सावित्रीची लेक आपल्या आयुष्यातील चढउतार पचवत, शिक्षणाचे व्रत हाती घेत, आदर्श भावी पिढी घडविणार्या, आणि सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा पुढे चालविणार्या वनिता उगले यांच्याविषयी...
समाजातील काही घटक शिक्षणाच्या प्रवाहापासून अजूनही काहीसे दूर आहेत. या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजातील काही हात नेहमी पुढे येतात. त्यातल्याच एक आहेत वनिता विजय उगले.
वनिता यांचा जन्म नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे दि. २५ मे १९८६ साली सधन शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण खेडगाव येथील जिल्हा परिषदेच्या, तर माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक शाळेत झाले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय खेडगाव येथेच झाल्याने तेथेच वनिता यांनी पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच वनिता दि. २९ नोव्हेंबर २००९ रोजी ओझर येथील विजय अशोक वाघ यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर वनिता खर्या अर्थाने स्वयंपूर्ण होत गेल्या. सासर आणि माहेरच्यांच्या पाठिंब्यामुळे वनिता यांना हुरुप आल्याने त्यांनी क्लास सुरु करण्याचे ठरविले. यातूनच ‘लीला कॉमर्स क्लासेस’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. चुणचुणीत असलेल्या वनिता या शाळेतही हुशार होत्या. वर्गात पहिल्या पाचमध्ये त्यांचा क्रमांक ठरलेला असायचा. क्लासची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला फक्त दोनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हळूहळू वनिता यांच्या शिकवण्याची पद्धत मुलांना आवडत गेली. त्यातूनच ओझरसारख्या निमशहरी भागात वनिता यांच्या क्लासचा नावलौकिक वाढत गेला. आज वनिता यांच्या क्लासमध्ये एका दिवसाला एका विषयाच्या पाच ते सहा बॅच घेतल्या जातात. यामध्ये अकरावीपासून ‘बी.कॉम’, ‘एम.कॉम’, ‘एम.बी.ए.’, ‘बी.बी.ए.’पर्यंतचे क्लास घेतले जातात. तसेच, अकाऊंट, कॉस्टिंग, गणित आणि अर्थशास्त्र हे विषयदेखील शिकविले जातात. यासोबतच ‘वनिता कॉम्प्युटर्स’ नावाने कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मागील पाच वर्षांपासून सुरु करण्यात आले असून, सर्व प्रकारचे कम्प्युटर कोर्स शिकवले जातात.
आज वनिता आपला व्यवसाय आणि गृहिणी अशी दुहेरी भूमिका बजावत आहेत. आपल्या क्लासचा नावलौकिक वाढवत असताना वनिता आणि विजय यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. २०१२ साली मुलगी वैजूनिता, तर २०१७ साली मुलगा वेदांत यांचा जन्म झाला. आपल्या क्लासची भरभराट सुरु झाल्यानंतर वनिता यांनी २०१३ मध्ये स्वकमाईने फ्लॅट घेत भाड्याच्या घरातून आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला. त्यापाठोपाठ २०१५ साली दारासमोर चारचाकीदेखील उभी राहिली. सर्व काही सुरळीत सुरु झाले, असे वाटत असतानाच सुसाट धावणारी वनिता यांची गाडी कोरोना महामारीने पुन्हा एकदा रखडली. हा काळ सर्वांनाच खूप कठीण गेला, तसा वनिता आणि विजय यांनादेखील गेला. महाविद्यालये बंद असल्याने ओघाने त्यांचा क्लासदेखील बंद झाला. हा काळ वनिता यांच्यासाठी इतका कठीण गेला की, सर्व काही संपले अशी परिस्थिती झाली. मात्र, या कठीण काळातही त्या डगमगल्या नाहीत. कोरोनाची हानी इतकी भयाण होती की, त्यातून अजूनही वनिता आणि विजय सावरलेले नाही. आपल्या या प्रवासाविषयी वनिता सांगतात की, घर, मुले आणि क्लास अशी तिहेरी कसरत करताना खूप तारांबळ व्हायची. स्वतःकडे लक्ष देणे जमत नव्हते. शरीरावर प्रचंड ताण पडायचा. हे सर्व करताना जीव इतका दमून जायचा की, खूप रडू यायचे. पण, माहेर आणि सासरच्या लोकांच्या प्रेमामुळे पुन्हा नवे बळ अंगात संचारायचे. खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळायची आणि नव्या आव्हानांसमोर पदर खोचून उभे राहताना जरापण न डगमगता ताठ कण्याने त्यांना उभे राहता आले. आयुष्यात खूप वाईट दिवस आले. पण, साथीदाराराची भक्कम साथ असल्यामुळे सर्व काही निभावता आले. ‘जोपर्यंत शिकवता येत आहे, तोपर्यंतच या धरतीवर ठेव’ असे मागणे त्या नेहमी देवाकडे मागतात.
वनिता यांच्या क्लासमध्ये प्रत्येक सणवार साजरा केला जातो. सर्व विद्यार्थी त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या सुखदुःखात वनिता यांचे विद्यार्थी नेहमीच त्यांच्यासोबत उभे राहिलेले दिसून येतात. शिक्षणाचे व्रत हाती घेतलेल्या वनिता यांचे जुने विद्यार्थी जेव्हा त्यांनी लावलेल्या शिस्त आणि संस्कार कसे उपयोगी पडतात, हे सांगायला येतात, तेव्हा वनिता यांचे काळीज सुपाएवढे होते. आपले कौतुक ऐकताना त्यांना जग जिंकल्याचा आनंद होतो. आयुष्यात चढ-उतार आलेल्या वनिता यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. आपल्या क्लासच्या माध्यमातून त्या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये कधी ५०, तर कधी १०० टक्के सवलत देतात. मुलींना शारीरिक शिक्षण मिळावे, यासाठी वेळोवेळी सेमिनार आयोजित केले जाते. वनिता यांनी शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल २०२३ साली त्यांना ‘आदर्श शिक्षिके’चा पुरस्कार मिळाला आहे. अशा या हुरहुन्नरी शिक्षिकेला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा.
लेखक - विराम गांगुर्डे