मुंबई : भारतीय शेअर बाजार आज जवळपास क्रॅश झाल्याचे पाहायला मिळाले. मध्यपूर्वेतील इराण-इस्त्रायल यांच्यातील वाढता संघर्षामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, शेअर बाजारातील कमकुवत ट्रेंडमध्ये सेन्सेक्स १७६९.१९ अंकांच्या घसरणीसह ८२,४९७.१० वर बंद झाला. तर निफ्टी ५४६.८० अंकांनी घसरत २५,२५०.१० वर बंद झाला.
दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्जसाठी नवीन नियमांची अंमलबजावणी यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण दिसून आले आहे. सेन्सेक्सने आज ८२,४३४.०२ आणि ८३,७५२.८१ च्या रेंजमध्ये व्यवहार केला आहे. दुसऱ्या सत्रानंतर सेन्सेक्स २.१० टक्क्यांच्या घसरणीसह ८२,४९७.१० वर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे बाजारात लाखो करोडोंचे नुकसान झाले असून सकाळच्या सुरूवातीला सेन्सेक्स घसरल्याचे पाहायला मिळाले. आज मार्केटमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले असून इराण-इस्त्रायल यांच्यातील तीव्र संघर्षाचा परिणाम बाजारावर दिसून आला. आज मार्केट जोरदार आपटला असून आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या तेलाच्या किमती याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला.
रिलायन्स(२.५५ टक्के)सह इतर अनेक शेअर्स पडले असून असून बीएसईमधील टॉप ३० कंपन्यांतील २८ शेअर जोरदार आपटले. या सर्व शेअरमध्ये ४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. यात बीपीसीएल ४.६० टक्के, टाटा मोटर्स ३.८० टक्के, एशियन पेंट्स ३.६६ टक्के, एल अँड टी ३.४१ टक्के, बजाज फायनान्स २.५१ टक्के, अॅक्सिस बँक २.४५ टक्के घसरले आहेत.