भाजपची चौथी यादी जाहीर; 'या' दोन नावांची घोषणा

    29-Oct-2024
Total Views | 204
 
BJP
 
मुंबई : ( BJP Fourth Candidate List ) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्याने महाविकास आघाडी, महायुतीमधील घटक पक्ष आणि इतर पक्ष आपल्या उर्वरित जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. यादरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून या यादीत दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मीरा भाईंदर मतदारसंघ व नागपूर विभागातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
 
भाजपच्या चौथ्या यादीत मुंबईतील मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभागातील उमरेड (अनुसूचित जाती) मतदारसंघातून सुधीर पारवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच भाजपने मित्रपक्षांसाठी ४ जागा सोडल्या असून आतापर्यंत १४८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
 
 
 
मीरा भाईंदर येथील विद्यमान आमदार गीता जैन या २०१९ मध्ये अपक्ष लढून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोणाच्या पारड्यात पडणार हा प्रश्न होता. या मतदारसंघातून गीता जैन आणि नरेंद्र मेहता इच्छुक होते. उमेदवारीसाठी या दोघांनीही सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर अखेर हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला असून उमेदवार म्हणून नरेंद्र मेहता यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
 
तसेच नागपूर विभागातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा जागेचा प्रश्नही सुटला असून भाजपच्या सुधीर पारवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येथून शिंदेंच्या शिवसेनेतील उमेदवाराला संधी मिळावी यासाठी शिवसेना आग्रही होती. परंतु भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला आहे.
 
महायुतीने आतापर्यंत २८८ पैकी २८१ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. यातील भाजप १४८, शिवसेना ७८, राष्ट्रवादी काँग्रेस ४९ आणि उर्वरित पक्षांना ६ जागा देण्यात आल्या आहेत. तसेच राहिलेल्या ७ जागांसाठी महायुतीने अजून उमेदवार जाहीर केले नाहीत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121