काँग्रेसने बंजारा समाजाचा कायम अपमान केला! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
05-Oct-2024
Total Views | 28
वाशीम : काँग्रेसने बंजारा समाजाचा कायम अपमान केला. त्यांना समान वागणूक दिली नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. शनिवारी, पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी यावेळी विविध विकासकामांचे लोकार्पणही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "बंजारा समाज पिढ्यानुपिढ्या भारताची संस्कृती आणि परंपरा जपत आला आहे. स्वातंत्र्याच्या युद्धावेळी इंग्रजांनी या संपूर्ण समाजालाच गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं. परंतू, स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाला योग्य न्याय देणं ही देशाची जबाबदारी होती. पण त्यावेळी काँग्रेस सरकारने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहातून वेगळं केलं."
"स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षावर ज्या परिवाराने कब्जा केला त्यांचे सुरुवातीपासूनच परदेशी विचार राहिले आहेत. इंग्रजांप्रमाणेच काँग्रेससुद्धा दलित, मागास आणि आदिवासींना समान वागणूक देत नाहीत. त्यांना वाटतं की, भारतावर एकाच परिवाराचं वर्चस्व असायला हवं. त्यामुळे त्यांनी बंजारा समाजाचा कायम अपमान केला. मात्र, एनडीए आणि भाजप सरकार या समाजाची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी काम करत आहे. विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने संत सेवालाल महाराज बंजारा, तांडा समृद्धी अभियान सुरु केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोहरादेवी तीर्थस्थळाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. पण महाविकास आघाडीच्या सरकारने या कामाला ब्रेक लावला. त्यानंतर पुन्हा महायूती सरकार आल्यानंतर हा विकास पुन्हा सुरु झाला. या योजनेवर ७०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या तीर्थक्षेत्रामुळे आजूबाजूच्या भागांचा विकास होईल," असे ते म्हणाले.
काँग्रेस फक्त लुटण्याचे काम करतो!
ते पुढे म्हणाले की, "भाजप वंचित समाजाला पुढे नेतो पण काँग्रेसला फक्त लुटणे माहिती आहे. काँग्रेसला गरिबाला गरीबच ठेवायचं आहे. कमजोर आणि गरिब भारत काँग्रेसच्या राजकारणाला शोभून दिसतो. त्यामुळे सर्वांना काँग्रेसपासून सावध राहावं लागेल. जे लोकं भारताला पुढे जाण्यापासून थांबवत आहेत ते सध्या काँग्रेसचे सर्वात जवळचे मित्र आहेत. त्यामुळे आता आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे," असेही ते म्हणाले.