केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीला उर्जितावस्था येणार नाही. त्यासाठी मराठी माणसाने या भाषेला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनविला पाहिजे. महाराष्ट्रात, अगदी मुंबईतही समोरची व्यक्ती रिक्षावाला आहे, टॅक्सीवाला आहे की इस्त्रीवाला, हे न पाहता त्याच्याशी जेव्हा फक्त मराठीतूनच संवाद साधला जाईल, तेव्हाच मराठी ही सामान्यजनांची भाषा होईल. सरकारने आपले कर्तव्य पार पाडले असून आता तरी मराठी माणूस सर्वार्थाने मराठीत बोलेल का?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सरकारी स्तरावर मिळणे, ही प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून मराठीवर अभिजात भाषेची सरकारी मोहोर उमटली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील नेत्यांप्रमाणेच मराठी भाषेलाही कस्पटासमान मानले होते. मराठीच्या संवर्धनाकडे काँग्रेसने पूर्ण दुर्लक्ष केले होते. अर्थात, त्यास मराठी काँग्रेस नेत्यांचा बोटचेपेपणाही कारणीभूत होता, हे मान्य करायला हवे. गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने मराठी माणसाला आणखी एक दिलासादायक भेट दिली आहे. पण आता मराठीचा प्रसार वाढविण्याची जबाबदारी मराठी माणसावर आली आहे.
मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे, ते प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितले आहे. त्यामुळे त्याबद्दल कोणाच्याच मनात शंका असायचे कारणच नाही. एखादी भाषा किती समृद्ध आहे, ते त्या भाषेतील साहित्यावर नजर टाकल्यास दिसून येते. मराठी साहित्याइतके समृद्ध आणि वैविध्यपूर्ण साहित्य फारच थोड्या भाषांमध्ये निर्माण झाले आहे. मराठीत बालसाहित्यापासून कथा-कादंबर्या, नाटके, काव्य, प्रवासवर्णने, गूढकथा, चरित्रे-आत्मचरित्रे, वैचारिक साहित्यापर्यंत लेखनातील सर्व प्रकार विपुल प्रमाणात प्रसविले गेले आहेत. इतकेच नव्हे, तर डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे यांसारख्या लेखकांमुळे विज्ञानकथांसारखा आधुनिक साहित्यप्रकारही बर्याच प्रमाणात मराठीत उपलब्ध आहे. डॉ. नारळीकर यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञानेही आवर्जून मराठीत विज्ञानकथा आणि कादंबर्र्यांचे लेखन केले. ही गोष्ट त्यांचे मराठीप्रेम तर दर्शवितेच, पण मराठीतही असे लेखन केले जाऊ शकते, हेही त्यांनी दाखवून दिले. डॉ. नारळीकर यांनी तर आपले आत्मचरित्रही मराठीतच लिहिले.
मराठीचा साहित्यिक आवाका विलक्षण व्यापक आहे. राम गणेश गडकरींनी पल्लेदार मराठी संवाद आपल्या नाटकांमध्ये वापरले, तर आचार्य अत्रे यांनी साध्या बोलीभाषेतील संवादांनी रसिकांना पोट धरून हसविले. खाडिलकर, देवल, विद्याधर गोखले यांच्यासारख्या नाटककारांनी तर गद्य आणि पद्याचा मेळ घालून संगीत रंगभूमीचे सुरेल विश्व उभे केले. भारतातील फारच थोड्या भाषांमध्ये संगीत नाटके होतात. हे लक्षात घेतल्यास मराठीचे बलस्थान लक्षात येईल. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्यांनी आपल्या सहज, सुंदर आणि कोटीबाज लेखनाने विनोदी साहित्याचा नवा अध्यायच उलगडला. स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी गंभीर विषयांवरील वैचारिक लेखन मराठीत केले. तरी ते सामान्य वाचकांपर्यंत अचूक पोहोचले. लो. टिळक यांनी भगवद्गीतेवरील ‘गीतारहस्य’सारखा ग्रंथ मराठीतच लिहिला आणि तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या धगधगत्या राष्ट्रवादी विचारांनी मराठीला तेज आणि तरुणांना ओज दिले. किंबहुना त्यांनी अनेक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषेच्या शब्दखजिन्यात अमूल्य भरच घातली. शहरी जीवनातील मध्यमवर्गीय नोकरदारांच्या जीवनातील समस्या आणि त्याच्या आशा-आकांक्षा व. पु. काळे यांनी आपल्या मिश्किल आणि चटपटीत भाषेत मांडल्या. द. मा. मिरासदार आणि शंकर पाटलांच्या कथांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनाचा ठसका आपल्या कथांमध्ये उतरविला. रणजित देसाई, ना. सं. इनामदार यांच्यासारख्यांच्या ऐतिहासिक कादंबर्यांनी मराठीच्या मस्तकावर राजमुकूट ठेवला. मीना प्रभू यांच्यासारख्या लेखिकेने आपल्या खुसखुशीत, नर्म विनोदी आणि सूक्ष्म निरीक्षणावर आधारित प्रवासवर्णनांनी जगाच्या कानाकोपर्यातील देशांची विलोभनीय यात्रा वाचकांना घडविली. मराठीत जगातील बहुतेक भाषांतील अभिजात साहित्याचे भाषांतर झाले आहे.
इतक्या विविध प्रकारच्या लेखनाने मराठी ही किती समृद्ध भाषा आहे, ते पाहून मराठीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. (मराठीत ‘सरकारी मराठी’ हा आणखी एक भाषेचा उपप्रकार असून तो विनोदी साहित्यात मोडतो का, यावर तज्ञांमध्ये मतभेद आहेत!) अशा या विलक्षण समृद्ध आणि श्रीमंत मराठी भाषेचे सुवर्णयुग हे पु. ल. देशपांडे आणि मिरासदार - व. पु. काळे यांच्याबरोबरच संपुष्टात आले, असे आता खेदाने म्हणावे लागते. दर्जेदार लेखकांच्या कथा-कादंबर्यांनी खच्चून भरलेल्या मराठी साहित्यविश्वात आज दुष्काळ पडला आहे. एकेकाळी मराठीत तब्बल ४००-४५० पेक्षा अधिक दिवाळी अंक प्रसिद्ध होत होते आणि त्यांचा खपही भरपूर होता. ही गोष्ट आजच्या पिढीला परीकथा वाटेल. आजघडीला मात्र आवर्जून वाचावे, असे साहित्य निर्माण करणारा एकही लेखक आढळून येत नाही, हे दुर्दैवी आहे. दिवाळी, गणेशोत्सव यांसारख्या सण-उत्सवांची ज्याप्रमाणे लोक प्रतीक्षा करतात, तशीच प्रतीक्षा अ. भा. मराठी साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमांची होत असे. साहित्य संमेलनासारखा उपक्रम फक्त मराठी भाषेतच होतो, हीसुद्धा मराठीसाठी लक्षणीय मानली पाहिजे. आज अशा संमेलनांबद्दल न बोलणे हेच श्रेयस्कर. तीच गोष्ट दिवाळी अंकांची. मराठीत कादंबरी-कथालेखन करणारे लेखक आजही आहेत, पण त्यांनी सामान्य वाचकांची पसंती मिळविलेली नाही. नवे पु. ल. देशपांडे निर्माण होणे सोडाच, आजच्या घडीच्या लेखकांमध्ये कोणी व. पु. काळे यांच्याइतकीसुद्धा साहित्यिक उंची गाठलेली नाही.
इतक्या समृद्ध भाषेचा वारसा लाभलेला असूनही मराठी माणसाच्या मनात आपल्या भाषेविषयी काहीसा न्यूनगंड निर्माण झाला आहे. मराठी ही आज संवादाची भाषा राहिलेली नाही. मुंबईसारख्या महानगरातून तर मराठी जवळपास हद्दपारच झाली आहे. पण पुण्यासारख्या शहरातही आज अनेकदा हिंदीत संवाद साधावा लागतो, ही दुर्दैवी गोष्ट आहे. भारतात मराठी माणूस सोडला, तर अन्य प्रत्येक भाषिक आपल्या भाषेबद्दल विलक्षण अभिमानी असतो. ‘फिल्मफेअर’सारख्या झगमगत्या समारंभातही हेमा-रेखा-श्रीदेवी या अभिनेत्री एकत्र आल्या, तर त्या आपल्या तामिळमधून गप्पा मारताना दिसत. तीच बाब बंगाली भाषिकांची. पण परदेशात जरी दोन मराठी माणसे एकत्र आली, तरी ती इंग्रजीतूनच संवाद साधतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन केवळ मराठी अस्मितेचा अभिमान कुरवाळला जाईल. पण ती जर दैनंदिन जीवनात, प्रत्येक क्षेत्रात बोलली गेली नाही, तर ती मृतप्राय होईल. आता जबाबदारी मराठी माणसावर आली असून आता तरी मराठी माणूस महाराष्ट्रात मराठीत बोलेल का, हाच खरा प्रश्न आहे.