पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन करणार
ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचीही पायाभरणी
04-Oct-2024
Total Views | 43
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून येथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे १४,१२० कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन - ३ च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. या विभागात १० स्थानके असून त्यापैकी ९ स्थानके भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाइन - ३ हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प असून तो ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. लाईन-३ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे १२ लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.
सुमारे १२.२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी २९ किमी असून त्यात २० उन्नत आणि २ भूमिगत स्थानके आहेत. हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. सुमारे ३,३१० कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्गाच्या विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते ठाण्यापर्यंत अखंड संपर्क सुविधा उपलब्ध होणार आहे. सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
याशिवाय, पंतप्रधान सुमारे २,५५० कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (एनएआयएनए) प्रकल्पाच्या फेज-१ ची पायाभरणी करतील. या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचे बांधकाम समाविष्ट आहे.
शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान सुमारे ९.४ कोटी शेतकऱ्यांना सुमारे २०,००० कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता वितरित करतील. या १८ व्या हप्त्यासह, पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जारी केलेला एकूण निधी सुमारे ३.४५ लाख कोटी रुपये असेल. याशिवाय, पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे २,००० कोटी रुपयांच्या ५व्या हप्त्याचेही वितरण करतील.
पंतप्रधान मोदी वाशिम येथे पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान सकाळी ११.३० वाजता, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत.