फायदा घेऊन चीन तैवानवर लष्करी हल्ला करून कब्जा करु शकतो. म्हणून अमेरिका वेगाने तैवान, जपान आणि इतर मित्रराष्ट्रांची लढण्याची क्षमता वाढवत आहे, ज्यामध्ये दारूगोळा पण सामील आहे. यामुळेच अमेरिकेकडे युक्रेनला दारूगोळा पुरवण्याची फारशी क्षमता शिल्लक नाही. चीन अर्थातच युक्रेनला दारूगोळा पुरवणार नाही. मात्र, रशियाला चीन नक्कीच दारूगोळा पुरवत आहे.

भारताच्या काही कंपन्यांनी युक्रेनला तोफगोळ्यांचे शेल केसिंग निर्यात केली आहेत. यामुळे भारत प्रत्यक्षपणे युद्धात सहभागी नसला, तरी अप्रत्यक्षपणे युक्रेनला मदत करत आहे.


भारतातून तोफ गोळ्यांचे शेल केसिंग निर्यात

भारतातून तोफ गोळ्यांचे शेल केसिंग निर्यात केले जात आहे. हे शेल केसिंग हे तोफ गोळ्यांचा एक महत्त्वपूर्ण घटक असते. युरोपमधल्या काही कंपन्या भारतातून तोफ गोळ्यांचे शेल केसिंग आयात करून युरोपमध्ये त्यामध्ये स्फोटक भरून ते युक्रेनला विकत आहे. म्हणजेच भारताचा दारूगोळा युक्रेनकडे थेट जात नाही, परंतु युरोपमधल्या कंपन्या भारताकडून दारूगोळ्याचे केसिंग आयात करून युक्रेनला निर्यात करत आहेत. केसिंग निर्यात करण्यामध्ये पुणे स्थित भारत फोर्ज ही एक मोठी कंपनी आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांनी मागणी केली आहे की, ज्या भारतीय कंपन्या दारूगोळ्याचे केसिंग युरोपला आणि पर्यायाने युक्रेनला पुरवत आहे त्यांच्यावरती बंदी आणली जावी. हे पण लक्षात असावे की, अनेक वेळा रशिया त्यांच्या राष्ट्रीय हिताला सोयीस्कर अशी पावले उचलतो, जी भारताच्या विरोधात असतात. उदाहरणार्थ, आता ‘रशिया शांघाय ऑर्गनायझेशन’मध्ये पाकिस्तानला आणत आहे.


इटली, चेक प्रजासत्ताककडून युक्रेनला तोफगोळ्यांचा पुरवठा

रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिका-युरोपकडून युक्रेनला सर्व प्रकारची लष्करी मदत केली जाते. मात्र, रशिया मित्रराष्ट्र असल्याने भारताने युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत किंवा रशियावर निर्बंध लादणार्‍या पाश्चिमात्य गटात सहभागी होण्यास नकार दिला आहे. भारतीय दारुगोळा युक्रेनला कसा मिळाला? हा पुरवठा थांबविणे भारताच्या हाती आहे का?


युक्रेनकडे भारतीय दारुगोळा

युक्रेनला भारताकडून थेट मदत होत नसली, तरी भारत युरोपातील अनेक देशांना शस्त्रास्त्रे, तोफगोळे निर्यात करतो. यात इटली आणि चेक प्रजासत्ताक हे मोठे आयातदार देश युक्रेनला तोफगोळ्यांचा पुरवठा करतात.

भारताकडून आयात केलेले केसिंगमध्ये स्फोटके भरून ‘एमईएस’कडून युक्रेनला दिली जातात. अनेक युरोपीयन कंपन्यांकडे तोफगोळे निर्मितीची क्षमता असली, तरी मोठ्या प्रमाणात त्याचे केसिंग उत्पादन करण्याची सुविधा नाही. अशा कंपन्या या भारताकडून तोफगोळ्यांचे केसिंग आयात करतात. त्यांच्यामार्फत भारतीय बनावटीचे हे तोफगोळे युक्रेनकडे आयात होतात. युक्रेनकडील भारतीय तोफगोळ्यांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.


रशियाची प्रतिक्रिया

आतापर्यंत किमान दोन वेळा रशियाने भारतीय अधिकार्‍यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. कझाकस्तानमध्ये झालेल्या चर्चेवेळी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे यासंदर्भात तक्रार नोंदविली. सरकारी मालकीच्या शस्त्रास्त्र कंपन्यांचा माल युक्रेनच्या हाती जात असल्यामुळे रशिया नाराज आहे.

रशियाने भारताला आपल्याशी असलेले ऐतिहासिक संबंध आणि सामरिक भागीदारी लक्षात घेऊन या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

रशिया हा संरक्षण क्षेत्रातील भारताचा पूर्वापार सर्वात मोठा निर्यातदार आहे. आजही आपली 60 टक्के आयात रशियाकडूनच होते. युद्ध छेडले गेल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयातही वाढविली आहे. रशियावर निर्बंध लादण्यासाठी युरोप-अमेरिकेबरोबर हातमिळवणी करण्यासही भारताने सातत्याने नकार दिला आहे. असे असताना भारत सरकार रशियाच्या तक्रारीकडे लक्ष का देत नाही,
 
भारत हा पुरवठा थांबवू शकतो का?

कोणत्याही संरक्षणविषयक करारात आयात केलेली शस्त्रास्त्रे, दारुगोळा अन्य देशाला विकताना किंवा मदत म्हणून देताना निर्यातदार देशाची परवानगी घेण्याची अट समाविष्ट असते. आपलीच शस्त्रे आपल्या हाती पडून आपल्याविरुद्धच वापरली जाऊ नयेत. युक्रेनचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार असलेल्या अमेरिकेनेही ‘एफ-16 फाल्कन’ विमाने झेलेन्स्की यांना देण्यास अन्य युरोपीय देशांना परवानगी दिली नव्हती. त्यामुळे भारतीय बनावटीची शस्त्रे युक्रेनला देण्यापासून इटली, चेक प्रजासत्ताकासह अन्य युरोपीय देशांना आपला माल युक्रेनला देण्यास भारत सरकार मज्जाव करू शकते. मात्र, आतापर्यंत तरी भारताने हे टाळले आहे.


भारताचे तक्रारीकडे दुर्लक्ष का?

रशियाच्या विरोधाकडे भारताने कानाडोळा करण्याचे एक कारण आर्थिक आहे. 2018 ते 2023 या कालावधीत भारताची संरक्षणविषयक निर्यात तीन अब्ज डॉलर्सच्या वर गेली आहे. 2029पर्यंत ही निर्यात सहा अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात दोन ठिकाणी युद्ध सुरू असताना भारतीय संरक्षण उद्योगाला ही एक प्रकारे संधी आहे. लांबत चाललेल्या युरोपियन युद्धापासून देशाचा आर्थिक लाभ होण्याची संधी असल्यामुळे भारतीय बनावटीची तोफगोळ्यांची केसिग दारुगोळा भरून युक्रेनला देण्यात भारताने आडकाठी आणली नाही.

युक्रेनचा सर्वांत मोठा पाठीराखा असलेल्या अमेरिकेशी भारताने अलीकडेच संरक्षण सहकार्य अधिक मजबूत केले आहे. या करारामागे चीनला रोखणे हा उद्देश आहे. अशा वेळी युक्रेनला होत असलेली अप्रत्यक्ष मदत रोखून अमेरिकेची नाराजी ओढवून घेण्याची गरज नाही. शिवाय भारतीय दारुगोळा केसिंगचे प्रमाण हे अगदीच नगण्य असल्यामुळे त्याची युक्रेनला फार मोठी मदत होत नाही. परिणामी, रशियाने निषेध नोंदविला असला, तरी त्याबाबत पुतीन यांचे प्रशासन लगेच काही मोठे पाऊल उचलेल, अशी शक्यता नाही.


रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कच्चे तेल आयात

युरोपियन देशांनी निर्बंध लावल्यानंतर सुद्धा आपण रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कच्चे तेल आयात करत आहे आणि ते शुद्ध करून युरोपला विकत आहे. यामुळे रशियाला आपण आर्थिक मदतच करत आहे. हे पण रशियाच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे.

भारताचा दारूगोळा युक्रेनकडे जात असल्याच्या प्रश्नाने भारताला एक कठीण परिस्थितीत आहे. एकीकडे, भारताला आपल्या आर्थिक हितांचे रक्षण करावे लागेल, तर दुसरीकडे, भारताला आंतरराष्ट्रीय संबंधांचेही संतुलन राखावे लागेल.

युक्रेन युद्धाचा भारतावर मोठा परिणाम होत आहे. भारताने आपली तटस्थ भूमिका कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच, भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी सकारात्मक संबंध राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
आज आशियामधले अनेक देश चीन बरोबर लढाई करता यावी म्हणून आपली सैन्य दले मजबूत करत आहे. अशा देशांना भारताने दारूगोळा निर्यात करून त्यांना मजबूत बनवले पाहिजे. यामुळे आपला आर्थिक फायदा तर होईलच, परंतु चीनच्या विरोधामध्ये मित्रराष्ट्रांची एक आघाडी निर्माण करता येईल.


(नि.) ब्रि. हेमंत महाजन
अग्रलेख
जरुर वाचा
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात सीबीआय चौकशीला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाकडून ममता सरकारला तात्पुरता दिलासा

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात सीबीआय चौकशीला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाकडून ममता सरकारला तात्पुरता दिलासा

(West Bengal Teacher Recruitment Scam) पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळा प्रकरणातील सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात, कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाच्या शिक्षकांची २५ हजार अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या निर्णयाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी रद्द केला. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला दिलासा मिळाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121