जत्रेतल्या झुंजी आणि त्यातला इरेसरीने बोली लावून खेळला जाणारा जुगार यांची एक नशा असायची. पण, त्यांच्यावर बंदी आली. मृत्यूगोलाचा थरार तसा अजून टिकून आहे. पण, काहीतरी नवीन पाहिजे, यार! मग अमेरिकने शोधून काढलाय झुंजीच्या खेळाचा नवीन प्रकार-मोटार झुंज!
अश्विन महिना सुरु झाला असून शारदीय नवरात्रही सुरु झाले आहे. आता गावोगावच्या जत्रा आणि यात्रा सुरू होतील. दसरा, कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये स्थानिक देव-देवतांच्या जत्रा असतात. वाढत्या शहरीकरणामुळे आता या जत्रा-यात्रांमधला पूर्वीचा उत्साह खूपच कमी झाला आहे. पण, तरीही काही जत्रा बर्यापैकी टिकून आहेत. काही जत्रांना नव्याने उजाळा मिळाला आहे, तर काही जत्रा नव्यानेच निर्माण झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात वाई जवळच्या मांढरदेवच्या काळुबाई देवीची यात्रा आणि मालवण जवळच्या मसुरे आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा या खरे म्हणजे जुन्याच आहेत. पण, या देवी नवसाला पावतात, हे लोकांना हल्ली जणू नव्यानेच समजले आहे. यामुळे अलीकडे या यात्रांना लांबून-लांबून लोक येऊ लागले आहेत. पूर्णपणे नव्यानेच निर्माण झालेली जत्रा म्हणजे ’लालबागचा राजा’ या नावाने प्रसिद्धी पावलेल्या गणपतीची होय. वास्तविक मुंबईच्या लालबाग-गिरणगांव परिसरातले रंगारी बदक चाळ, तेजूकाया मॅन्शन, गणेश गल्ली इत्यादी सार्वजनिक गणेशोत्सव भव्य, नवनवीन देखाव्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यामानाने हा लालबाग मार्केटचा गणेशोत्सव अप्रसिद्धच होता. पण, साधारण 1988-90 साली एकदम तो नवसाला पावायला वगैरे लागला. तेव्हापासून तो ’लालबागचा राजा’ झाला आणि त्याच्या दर्शनासाठी उडणारी झुंबड म्हणजे दहा जत्रांचा समुदाय असतो.
पण, जत्रा म्हणजे देवदर्शनाबरोबरच मिठायांची दुकाने हवीत, झटपट फोटो काढून देणार्या तंबूतल्या स्टुडियोच्या कनाती हव्यात. वेगवेगळ्या आकाराच्या आरशांमध्ये आपल्याच विचित्र प्रतिमा दाखवून खदाखदा हसायला लावणारा आरसेमहाल हवा, गरागरा फिरवून पोटात गोळा आणणारे मोठेमोठे चक्री पाळणे हवेत, मृत्यूचा गोल नामक पिंजरा हवा. त्या पिंजर्यात एका फटफटीवर एक पोरगा आणि पोरगी स्वार होतात आणि उभे, आडवे, उलटे, सुलटे चकरा मारतात. फटफटीचा सायलेन्सर मुद्दामच काढून ठेवलेला असतो. त्यामुळे कानठळ्या बसवणार्या आवाजात फटफटी वेगाने गरगरत असते. क्षणाची चूक नि त्या पोरांचा चेंदामेंदा..... पण तसे काही होत नाही. खेळ संपतो. पोरे मजेत फटफटीवरून उतरून आपल्याला सलाम ठोकतात. आपण सुटकेचा निःश्वास टाकत, कसले घाबरलो आपण, असे मनाशी म्हणत मृत्यूगोलाच्या त्या तंबूतून बाहेर पडतो.
असाच मृत्यूच्या जवळ जाऊन येण्याचा अनुभव देणारा आणखी एक म्हणजे झुंज, प्राण्यांची झुंज. आता मुक्या प्राण्यांच्या अशा झुंजी लावण्यावर कायद्याने बंदी आहे. ती योग्यच आहे. पण, पूर्वी गावोगावच्या जत्रांमध्ये कोंबडे, कुत्रे अणि बोकड यांच्या झुंजींचा खेळ आणि या खेळावरचा जुगार हा एक अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम असायचा. खास या झुंजींसाठी कोंबडे, कुत्रे आणि बोकड पाळले जायचे, पोसून ताकदवान बनवले जायचे आणि त्यांना झुंजीचे प्रशिक्षण दिले जात असे. महाराष्ट्रातच नव्हे, तर एकंदर भारतासह आशिया खंड, आफ्रिका खंड आणि युरोप खंड म्हणजेच जुन्या जगात असे अनेक खेळ जत्रांमध्ये सर्रास प्रचलित होते.
अमेरिका हे नवे जग आहे. जुन्या जगातल्या जत्रा-यात्रा या देवस्थानांभोवती निर्माण झाल्या होत्या. उदा. युरोपातली जर्मनीतली लिपझिग गावची जत्रा ही सगळ्यात प्राचीन समजली जाते. इ.स.1175 सालापासून ती भरत असल्याचा उल्लेख सापडतो. त्या परिसराचा तत्कालीन शासक ऑटो-द-रिच याने असा आदेश काढला की, ईस्टरच्या धार्मिक उपवास पर्वानंतरच्या तिसर्या रविवारी ही जत्रा भरवण्यात यावी. आजूबाजूच्या राज्यांचा आणि लिपझिगवाल्यांचा काही राजकीय तंटा-बखेडा चालू असला, तरी जत्रेत सर्वांना मुक्त प्रवेश असायचा. अगदी आजही ही जत्रा आवर्जून भरते. फक्त आता तिचे स्वरूप धार्मिक नसून पूर्णपणे व्यावसायिक झाले आहे.
अमेरिकेत किंवा आधुनिक युरोपातही जत्रा भरतातच; फक्त त्यांना ’एक्स्पो’, ’ट्रेड फेअर’ अशी आधुनिक नावे दिलेली असतात. जुन्या काळातल्या जत्रांमध्ये पंचक्रोशीतल्या छोट्या-मोठ्या व्यापार्यांच्या, उत्पादकांच्या मालाला उठाव मिळावा, त्यांच्या कनवटीला चार पैसे लागावेत, असा व्यावसायिक हेतू असायचाच.
आता आधुनिक काळात युरोप-अमेरिकेतच नव्हे, तर जगभरातल्या सर्व मध्यम-मोठ्या शहरांमध्ये भलेमोठे मॉल्स, प्रचंड डिपार्टमेंटल स्टोअर्स असतात. तिथे वर्षाचे बाराही महिने म्हणाल ती वस्तू मिळू शकते. म्हणजे खरे पाहता, आता ‘एक्स्पो’, ‘ट्रेड फेअर्स’ अशा भव्य, अतिभव्य प्रदर्शनांचीही गरज उरलेली नाही.
नाही कशी? अशा प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याचा, तिथे जाण्याचा, खरेदी करण्याचा किंवा नुसतेच ‘विंडो शॉपिंग’ करण्याचा एक नवलाईचा, औत्सुक्याचा आनंद असतोच की! माणसाला तो हवा असतो.
तसेच त्या झुंजींच्या खेळांचेही आहे. आपण स्वतःच जणू युद्ध करत आहोत, असा फील देणारे 17 व्हिडिओ गेम्स उपलब्ध आहेत. पण, जत्रेतल्या झुंजी आणि त्यातला इरेसरीने बोली लावून खेळला जाणारा जुगार यांची एक नशा असायची. पण, त्यांच्यावर बंदी आली. मृत्यूगोलाचा थरार तसा अजून टिकून आहे. पण, काहीतरी नवीन पाहिजे, यार!
मग अमेरिकेने शोधून काढलाय झुंजीच्या खेळाचा नवीन प्रकार-मोटार झुंज! मोटार किंवा मोटर कार हा शोधच मुळी अमेरिका या नव्या देशाने जुन्या जगाला दिलेला आहे. अगदी काटेकोर इतिहास पाहिला तर युरोपातल्या जर्मनीचा कार्ल बेंझ आणि अमेरिकेचा रॅनसम इ. ओल्ड या दोघा संशोधकांनी साधारण एकाच वेळेला म्हणजे 1897 साली व्यापारी तत्त्वावर मोटार कार बनवून विकायला सुरूवात केली. 1907 सालापर्यंत रॅनसम ओल्डने ’ओल्डस् मोबिल’ या त्याच्या सुप्रसिद्ध ब्रॅण्डच्या किमान 19 हजार गाड्या बनवल्या आणि विकल्या. मात्र, 1908 झाली हेन्री फोर्डने ’फोर्ड मॉडेल टी’ ही त्याच्या कंपनीची गाडी इतर सर्वांपेक्षा अर्ध्या किमतीत बनवून, ‘मोटर कार उद्योगाचा जन्मदाता’ अशी सार्थ कीर्ती मिळवली. त्यामुळे मोटारीचा शोध अमेरिकेने लावला, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. आज एखाद्या अमेरिकन माणसाकडे एखादी जीवनावश्यक वस्तू नसेल एकवेळ, पण किमान एक तरी मोटार असलीच पाहिजे. सजीव प्राण्याला श्वासोच्छवास जेवढा आवश्यक, तेवढीच अमेरिकन माणसाला मोटार, आणि अर्थातच त्यामुळे मोटार चालवण्याचा परवाना उर्फ ड्रायव्हिंग लायसन्स. अमेरिकेत एखादा आरोपी फाशीची शिक्षासुद्धा मान्य करेल, पण ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणे ही शिक्षा मरणाहूनही भयंकर!
तर अशा त्या प्राणांहूनही प्रिय मोटारींची झुंज लावण्याचा खेळ म्हणजे नेमके काय? ते पाहा, न्यूयॉर्क जवळचे फ्रँकफोर्ट नावाचे गाव: (जर्मनीतले सुप्रसिद्ध फ्रँकफर्ट शहर नव्हे हं!) तिथे एक जत्रा म्हणजे ‘एक्स्पो’ चालू आहे आणि तो पाहा मोटार झुंजीचा आखाडा. एक मध्यम आकाराचे मैदान आहे. चारी बाजूंनी कठडे लावलेत. उत्सुक प्रेक्षक त्या कठड्यांवर चढून झुंज चालू होण्याची वाट बघतायत. मैदानात एका बाजूला एक आगीचा बंब आणि बंबवाले कर्मचारी सज्ज होऊन उभे आहेत. झुंजीचे धावते समालोचन करण्यासाठी एक समालोचक बुवा एका उंचावरच्या काचेच्या केबिनमध्ये बसलाय. एकदम कानठळ्या बसवणारे आवाज होतायत. सायलेन्सर्स काढून टाकलेल्या दहा-बारा मोटारगाड्या सुसाट वेगाने जणू हंबरडे फोडत चार दिशांनी आखाड्यात शिरतायत. गाड्यांना त्यांच्या चालकांनी चित्रविचित्र रंग दिलेत. कुणी टपावर बैलाच्या शिंगांसारखी भलीमोठी कृत्रिम शिंगे बसवली आहेत. कुणी दात विचकणार्या कवट्या आणि हाडके चितारली आहेत. कुणी प्रेमस्यांची, बायकांची, मुलांची नावे चितारली आहेत. माजलेले, मस्तवाल आंडिल बैल गुरगुरत, धुसफुसत, मध्येच आरोळ्या ठोकत जागच्या जागी थयथयाट करत उभे राहावेत, तशा त्या गाड्या इशार्याची वाट पाहात आहेत.
मग प्रथम चक्क राष्ट्रगीत वाजवले जाते. नंतर मुख्य पंच पिस्तुलाचा बार काढतात आणि त्या सरशी ते सगळे मोटारवाले डरकाळ्या फोडत एकमेकांवर अक्षरश: तुटून पडतात. आपण चित्रपटात नायक आणि खलनायक यांच्या गाड्यांची जी खोटी झटापट पाहतो, तशी इथे प्रत्यक्ष घडत असते. एकाच वेळी दहा ते बारा गाड्या एकमेकांना ढुशा देत असतात. प्रचंड धूळ उसळत असते. लोखंडावर लोखंड जीव खाऊन आपटले जात असते. टायर फुटतात, बंपर्स तुटून लोंबतात, विंड स्क्रीनच्या, पुढच्या-पाठच्या दिव्यांच्या काचांचा चक्काचूर होतो. एवढे होईपर्यंत प्रेक्षक पण पेटलेले असतात. जणू ते मनाने दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीच्या रोम शहरातल्या त्या प्रख्यात कलोझियममध्ये पोहोचलेले असतात. कलोझियम!
रोम शहरातले प्राचीन, प्रख्यात (आणि कुख्यात सुद्धा) प्रचंड प्रेक्षागार. हजारो प्रेक्षकांसोबत रोमन सम्राट तिथे ग्लॅडिएटर योद्ध्यांचे झुंजीचे खेळ बघायचे. जीव खाऊन एकमेकांवर वार करणार्या दोघांमधला कुणीतरी एक जखमी होऊन कोसळायचा. विजेता सम्राटाकडे आणि प्रेक्षकांकडे बघायचा. सम्राट आणि प्रेक्षक यांनी ’थम्स अप’ची खूण केली, तर जखमीला जीवदान मिळत असे. पण, साधारणपणे ’थम्स डाऊन’चाच इशारा केला जात असे. विजेता पटकन जखमीच्या छातीत तलवार खुपसायचा. रक्ताची चिळकांडी उडायची आणि रोमन पब्लिक आनंदाने बेहोष व्हायचे.
इथे प्रतिस्पर्धी मोटार चालकाला ठार मारायची परवानगी नाही. पण, प्रेक्षक मात्र ओरडत असतात. ’किल हिम’ ’फिनिश हिम’ अर्थात बंबवाले कर्मचारी अतिशय सावध असतात. उलट्या-पालट्या, वाकड्या तिकड्या झालेल्या गाड्या ते त्यांच्याकडच्या अत्याधुनिक हत्यारांनी कात्रीने कागद कापावा, जितक्या सहजतेने कापतात आणि आपल्या ड्रायव्हरला अजिबात मरू न देता सुखरूप बाहेर काढतात. हं, आता ढोपरे-कोपरे फुटणे, एखादी बरगडी पिचकणे, डोक्यावर शिरस्त्राण असूनही डोके, कानशिले, कानफटे शेकून निघणे एवढे होणारच. तेवढी तयारी असणारेच या झुंजीत उतरतात. एखाद्या गाडीचा कार्ब्युरेटर पेटतो. बंबवाले लगेच पाणी मारून आग विझवतात.
आपल्याकडे होळीला भरपूर शिवीगाळ करणे, एखाद्या व्यक्तीची यथेच्छ निंदा करणे हे क्षम्य समजले जाते. स्वतःला ‘समाजशास्त्रज्ञ’ म्हणवणारे लोक याचा असा अर्थ लावतात की, शिमग्याचा क्षण ही माणसाच्या मनातल्या वाईट इच्छा बाहेर फेकून देण्याचा एक ’सेफ्टी व्हॉल्व’ आहे. अमेरिकेतले समाजशास्त्रज्ञ पत्रकार लगेच मोटार झुंजीच्या या खेळाचा अन्वयार्थ लावायला बसले. अमेरिकेचे मोटार चालनाचे कडक कायदे, लायसन्स रद्द होण्याची भीती इत्यादींवरचा मनातला राग लोक या खेळाद्वारे बाहेर काढतात, व्यक्त करतात असा निष्कर्ष यांनी काढला.
त्यावर प्रतिक्रिया देताना 25 वर्षांचा एक जवान ड्रायव्हर पोर्या म्हणतो, ’तुमचं मनोविश्लेषण वगैरे काय ते मला कळत नाही. माझी गाडी दुसर्या गाड्यांवर ठोकायला मला आवडते. माझी ही ’डॉज डार्ट 73’ गाडी माझ्या कुटुंबासाठी प्रिय आहे आणि त्यांच्यासाठीच मी ती झुंजवत ठेवणार!
मल्हार कृष्ण गोखले