आता कोणीही शेअर खरेदी केले, तर ते ‘डी- मॅट’ अर्थात ‘डीमटेरियलायझेशन’ म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात खात्यात जमा होतात. पूर्वी शेअर भौतिक स्वरुपात (म्हणजे कागदाची सर्टिफिकेट) होते. एखाद्या व्यक्तीकडे कंपनीचे शेअर असल्यास डझनभर कागदी प्रमाणपत्रे सांभाळून ठेवावी लागत. त्यामुळे चोरी, नुकसान आणि बनावटगिरी यांचा धोका मोठा असे. या व्यतिरिक्त शेअर विक्री केल्यानंतर ते खरेदी करणार्याला हस्तांतर करण्यासाठी किचकट प्रक्रिया पूर्ण करावी लागत असे.
त्यासाठी अनेक कागदपत्रे लागत. ‘डी-मॅट’ सुविधेमुळे आता शेअर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डिजिटल डिपॉझिटरी’मध्ये ठेवता येतात. ‘डी मॅट’ खात्यात गुंतवणूकदाराचे शेअर, रोखे म्युच्युअल फंड आणि इतर सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरक्षितपणे ठेवल्या जातात. या बदलांमुळे गुंतवणूक प्रक्रिया सुरळीत झाली. तसेच, ‘सेबी’अंतर्गत प्रशासन वाढले. ‘कोविड 19’ महासाथीमुळे ऑनलाईन शेअर ट्रेडिंगकडे वळण्याचा वेगही वाढला आहे.
‘डी-मॅट’ (डीमटेरियलायझेशन) म्हणजे कागदी शेअर सर्टिफिकेटचे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात रुपांतर करण्याची प्रक्रिया. ऑनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला ‘डिपॉझिटरी पार्टिसिपंट’ (डीपी)कडे ‘डी-मॅट’ खाते उघडावे लागते. परिणामी, कागदी प्रमाणपत्रांची आवश्यकता भासत नाही. ‘डी मॅट’ खाते हे बँक खात्यासारखे आहे. शेअर, रोखे सरकारी सिक्युरिटीज म्युच्युअल फंड आदी सर्व गुंतवणूक ‘डी मॅट’ खात्यात एकाच ठिकाणी ऑनलाईन ठेवता येते. यामुळे जगात कोठूनही शेअर रोखे व्यवहार ऑनलाईन करणे सहजशक्य झाले आहे. आजच्या डिजिटल युगात काही मिनिटांत ‘डी-मॅट’ खाते ऑनलाईन उघडता येते.
‘डी-मॅट’ खात्याचे महत्त्व
(1) ‘डी-मॅट’ आणि सिक्युरिटीज ठेवण्याचा सुरक्षित डिजिटल मार्ग.
(2) चोरी, बनावटगिरी, कागदी प्रमाणपत्रांच्या नुकसानीची भीती नाही.
(3) शेअरचे त्वरित हस्तांतर.
(4) अनावश्यक कागदपत्रांची गरज नाही.
(5) ऑनलाईन ‘डी-मॅट’ खाते उघडणे सुलभ व जलद आहे.
(6) शेअर ट्रेडिंग प्रक्रिया सुलभ व सुव्यवस्थित करते. आपली सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदविली जाते. हे एकत्रीकरण मालमत्ता व्यवस्थापन सोपे करते. आपल्या सर्व नोंदी एकाच ठिकाणी ठेवून कर भरण्याची सुविधा देते. लाभांश, बोनस आपल्या खात्यात थेट जमा होतात आणि त्यांची माहितीही तत्काळ मिळते.
‘डी-मॅट’ होल्डिंगचा वापर कर्जासाठी तारण म्हणून करता येतो, ज्यामुळे आपण मर्यादित भांडवलासहदेखील ट्रेडिंग सुरू ठेवू शकतो. यामुळे वेळेची बचत आणि व्यवहार वेळेत होतात. कागदी शेअर सर्टिफिकेटप्रमाणे ‘डी-मॅट’ खात्यातील शेअरवर स्टॅम्प ड्युटी आकारली जात नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे वाचतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह गुंतवणुकींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कोठूनही व्यवहार करण्यासाठी ‘डी-मॅट’ खात्याचा केव्हाही वापर करता येतो.
खाते कसे उघडावे?
(अ) ‘डिपॉझिटरी पार्टिसिपंट’ म्हणजेच ‘डीपी’ निवडून सुरुवात करा. हा डीपी तुमच्या आवडीची बँक किंवा ब्रोकर किंवा वित्तीय संस्था आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे ‘डी-मॅट’ खाते उघडू शकता. खाते उघडण्याचा अर्ज व केवायसी तपशील द्यावा लागतो.
(ब) यात ‘थ्री इन वन’ खाती उघडता येतात. ही सोय बर्याच बँकांंमध्ये आहे. ‘डी-मॅट’ खाते व ट्रेडिंग खाते बचत खात्याशी संलग्न केले जाते. याच बचत खात्यातील रकमेचा वापर करून ट्रेडिंग खात्यातून शेअर व्यापार करून ‘डी-मॅट’ खात्यातून शेअर देवाणघेवाण करू शकता.
क) डिजिटलायझेशनमुळे ‘डी-मॅट’ खाते ऑनलाईन-ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी उघडता येते. अनेक ब्रॉकरेज कंपन्या ऑनलाईन खाते उघडण्याची सुविधा देतात. हे जलद, सोयीस्कर व पेपरलेस आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशनकार्ड, विजबिल किंवा मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे लागतात, तर ओळखीच्या पुराव्याकरिता आधारकार्ड किंवा पासपोर्ट लागतो.
याशिवाय, पॅनकार्ड, बँक स्टेटमेंट, रद्द केलेला चेक व पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो. सर्व डॉक्युमेंट्स स्वयंप्रमाणित करावी लागतात. ‘डी-मॅट’ खाते उघडण्याच्या प्रक्रियेदरम्यान पडताळणीच्या उद्देशाने मूळ कागदपत्रे हाताशी ठेवा. डेरिव्हेटिव्हसारख्या विशिष्ट विभागांसाठी उत्पन्नाच्या पुराव्यांची आवश्यकता असते. ‘डी-मॅट’ खाते आपल्या सिक्युरिटीजसाठी ‘डिजिटल व्हॉल्ट’ म्हणून कार्य करते. प्रत्येक स्टॉक ब्रोकर ‘डी-मॅट’ खात्यासाठी काही शुल्क आकारतो. आपले ‘डी-मॅट’ खाते अखंडपणे कार्य करण्यासाठी आपल्याला ते ट्रेडिंग खात्याशी जोडणे आवश्यक आहे. ट्रेडिंग खात्याशिवाय आपण गुंतवणुकीसाठी आपल्या ‘डी-मॅट’ खात्याचा वापर करू शकत नाही. ट्रेडिंग खाते शेअरच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आर्थिक व्यवहार हाताळते.
‘डी-मॅट’ खाते साधारणपणे विनामूल्य असते किंवा नाममात्र शुल्क आकारले जाते. परंतु, हे खाते चालू ठेवण्यासाठी आणि वापरण्यासाठी विविध प्रकारचे शुल्क आकारले जाते. खाते उघडण्याचे शुल्क, वाषिर्र्क शुल्क, ट्रॅन्झॅक्शन चार्जेस, वार्षिक देखभाल शुल्क (एएमसी) डेबिट व्यवहार शुल्क, अयशस्वी व्यवहार शुल्क, खाते बंद करण्याचे शुल्क, मुद्रांक शुल्क आदींचा त्यात समावेश असतो. विश्वासार्ह डीपी आणि ब्रोकरेज फर्म निवडणे हा आपल्या गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय असतो. ‘डी-मॅट’ खाते गुंतवणुकदारांना इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर आणि सिक्युरिटीज ठेवण्यास मदत करते. शेअर, एक्स्चेंज ट्रेडेड फंड, बॉण्ड व म्युच्युअल फंडांमध्ये केलेल्या सर्व गुंतवणुकीचा मागोवा ठेवण्यासदेखील हे मदत करते. ‘डी-मॅट’ खाते शेअर बाजारातून संपत्तीनिर्मितीचे पहिले पाऊल आहे.
खात्यांचे प्रकार
मायनर ‘डी-मॅट’ खाते, कॉर्पोरेट ‘डी-मॅट’ खाते, रिपॅट्रिएबल ‘डी-मॅट’ खाते या खात्यांचा वापर अनिवासी भारतीय ‘एनआरआय’ बँक खात्यांमधील निधी हस्तांतर करण्यासाठी करू शकतात. ‘नॉन रिपॅट्रिएबल’ ‘डी-मॅट’ खाते ‘रिपॅट्रिएबल’ खात्याप्रमाणे या प्रकाराने परदेशात निधी हस्तांतर करता येत नाही. त्यासाठी ‘एनआरओ’ बँक खाते असणे गरजेचे असते. बेसिक सर्व्हिसेस ‘डी-मॅट’ खाते - भारतीय सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी हा एक सोपा व किफायतशीर मार्ग आहे. योग्य ‘डी-मॅट’ खाते निवडणे आपल्या रहिवासी स्थिती व गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते.
एकीकडे म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’ खात्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत असताना, दुसरीकडे गुंतवणूकदार ‘आयपीओ’त व शेअर बाजारातसुद्धा आपला पैसा गुंतवत आहेत. यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी त्यांची ‘डी-मॅट’ खाती उघडली आहेत. ‘सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड’ (सीडीएसएल) आणि ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’ (एनएसडीएल) यांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 मध्ये 46.84 लाख ‘डी-मॅट’ खाती उघडण्यात आली. हाच आकडा डिसेंबर 2023 मध्ये 40.94 लाख इतका होता. देशात एकूण ‘डी-मॅट’ खात्यांची संख्या 14.39 कोटी इतकी जानेवारी 2024 अखेरीस होती.