राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. यानिमित्ताने घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार पराग शाह यांच्याशी साधलेला हा संवाद....
१) प्रचार कसा सुरू आहे आणि कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरणार आहात?
- कालच मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. कालपासूनच आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. परंतू, निवडणूकीच्या वेळी काम करण्यास सुरुवात न करता पाच वर्षे आणि ३६५ दिवस काम करावं, हे माझं तत्व आहे. त्यामुळे निवडणूकीच्या दृष्टीने आमची सगळी तयारी झाली आहे. मागच्या पाच वर्षात प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं फळ मला पक्षाने दिलं आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी मला घाटकोपरच्या जनतेचा आशीर्वाद हवा आहे.
२) मेट्रो १ च्या डब्यांची संख्या वाढवावी अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यासाठी काही पाठपुरावा सुरू आहे का?
- घाटकोपर वर्सोवा मेट्रो १ चे दोन डबे वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मेट्रो १ ही सर्वात पहिली लाईन असल्याने ती सर्वात व्यस्त लाईन आहे. याशिवाय इतर सात मेट्रो मार्गिका प्रगतीपथावर असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. तरीही घाटकोपर वर्सोवा मेट्रोसंबंधी असलेल्या नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
३) घाटकोपर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या आहे. यावर कसा तोडगा काढणार?
- वाहतूक कोंडी ही समस्या केवळ घाटकोपरमध्ये नसून ती संपूर्ण मुंबईत आहे. लोक वाहतूकीचे नियम पाळताना दिसत नाहीत. नो पार्किंगमध्ये लोक आपले वाहन घेऊन जातात. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. पण जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही.
४) यावेळी घाटकोपर पूर्व मतदारसंघात भाजप, मनसे आणि शरद पवार गट अशी तिहेरी लढत होणार आहे. तर तुम्ही विरोधकांच्या आव्हानाकडे कसं पाहता?
- मी कायम माझ्या कामाकडे लक्ष देतो. समोरच्यानेही काम करायला हवं. शरद पवार गट आणि मनसेच्या उमेदवारांनी आपल्या परीने मेहनत करायला हवी. पण मला माझी मेहनत, प्रामाणिकता आणि माझ्या कामांवर विश्वास आहे.
५) मागच्या वेळी जवळपास तुम्ही ५३ हजार मतांनी आघाडी घेतली होती. यावेळी काय वाटतं हा रेकॉर्ड ब्रेक होणार का?
- मागच्यावेळी मी नवीन असल्याने अनेक भागातील लोक मला ओळखत नव्हते. शिवाय अनेक ठिकाणी हा एक बिल्डर आहे, झोपडपट्टीत काय काम करणार? अशी एक इमेज विरोधकांकडून तयार करण्यात आली होती. पण मी लोकांसोबत मिसळून कामं केलीत. त्यामुळे तेव्हाच्या आणि आताच्या विश्वासात खूप मोठा फरक आहे.
६) पुढच्या पाच वर्षांचं व्हिजन काय?
- माझ्या जनतेला मी चांगल्या प्रकारची जीवनशैली देऊ इच्छितो. प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा मिळायलाच हव्या. मी अनेक सोयीसुविधा लोकांना दिल्या आहेत. मी दररोज घाटकोपरमधील अडीच ते तीन हजार लोकांना अन्न पुरवत आहे. पुढच्या पाच वर्षात ५ हजार लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. घाटकोपरमध्ये कुणीही उपाशी आणि बेघर राहू नये, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....