मुंबई : देशात ग्रीन एनर्जी(अक्षय उर्जा) प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी अदानी समूहाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रीन एनर्जीसाठी गुगल आणि अदानी ग्रुप यांच्यात डील करण्यात आली असून यासंदर्भात कंपनीने निवेदन जारी केले आहे. दरम्यान, गुगलने 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली आहे.
गुगल आणि अदानी समूह स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करणार असून सामूहिक स्थिरता उद्दिष्टे पुढे नेण्यास मदत करेल आणि भारतीय ग्रीडमध्ये अधिक स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या भागीदारीद्वारे अदानी समूह गुजरातमधील खवरा येथील जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पात असलेल्या नवीन सौर-पवन संकरित प्रकल्पातून स्वच्छ ऊर्जा पुरवेल. या नवीन प्रकल्पाचे व्यावसायिक कामकाज २०२५च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
गुगल आणि अदानी ग्रुप यांच्यातील नाविन्यपूर्ण सहकार्य गुगलच्या २४/७ कार्बन मुक्त ऊर्जा उद्दिष्ट पुढे नेण्यास मदत करेल आणि भारतातील क्लाउड सेवा आणि ऑपरेशन्स स्वच्छ ऊर्जेसह सक्षम करेल. या माध्यमातून भारतातील गुगलच्या निरंतर वाढीसाठी देखील मदत होणार आहे. एकंदरीत, ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी हातमिळवणी केली असून गुगलने येथे 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात याची घोषणा केली आहे.