मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाला. माझी मराठी अमृताशी पैजा जिंके अशीच आहे. आणि याच आनंदाप्रित्यर्थ माय मराठीला ही शब्दांजली!
ज्ञानेश्वरीत माऊलींनी असे म्हटले आहे की,
आता अभिनव वाग्विलासिनी
जे चातुर्यार्थकला कामिनी
ते शारदा विश्वमोहिनी!
ज्या देवी शारदेच्या कृपेने काव्यमय शब्दातून ज्ञानाचा नवनवीन आविष्कार होतो अश्या माझ्या मराठी भाषेचा अपूर्व विलास करुन अवघे विश्व मोहित करून टाकणा-या देवी शारदेला वंदन! माझ्या अमृतमधुर माय मराठीला वंदन! या मराठीतील शब्दब्रम्हाची ओळख मला पहिला श्री गिरविताना झाली. आणि मग मी या शब्दब्रम्हाच्या प्रेमातच पडले. आणि हाच माझा पहिला जीवनआनंद! आणि मराठीशी मातृतुल्य भावस्पर्शी नाते! मग शब्द वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या रुपात माझ्या समोर यायला लागले. जणू काही ते माझे सांगातीच! निसर्गामध्ये सर्वत्र सौंदर्य व भव्यता यांचा नित्य आविष्कारच होत असतो. वेलीवरचे फूल, द-या, डोंगर, पर्वताची शिखरे, अथांग सागर, वृक्षवल्ली, खळाळून वाहणाऱ्या नद्या, विविध प्रकारचे सजीव प्राणी, पशु-पक्षी ही विविधता मन मोहित करते. पण या सा-यात लेखक किंवा कवी आपल्या लेखातून, काव्यातून शब्दसुमनांचा वर्षाव करतो. माझ्या मराठीत किती अमूल्य शब्दभांडार आहे. याचा प्रत्यय या लेखातून, काव्यातून येतो. या शब्दब्रम्हाची म्हणजेच माय मराठीची उपासना करण्याचा आनंद अवर्णनीय आहे.
मराठीतील शब्दांचा प्रांत अगदी आधिभौतिकापासून ते आध्यात्मिक विश्वापर्यंत सर्व विषयांना स्पर्श करणारा बकुळगंधच आहे. शब्दांच्या माध्यमातून आपल्या भावनांना कलात्मक स्वरूप देऊन तो शब्दसुगंध दशदिशांना उधळणा-या लेखक, कवींना मराठीच्या या सारस्वतांना मला नेहमीच वंदन करावेसे वाटते. कारण मी शब्दांच्या प्रेमातच पडले आहे. निसर्ग दर्शनातून जीवनाच्या भावप्रसंगातून साहित्य सर्जनाच्या आस्वादातून येणा-या मराठी भाषेचे शब्दलावण्य मला आनंदीत करते. मराठी भाषेची श्रीमंती मला चकीत करते. आणि मी लाडावून मराठी भाषेच्या उबदार कुशीत शिरते.
कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गीतेचा ज्ञानप्रवाह स्त्रवला. या ज्ञानप्रवाहातील मौलिक शब्द माझे जीवाभावाचे मैत्र झाले! मराठीच्या शब्द उपासकांना गीतेमध्ये वाड:मयीन सौंदर्य दिसते. त्या शब्दसौंदर्याचा भरभरून आनंद घेताना माझे शब्द नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतात. शब्दाप्रति मराठीप्रति कृतज्ञता व्यक्त करताना मला आंतरिक समाधान मिळते. या पार्श्वभूमीवर काही शब्द संवाद साधतात, आनंद देतात. काही शब्द विचार करण्यासाठी सकारात्मक दिशा देतात. काही शब्द अंतर्मुख करतात. काही शब्द प्रोत्साहित करतात. काही शब्द संयमाचा धडाही देतात. काही शब्द समाजसेवेचा मंत्र देतात. तर काही शब्द अन्याय अत्याचारा विरूद्ध लढण्याचे बळ देतात.तर काही शब्द कृतज्ञतेचे अनुपमेय लेणेही देतात.अश्या विविधांगी शब्दांच्या मांदियाळीत रमायला मला आवडते.कारण तीच तर माझी माय मराठीची साधना आहे. मराठीची उपासना, आराधना करताना होणारा आनंद अमृताहूनी मधुर आहे.
संतसाहित्य म्हणजे आपल्याला मिळालेला अनमोल ठेवाच आहे. हा भक्तीरसाचा ठेवा सर्वसमावेशक असून सप्तरंगांना आपल्यात सामावून घेणारा दिशादर्शक गुरूमंत्रच आहे! संतश्रेष्ठींच्या रचना शब्दसृष्टीवर राजाप्रमाणे सत्ता गाजवितात. ही सारी माझ्या माय मराठीची जादुई किमया आहे!
आपली मराठी भाषा अमृततुल्य असून त्यातील शब्दमौत्तिकांची पखरण मला चिंब भिजवून टाकते. किती शब्दमोती वेचू अशी माझी अवस्था होते. पण मराठीतील शब्दभांडार एवढे अमाप आहे कि ते शब्दमोती वेचताना माझे हात अपुरे पडतात. अहो मी वेडीच आहे. कारण मी मराठीच्या प्रेमात पडले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मला मराठीतील सर्वस्तरीय शब्दब्रम्हाचा अनुभव घ्यावासा वाटतो. हा शब्दानुभव मला जगण्याची प्रेरणा, उमेद देतो आणि म्हणूनच जीवनातील वर्तमान वळणावर उभे राहून शब्दसृष्टीच्या इतिहासाचे डोळस सिंहावलोकन करत करत वर्तमानाचे नाविन्यपूर्ण शब्दब्रम्ह पाहण्यासाठी, वाचण्यासाठी व लिखाणासाठी कृतीशील पाऊल उचलण्यासाठी माय मराठी मी तुझ्या चरणी नतमस्तक आहे ग!
म्हणूनच मी शब्दसृष्टीच्या शारदेजवळ तिच्या कृपेचे पसायदान मागते आहे, "हे माय मराठी माते मला तुझ्या आशिर्वादाची गरज आहे, आज तुला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा मला आभाळभर आनंद झाला आहे, तू आहेसच मुळी कौतुकाची, शब्दब्रम्हाची तू जननी आहेस! आणि म्हणूनच मी तुझ्या कुशीत यायला आसुसलेली आहे. प्रणाम माते!