नवी दिल्ली/ठाणे, दि. ४ : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौर्यावर असून येथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. या दौर्यात ते ठाणेकरांना कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची भेट देणार आहेत.
महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शनिवारी ठाण्यात दौर्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कासारवडवली, बोरिवडे येथील वालावलकर सभा मैदान, हा परिसर दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तात्पुरते ‘रेड झोन’ घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त मीना मकवाणा यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर सभास्थळी भेट देऊन सर्व जामानिम्याची पाहणी केली.
पंतप्रधानांचे ठाणेकरांना ‘गिफ्ट’
पंतप्रधांनाच्या हस्ते ठाण्यातील कोट्यवधीचे प्रकल्पांची रुजवात होणार असल्याने ही एक प्रकारे ठाणेकरांना गिफ्ट आहे. सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ठाणे महापालिकेची उंच प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत एकाच ठिकाणी महापालिका कार्यालये सामावून घेऊन ठाण्यातील नागरिकांचा त्रास कमी करणार आहे. याशिवाय, पंतप्रधान सुमारे २ हजार, ५५० कोटी रुपये खर्चाच्या ‘नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र’ (एनएआयएनए) प्रकल्पाच्या फेज-१ची पायाभरणी करतील. या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचे बांधकाम समाविष्ट आहे. शेतकर्यांना सक्षम बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान सुमारे ९.४ कोटी शेतकर्यांना सुमारे २० हजार कोटी रुपयांचा ‘पीएम किसान सन्मान निधी’चा १८वा हप्ता वितरित करतील. या १८व्या हप्त्यासह, ‘पीएम किसान योजनें’तर्गत शेतकर्यांना जारी केलेला एकूण निधी सुमारे ३.४५ लाख कोटी रुपये असेल. याशिवाय, ‘पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या पाचव्या हप्त्याचेही वितरण करतील. पंतप्रधान मोदी वाशिम येथे पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान सकाळी ११.३० वाजता बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणार्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत.