महाविकास आघाडीत एमआयएमची एन्ट्री? इम्तियाज जलील यांनी दिला प्रस्ताव
04-Oct-2024
Total Views | 169
मुंबई : एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला असून ते महाविकास आघाडीत सामील होण्यास इच्छूक आहेत. त्यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आता मविआत एमआयएमची एन्ट्री होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, "आम्ही महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला आहे. भाजपचा पराभव करायचा असल्यास आपल्याला एकत्र येणे आवश्यक आहे, असं आम्ही त्यांना दोन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर काही नेत्यांनी माध्यमांना सांगितलं की, आमच्याकडे लेखी काहीही आलेलं नाही. त्यामुळे १० सप्टेंबर रोजी मी शरद पवारांच्या पीएच्या मार्फत प्रस्ताव पाठवला होता. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि अमित देशमुख यांनासुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवला होता. यामध्ये मी जागांचा उल्लेख केलेला नाही. ते आम्हाला सोबत घ्यायला तयार आहेत का, हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. त्यांनी हो म्हटलं तर सोबत बसून जागांबाबत चर्चा करू, असं आम्ही त्यांना सांगितलं."
"आम्ही आमची यादी तयार केली आहे. असदुद्दीन ओवैसी साहेबांनी आमच्या पाच जागा घोषित केल्या आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार आहोत. आम्हाला राज्यात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नको आहे," असेही ते म्हणाले.