बांगलादेशच्या ईशान्येकडील वर्षावनांमध्ये आढळणार्या ‘फेरेचे लंगूर’ आणि ‘कॅप्ड लंगूर’ या दुर्मीळ माकडांच्या प्रजाती आज नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. वाढते मानवी हस्तक्षेप, जंगलतोड आणि संकरीकरणामुळे या प्रजातींच्या अस्तित्वावर मोठा परिणाम होताना दिसतो.
जंगलांच्या तुकडे-तुकड्यांमध्ये विभाजनामुळे लंगूर प्रजातींचा अधिवास लहान झाला आहे, ज्यामुळे त्यांचे स्वाभाविक जोडीदार शोधण्यात अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे संबंधित प्रजातींसह संकरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या परिस्थितीमुळे लंगूर प्रजातींतील जनुकीय शुद्धतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
अलीकडील संशोधनानुसार, बांगलादेशात केवळ 500 ‘फेरेचे लंगूर’ आणि 600 ‘कॅप्ड लंगूर’ शिल्लक आहेत. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (IUCN)ने या प्रजातींना ’गंभीरपणे धोक्यात’ आणि ’धोक्यात’ म्हणून सूचीबद्ध केले आहे. संकरीकरणामुळे जनुकांची मिश्रितता वाढली आहे, ज्यामुळे या माकडांच्या अनुकूलतेवर आणि अस्तित्वावर परिणाम होत आहे. परिणामी, त्यांच्या संकरीत संततीला कठोर पर्यावरणीय परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
लंगूर प्रजातींमध्ये संकरीकरणाची प्रवृत्ती पर्यावरणीय अस्थिरतेचे महत्त्वपूर्ण सूचक आहे. जंगलतोड, जमीन वापरातील बदल आणि मानवी वसाहतींमुळे अधिवासाची हानी वाढत आहे. यामुळे लंगूरांच्या प्रजातींच्या अधिवासाचे छोटे तुकडे झाले आहेत, ज्यामुळे त्यांच्या नैसर्गिक प्रजातीतील जोडीदार शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, ते जवळच्या संबंधित प्रजातींसह संकरीत होण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे या दोन्ही प्रजातींच्या जनुकांची शुद्धता धोक्यात येते.
संकरित संततीला मिश्रित अनुवंशिक गुणधर्म वारशाने मिळतात, ज्यामुळे त्यांची अनुकूलता आणि जगण्याची क्षमता कमी होते. परिणामी, लंगूरच्या संकरित संततीला अधिक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आणखी कमी होते.
लंगूर प्रजातींच्या संकरीकरणाचा बांगलादेशच्या परिसंस्थेवर व्यापक परिणाम होतो. जेव्हा संकरित संतती पुनरुत्पादनक्षम असतात, तेव्हा दोन प्रजातींच्या जनुकांचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे त्यांच्या जनुकांची वेगळेपणता कमी होते. परिणामी, दोन स्वतंत्र प्रजाती नष्ट होऊन त्यांच्या जागी एकसंध संकरित लोकसंख्या उभी राहते. त्यामुळे या लंगूर प्रजातींनी पर्यावरणाशी जुळवून घेतलेल्या विशिष्ट गुणधर्मांचे नुकसान होण्याचा धोका असतो. लंगूर प्रजाती पर्यावरणीय समतोल जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडांच्या बिया पसरवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. ज्यामुळे जंगलाचा पुनरुत्पादन प्रक्रिया सुकर होते. परंतु, संकरित संततीमुळे या भूमिकेत घट होऊ शकते, ज्यामुळे वन परिसंस्थेचे संतुलन बिघडू शकते.
मानवी हस्तक्षेपामुळे लंगूरच्या अधिवासाचे नुकसान आणि संकरीकरणाचा वेग वाढला आहे. वृक्षतोड, शेतीचा विस्तार आणि पायाभूत सुविधा निर्माण यामुळे जंगलांचा विनाश होतो आणि लंगूरांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहण्यास अडचणी येतात. त्यांना स्थलांतर करून नवीन जागा शोधावी लागते. जिथे त्यांना दुसर्या प्रजातींचा सामना करावा लागतो आणि संकरीकरणाची शक्यता वाढते. याशिवाय, शिकार आणि तस्करीमुळे लंगूर लोकसंख्येला अधिक धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोक आणि लंगूर यांच्यातील संपर्कामुळे रोगांच्या प्रसाराची शक्यता वाढते, ज्यामुळे त्यांची लोकसंख्या आणखी घटते.
या परिस्थितीतून असे दिसून येते की, बांगलादेशातील लंगूर प्रजातींना वाचवण्यासाठी तातडीने कृती करण्याची आवश्यकता आहे. ‘फेरेचे’ आणि ‘कॅप्ड लंगूर’च्या अनुवांशिक अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे जतन आणि विस्तार करणे अत्यावश्यक आहे. संशोधकांनी खंडित जंगलांमध्ये कॉरिडोर तयार करण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे लंगूर प्रजातींमध्ये अनुवांशिक विविधता वाढेल आणि संकरीकरण कमी होईल. या उपायांसोबतच, अधिवासांचे संरक्षण आणि जंगलतोड थांबवणे महत्त्वाचे आहे.
लंगूर संरक्षणासाठी स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे देखील आवश्यक आहे. कारण, ते वन्यजीवांचे निरीक्षण आणि संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ‘फेरेचे’ आणि ‘कॅप्ड लंगूर’च्या संरक्षणासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे, ज्यामुळे या प्रजातींचा शाश्वत विकास आणि परिसंस्थेचे संतुलन राखले जाऊ शकेल.