ठाणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणार
महिनाभरात ३ हजार स्त्रोतांचे सर्वेक्षण
04-Oct-2024
Total Views | 49
ठाणे, दि.४ : ( Thane Zilla Parishad ) ठाणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हयात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण काम हाती घेण्यात आले असून आरोग्य विभागाच्या वतीने ३ हजार २६१ पाण्याचे स्त्रोत तपासले जाणार आहेत. ही मोहीम महिनाभर सुरू राहणार असून त्यानंतर ग्रामपंचायतींचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण मोहीम दि.१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर असे वर्षातून दोन वेळा स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत असून वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत. ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेवक यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतींचे वर्गीकरण
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांवर या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली असून ग्रामपंचायतीचे वर्गीकरण करून त्यांना लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी दिली.
पिण्याच्या पाण्याचे ३२६१ स्त्रोत
जिल्हयातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये ३ हजार २६१ सार्वजनिक स्त्रोत आहेत. त्यापैकी कल्याण तालुक्यात २००, भिवंडी तालुक्यात ८९०, अंबरनाथ तालुक्यात २३२, मुरबाड तालुक्यात ८१२, शहापूर तालुक्यात १ हजार १२७ पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची संख्या असून एकूण ३ हजार २६१ स्त्रोत ठाणे ग्रामीण भागात आहेत.